रविवार, २१ जून, २०२०

काळगाव ; शिवारात कोळपणीची धांदल; शिवार फुललाय माणसांनी

शिवारात कोळपणीची धांदल; शिवार फुललाय माणसांनी

 शिवारामध्ये भुईमुगाच्या पिकात कोळपणी करताना शेतकरी बांधव

तळमावले/वार्ताहर
यंदा विभागात वळीवाच्या पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यामुळे काळगांव विभागातील पेरण्या लांबल्या होत्या. त्यातच 2 जूनच्या दरम्यान निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण महाराष्ट्राला तडाखा दिला. त्या वादळामुळे दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस या विभागात झाला. त्यानंतर पाऊस गेल्याने लोकांनी युध्दपातळीवर भुईमूग, भात, सोयाबीन, मका इ. पीके पेरुन घेतली. सुमारे 80 टक्के पेरणी लोकांनी या काळात पूर्ण केली. दोन तीन दिवसाच्या पावसाच्या
उघडीपीच्या काळात ही पेरणी झाली. त्यानंतर पुन्हा सलग 4 ते 5 दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे पीके उगवण्यास पोषक असे वातावरण तयार झाले. 4-5 दिवस सलग पाऊस पडल्यानंतर कालपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शिवारात कोळपणीची एकच हातघाई उसळलेली दिसून येते. तसेच ज्यांची किरकोळ पेरणी राहून गेली आहे त्यांनी देखील ती पूर्ण करण्यासाठी गडबड करत आहेत.
ग्रामीण भागात सुरुवातीच्या काळात डोक्याने ओढणारा कोळप्याचा वापर जास्त प्रमाणात कोळपणीसाठी केला जात असे. या कोळप्याला दोन माणसांची आवश्यकता भासत असे. एक कोळपा ओढण्यासाठी आणि दुसरा तो कोळपा पुढे दाबण्यासाठी. परंतू सायकल कोळपा आल्यामुळे हे कोळपे हल्ली दिसेनासे झाले आहेत. सायकल कोळप्यामुळे एकच व्यक्ती पीकामध्ये कोळपू शकतो. त्यामुळे सर्वत्र सायकल कोळप्याने लोक पीके कोळपत असल्याचे दिसत आहे.
सध्या पीके कोळपण्यासाठी पोषक वातावरण आहे. आता कोळपल्यामुळे पुढे मोठया प्रमाणात येणाÚया गवताला प्रतिबंध घालता येतो. काळगांव विभागातील वाडया वस्त्यावर सध्या कोळपणीची एकच धांदल चालू असल्याचे दिसून येत आहे. शिवाय या विभागात जास्त पाऊस असतो. त्यामुळे बहुतांशी लोक भाताचे पीक
घेतात. हे पीक करताना लावणीची पध्दत वापरली जाते. लावणीसाठी रोपे तयार करण्यासाठी बी टाकले जाते. त्यानंतर संबंधित वावरामध्ये नांगरले जाते. हे सुध्दा काम सध्या सुरु आहे. लावणीच्या पध्दतीमुळे शेतातील गवत कमी होते तसेच पीकाचे उत्पादन देखील जास्त येते. यामुळे अशा पध्दतीचे नांगरण्याचे काम सुध्दा मोठया प्रमाणात सुरु आहे.
एकंदरित संपूर्ण शिवार माणसांनी गजबजून गेला आहे. पावसाने दिलेल्या उघडीपीमुळे सर्व लोक कामात व्यस्त आहेत.

पाऊस उघडल्यामुळे शिवारात सध्या एकच हातघाई सुरु आहे. कोळपणीच्या माध्यमातून पिकातील जास्तीत जास्त गवत काढण्यास मदत होत आहे. त्यामुळे भांगलणी करताना जास्त त्रास होत नाही. अजून एकदा कोळपणी झाली तर पीक चांगल्या पध्दतीने येण्यास मदत होईल.
- सौ.गयाबाई डाकवे, महिला शेतकरी







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...