सोमवार, ३१ जुलै, २०२३

माणसातला देवमाणूस म्हणजे प्रा. ए. जी.खोत.

 माणसातला देवमाणूस म्हणजे प्रा. ए. जी.खोत.



प्रा. ए.जी.खोत सर आपल्या प्रदीर्घ सेवेतून आज सोमवार, दिनांक  31 जुलै, 2023 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. प्रा. ए.जी. खोत साधारणपणे  चार वर्षांपूर्वी शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे बदलीने हजर झाले. आपण नेहमी बोलतो की सुरुवातीला माणूस जसा वाटतो तसा तो मुळातच नसतो. सरांचे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील आणि यापूर्वी त्यांच्याबरोबर नोकरी करण्याची संधी कधीही मला मिळाली नव्हती तरीपण त्यांच्याबद्दल लिहावे असे मला मनापासून वाटत होते. त्यांना मी मागील महिन्यातच बोललो होतो की सर मी तुमच्याबद्दल तुमच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी काहीतरी लिहिणार आहे.
     मला आजही आठवते ज्यावेळी खोत सर कराडमध्ये हजर झाले त्याच दिवशी मी माझी विद्यार्थिनी आणि सध्या समाजशास्त्र विभागात कार्यरत असणारी प्रा. दिपाली वाघमारे यांना मी प्रश्न विचारला की, "दिपाली खोत सर कसे आहेत?" त्यांनी त्यावेळी उत्तर दिले की, "यादव सर, आता माझे खूप अवघड आहे. नवीन आलेले सर अजिबात बोलत नाहीत तसेच ते खूप खूप शांत वाटतात. आता माझे काय खरे नाही". मी दिपाली यांना त्यावेळी बोललो की, दिपाली कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव जाणून घेण्यासाठी थोडा वेळ जावा लागतो. त्याच प्रा. दिपाली यांना मी मुद्दामहून मागील पंधरा दिवसात प्रा.ए.जी. खोत यांच्या बद्दल पुन्हा प्रश्न विचारला, " दिपाली खोत सर कसे आहेत?" दिपाली यांनी एका क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले, "खोत सर एक नंबर माणूस आहे". आपल्या विभाग प्रमुखाबद्दल असे उत्तर आज येणे फारच दुर्मिळात दुर्मिळ गोष्ट आहे. मग एकाच विभागात सलग चार वर्षे कार्य करत असताना दिपाली यांच्या मनात प्रा. खोत सर यांच्या बद्दल विचारात बदल का झाला ?कारण याचे एकच उत्तर आहे की, खोत सर हे माणसातील देव माणूस आहे.
   आपणास माहित आहे की सुरुवातीस माणूस जसा वाटतो तसा तो मुळातच नसतो. कोणतीही व्यक्ती सुरुवातीला आश्वासक, आकर्षक आणि आपलेपणाचे वाटते परंतु जसजसा काळ जाईल तसतशी त्या व्यक्तीचे जीवनाचे बरेच नकारात्मक पैलू उघडत जातात आणि ती व्यक्ती आपणास नको वाटते, त्या व्यक्तीचा सहवासपण काटेरी वाटत जातो. सरांच्या बाबतीत मला उलटा अनुभव आला त्यांच्याबद्दल मलाही सुरुवातीला खूप नकारात्मक भावना निर्माण झालेली होती, परंतु त्यांच्यावर झालेल्या योग्य संस्काराने त्यांची व्यक्तिमत्व नकारात्मकतेकडून सकारात्मककडे जे झुकले ती त्यांच्याकडे असलेली फक्त आणि फक्त असलेल्या माणुसकीच्या खाणीमुळेच. त्यांच्याकडील असणारे आदराची भावना, सर्वासी आदबीने, प्रेमाने, आपुलकीने व नम्रतेने वागण्याचा सुस्वभाव आणि लोकसंग्राहक वृती यामुळे त्यांचे लोकप्रियता मध्ये अधिक भर पडते.
    माणसाने ज्येष्ठ असावे परंतु श्रेष्ठ कधीच नसावे. सर हे सध्या उपप्राचार्य पदावर कार्यरत होते, परंतु त्यांनी उपप्राचार्य पदाचा कधीही दुरुपयोग केला नाही. या पदावर कार्य करत असताना कधीच त्यांनी आपल्या सहकार्यांना अपमानास्पद वागणूक दिली नाही. पदाचा दुरुपयोग करून त्यांनी कधीही सहकाऱ्यांना तणावात ठेवली नाही. ज्येष्ठतेने कधीकधी अहंकाराची भावना निर्माण होते परंतु त्यांनी त्याला मूठ माती दिली. त्यांचा महाविद्यालयातील उपप्राचार्य म्हणून वावर हा आश्वासक होता. फलभाराने कोणतेही झाडे झुकलेले दिसते परंतु त्याला आलेला फळामुळे ते अधिक अधिक उठून दिसते. तशी समाजातील नम्र माणसे जरी झुकलेली दिसली तरी त्यांच्याकडे असलेल्या नम्रतेने ती अधिक उठून दिसतात. फुलांकडे जशी पाखरे आकर्षित होतात तशी माणसे त्यांच्याकडे आकर्षित होतात. जी माणसे समाजात ताठ असतात, नम्र नसतात ती माणसे कितीही उच्च विद्याविभूषित असली आणि कोणत्याही पदावर कार्यरत असली तरी कालांतराने लोक त्यांना विसरून जातात. माणूस म्हणून प्रत्येकाची काही एक ओळख असते आपल्या सेवाकाळात त्यांनी अनेक माणसे जोडली. व्यक्ती कोणाच्या सानिध्यात सहवासात आहे व त्या सहवासात असणाऱ्या व्यक्तीचे संस्कार काय आहेत, यावर व्यक्तीच्या जीवनाची जडणघडण होत असते.
   सर, टी-टाईमला स्टाफरूम मध्ये आल्यानंतर कोणत्याही खुर्चीवर अगदी शांतपणे बसायचे. स्टाफरूम मध्ये त्यांनी कधीही निरर्थक बडबड केली नाही, कोणत्याही सहकाऱ्याची चेष्टा- कुचेष्टा त्यांनी कधीही केली नाही. कोणत्याही सहकाऱ्यांची माघारी चेष्टा-कुचेष्टा करताना मी कधीही ऐकले नाही आणि पाहिलेही नाही. कोणत्याही सहकाऱ्याची प्राचार्याकडे तक्रार घेऊन जाताना मी कधीही पाहिली नाही. सरांचा मला आणखी एक गुण आवडला तो म्हणजे त्यांच्याकडे असलेला दातृत्वपणा. आज समाजात दानशूर व्यक्ती फारच कमी आढळतात, पैसा हा तसा संवेदनशील विषय. परंतु सर आपल्या सहकाऱ्यावर पैसा खर्च करताना कधीही त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. मी खूप वेळा अनुभवलेले आणि ऐकलेले आहे की कोठेही प्राध्यापकांची सहल गेली तर सर त्या सहलीचा सर्व खर्च करतात. मला आठवते मागील वर्षी वरिष्ठ विभागातून टी-क्लब साठी पैसे मिळाले नव्हते त्यावेळी एक महिनाभर सरांनी स्वतः पैसे दिले होते परंतु त्यांनी त्याचा एक शब्दही कोठे उच्चारला नाही. नोकरीत नव्याने रुजू झालेल्या प्राध्यापकांना दररोज सकाळी स्वतःच्या पैशाने नाश्ता देणारे प्रा. ए.जी. खोत एक वेगळेच व्यक्तिमत्व! सरांनी या महिन्यात अलंकार हॉटेलमध्ये सर्व स्टाफ साठी दिलेले स्वादिष्ट आणि रुचकर जेवण आजही आठवते पण त्यापेक्षाही आपल्या समाजशास्त्र विभागात अध्ययन करत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलेले त्यांनी आमंत्रण खूपच मनाला भावते. आज विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद हरवत चालला आहे आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अबोला निर्माण झालेला आहे. परंतु खोत सर हे विद्यार्थी प्रिय व्यक्तिमत्व असल्याचे त्यावेळी निदर्शनास आले.
   आणखी एक सरांची गोष्ट मला मनापासून आवडली ती म्हणजे त्यांचे आपल्या समाजशास्त्र विभागातील सहकाऱ्याबद्दल असलेले एक सुंदर नाते. स्त्रियांच्याबद्दल असणारा एक त्यांचा अतिव आदर. आजच्या काळात एकाच विभागात कार्यरत असणारे विभागप्रमुख आणि सहकारी यांच्यात बऱ्याच वेळा कडवट नाते असते. परंतु एक विभागप्रमुख कसा असावा, याचे एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रा. ए. जी. खोत. आपल्या सहकाऱ्या बरोबर कसे वागावे, व्यवहार कसा करावा हे खोत सरांच्या कडून शिकायला खूप मिळते. प्रा. दिपाली यांना स्वतःच्या मुलीप्रमाणे, एका छोट्या बहिणी प्रमाणे त्यांनी जपले. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना कोणत्याही क्षेत्रात काम करताना खूपच असुरक्षित वाटते, परंतु खोत सरांना स्त्रियांच्या बद्दल प्रचंड आदर असल्यामुळे प्रा. दिपाली यांनी तो विभाग सक्षमपणे पुढे नेत आहेत. एकाच विभागात कार्यरत असणाऱ्या एका सहकाऱ्याने आपल्या विभाग प्रमुख निवृत्त होत असताना दुसऱ्या जवळ काढलेले गौरवास्पद उद्गार, "खोत सर एक नंबर माणूस आहे". खोत सर  आजपर्यंत सेवा केल्याची हीच तुमची पोचपावती. निवृत्त होत असताना जाता जाता ही पोचपावती मिळवणे आज खूप अवघड गोष्ट होत चालली आहे.
    असा हा माणसाचा देव माणूस आज सेवानिवृत्त होत आहे. खोत सर आपणास सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! सेवानिवृत्तीनंतरचे तुमचे आयुष्य निरोगीमय आणि शतायुष्य होवो ईश्वरचरणी प्रार्थना!

       "अशी पाखरे येती
       स्मृती ठेवूनी जाती,
       हेचि दान देगा देवा
       प्रा. खोत सरांचा विसर न व्हावा"


       प्रा. सुरेश यादव.
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड.


शुक्रवार, २८ जुलै, २०२३

कराड - माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे कराड बसस्थानकाच्या सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा मार्गी


 


कराड: सातारा विभागातील कराड येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री काळात नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकामधील स्टील बेंचेसची मोडतोड झालेने सद्या प्रवाशांना बसण्याकरिता गैरसोय होत आहे हि बाब माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाच्या निदर्शनास  आणून देण्यासाठी व कराड बसस्थानक साठी निधी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला तसेच लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत सूचना देखील मांडली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले कि, स्टीलचे बेंचेस वेल्डिंग करून पुन्हा तुटण्याची शक्यता असल्याने त्याऐवजी त्याठिकाणी आरसीसी बेंचेस तयार केले जातील व हे काम तातडीने केले जाईल. तसेच बसस्थानकाच्या तळघरामधील पार्किंगमध्ये पाणी साठते सदरचे पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्याचेसुद्धा आदेश दिले जातील.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री काळात विशेष निधीची तरतूद करून जवळपास रु. ११ कोटी इतका खर्च करून कराडकरांच्या सोयीसाठी नवीन बसस्थानक बांधले गेले कराड तालुक्यातील सर्वच नागरिकांना अत्यंत प्रशस्त व सुविधायुक्त बस स्थानक त्यांच्या महत्वपूर्ण निर्णयामुळे मिळाले. परंतु काही वर्षातच येथील स्टीलच्या खुर्च्यांची मोडतोड झाली. ज्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले हि बाब आ. चव्हाण यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शासनाकडून येथील बसस्थानक पुन्हा एकदा सुस्थितीत आणण्यासाठी व निधी मिळावा म्हणून प्रयत्न केले, तसेच अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी बसस्थानकाच्या विकासाबद्दल ठोस निर्णय घेऊन आदेश दिले आहेत.
 ----------------------------------------------------------------------------

पाटण - वृक्ष लागवड करणे आज काळाची गरज-पी.एल.केंडे सर यांचे प्रतिपादन

 वृक्ष लागवड करणे आज काळाची गरज-पी.एल.केंडे


 
पाटण-जागतिक वन संवर्धन दिनाचे औचित्य साधून मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये आज वनौषधी वृक्षाचे वृक्षारोपण शालेय परिसरांत  विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.पी.एल.केंडे सर यांचे शुभहस्ते करण्यात आले,त्यावेळी ते म्हणाले की, दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे मानवांने स्वत:च्या सुख-सोयीसाठी वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड झाली आहे, त्यामुळे अनेक समस्यांना तोंड आज मानवाला दयावे लागत आहे,त्यामुळे वृक्ष लागवड करणे आज काळाची गरज आहे, या कार्यक्रमांच्या निमित्ताने विज्ञान शिक्षक श्री.एन.एस.कुंभार सर,श्री.एस.डी.शेजवळ सर, श्री.डी.बी.माने सर, श्री.आर.आर.मोरे सर,श्री.टी.व्ही शिंदे सर यांनी मनोगते व्यक्त केली,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.व्ही.ए.घोणे सर यांनी केले तर आभार सौ.पवार व्ही.एन.यांनी मानले, यामकार्यक्रमांच्या निमित्ताने विदयालयातील हिंदी विषय शिक्षक श्री.व्ही.एच.लोहार सर यांनी झाड लावू चला गड्यानों या गीतातून सर्वांना मंत्रमुग्ध केले,या कार्यक्रमांसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विदयार्थी उपस्थित होते.

गुरुवार, २७ जुलै, २०२३

काळगावसह परिसरात रोपा लावणीच्या कामाला सुरुवात

काळगावसह परिसरात रोपा लावणीच्या कामाला सुरुवात

तळमावले/वार्ताहर
काळगांव खोऱ्यात भात हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. याशिवाय कमी पाण्यावरील व जास्त पाण्यावरील भाताची विविध पीके घेतली जातात. ज्या ठिकाणी कमी पाणी आहे. अशा ठिकाणी धूळवाफेवरील भाताचे पीक व ज्या ठिकाणी पाणी मुबलक आहे अशा ठिकाणी भात लावणीचे बी घेण्यात येते. सध्या सर्वत्र भात लावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतशिवार माणसांनी गजबजून गेला आहे.
प्रतिवर्षी या विभागातील मुंबई-पुणे व अन्य ठिकाणी नोकरीस असलेला चाकरमानी या कामासाठी हमखास हजर राहतो. जास्तीत जास्त वेळ शेतीमध्ये देण्याचा प्रयत्न या लोकांचा दिसून येतो. तसेच यंदा आतापर्यंत पावसाने चांगल्या पध्दतीने साथ दिल्यामुळे शेतकरी राजा देखील सुखावला आहे.
धूळवाफेवरील पेरणी पूर्ण केल्यानंतर पावसाची उघडीप दिल्यामुळे भांगलणी, कोळपणी अशी कामे लोकांनी उरकली आहेत. दरम्यान, याच कालावधीत भात लावणीसाठी तरवा देखील टाकला जातो. तरवा टाकण्यापूर्वी संबंधित क्षेत्र शेतातील घाण, शेणी, पालापाचोळा टाकून पेटवले जाते. त्यानंतर त्यात भाताचे बी टाकून तरवा तयार केला जातो. त्यानंतर संबंधित रानात पाणी सोडले जाते. पाणी सोडून ते पुन्हा नांगरले जाते. त्यात चिखल तयार करतात. त्यानंतर लाकडी दात असलेल्या शेती औजाराने ते शेत एकजीव केले जाते. त्यात अगोदरच्या दिवशी उपटलेल्या तरव्याची रोपे रोवली जातात. या संपूर्ण क्रियेस रोपा लावणी किंवा भात लावणी म्हणतात. सध्या या भात लावणीच्या कामाला वेग आलेला दिसून येत आहे. भात लावणीसाठी शेतकऱ्याला हवा तास पाऊस या भागात मिळाल्याने शेतकरी देखील सुखावला आहे.

__________________________________________________________________________



भात लावणीच्या या पध्दतीस आमच्याकडे रोपा लावणे असे म्हटले जाते. प्रचंड मेहनत करावी लागणारी ही प्रक्रिया आहे. परंतु या पध्दतीमुळे भाताचे उत्पन्न चांगले मिळते. त्यामुळे आम्ही ही पध्दत वापरतो. एका औताच्या पाठीमागे किमान 8 माणसे तरी लागतात. 2 औत धरण्यासाठी, 2 बांध धरण्यासाठी व 4 भात लागण करण्यासाठी. अजूनपर्यंत तरी या कामासाठी पैरा पध्दत आमच्याकडे आहे. यामुळे लोकांच्यातील एकोप्याची भावना देखील दृढ होत आहे.
-भरत डाकवे, शेतकरी

भ्रष्टाचारी शिक्षणाधिकार्‍याची ई डी अंतर्गत कारवाई होणारमाजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

 भ्रष्टाचारी शिक्षणाधिकार्‍याची ई डी अंतर्गत कारवाई होणार

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.



 कराड: राज्यातील शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून गैरव्यवहार होत असल्याबाबत विधानसभेत प्रश्नोत्तरच्या वेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षण विभागातील गंभीर भ्रष्टाचाराच्या घटना उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍यांवर कारवाई केली जावी यासाठी आपल्या कायद्यात योग्य बदल केले जावेत तसेच भ्रष्टाचारी अधिकार्‍यांची ई डी अंतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी केली. आ. चव्हाण यांच्या मागणीचा विचार करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्कीच कायद्यात योग्य ते बदल केले जातील तसेच उपस्थित केलेल्या नाशिकच्या भ्रष्ट शिक्षणाधिकार्‍यापासूनच ई डी अंतर्गत कारवाई करण्यासाठी शिफारस केली जाईल. असे आश्वासन दिले.

नाशिक महापालिका शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजाराची तर लिपिकाला ५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते या घटनेची माहिती देताना शिक्षण विभागात अशा प्रकारचे विविध ठिकाणी होत असलेला भ्रष्टाचार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत सभागृहाला दिली. याबाबत सबंधित भ्रष्ट अधिकार्‍यावर कोणतीही ठोस कारवाई न केल्याने सरकार हतबल असल्याचे चित्र समोर येत आहे. नाशिकच्या प्रकरणात राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी जे पत्र लिहले होते त्यामध्ये 72 भ्रष्ट अधिकार्‍यांपैकी 36 शिक्षणाधिकारी आहेत. या भ्रष्टाचारी  अधिकार्‍यांची चौकशी केली तरी त्यांना पुन्हा पदावर घ्यावे लागते असे निदर्शनास आणले. यामध्ये 2 प्रश्न माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले. यामध्ये विधिमंडळाचा कायदा करून काही बदल करता येईल का? ज्यांच्या चौकश्या झाल्या त्यांनाच पुन्हा पदावर घ्यायचे हे काही योग्य होणार नाही. असे प्रकरण घडले असल्याचे सरकारने मान्य केले आहे. तरी अशा घटना घडत असताना यावर ठोस कारवाई न केल्याने संपूर्ण विधिमंडळाची हतबलता यामध्ये दिसून येते.  असा गंभीर प्रश्न यावेळी उपस्थित केला. तसेच नाशिक च्या केस मध्ये त्या शिक्षणाधिकार्‍याच्या घराची लाचलुचपत विभागाने झडती घेतली असताना 50 लाख रुपयांची रोकड 32 तोळे सोने, आणि एका बँक अकाऊंटवर 32 लाख रु तसेच काही आलीशान फ्लॅट अशी माहिती समोर आली. या घटनेची माहिती देत आ. चव्हाण यांनी  मागणी केली की, अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍यांना कडक शासन करण्यासाठी आपल्या कायद्यात कडक तरतुदी कराव्यात तसेच या भ्रष्टाचारी अधिकार्‍यांची मनी लौंडरिंग अंतर्गत कारवाई केली जावी.

आ. चव्हाण यांनी केलेली मागणी अत्यंत योग्य व गंभीर स्वरूपाची आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कायद्यात बदल करून त्याच व्यक्ति पुन्हा त्या ठिकाणी येणार नाहीत व कायद्याची पळवाट शोधून मिळते म्हणून त्या भ्रष्टाचारी लोकांनी त्या त्या ठिकाणी काम करणे योग्य नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांना नियुक्त केले जाणार नाही तसेच ई डी अंतर्गत करवाईसाठी नाशिकच्या भ्रष्ट अधिकार्‍याचीच पहिली हीच केस ई डी कडे पाठवली जाईल अशी ग्वाही सभागृहाला व प्रश्न उपस्थित केलेल्या आ. चव्हाण यांना फडणवीस यांनी दिली.


मंगळवार, २५ जुलै, २०२३

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित

 


पुणे, दि. २५ : बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाच्या बोगस निविष्ठा संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून व्हाट्सॲप संदेशाद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

कृषी आयुक्तालयस्तरावर तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला असून हा कक्ष २४ X ७ कार्यरत आहे. तसेच शेतकरी आपली तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या इमेल पत्त्यावर देखील करु शकतात. तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.

राज्याचे सरासरी पर्जन्यमान ४६३.८ मिमी असून या खरीप हंगामात २४ जुलै २०२३ पर्यंत प्रत्यक्षात ४५७.८ मिमी म्हणजे सरासरीच्या ९९ टक्के एवढा पाऊस पडला आहे. खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून २४ जुलै २०२३ अखेर प्रत्यक्षात ११४.६४ लाख हेक्टर क्षेत्रावर ८१ टक्के पेरणी झाली आहे. राज्यात पेरणीच्या कामाला वेग आला असून प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. २४ जुलै पर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची ४४.०८ लाख हे. क्षेत्रावर, कापूस पिकाची ३९.८८ लाख हे. क्षेत्रावर, तूर पिकाची ९.६६ लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची ६.६९ लाख हे. क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे.

चालू खरीप हंगामाकरीता १९.२१ लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. राज्यात १९.३० लाख क्विंटल (१०० टक्के) बियाणे पुरवठा झाला आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावे तसेच पावती व टॅग जपून ठेवावेत, असेही कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खते, कीटकनाशके किंवा बियाणे याबाबत तक्रार असल्यास ८४४६११७५००, ८४४६२२१७५० किंवा ८४४६३३१७५९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कृषिविषयक योजनांच्या माहितीसाठी १८००२३३४००० हा कृषी विभागाचा हेल्पलाईन क्रमांक असून शेतकरी बांधवांनी आवश्यकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

काळगांव : संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यपदी गोविंदराव गोटुगडे यांची निवड



 


काळगांव / वार्ताहर : चंद्रकांत मोडक
सातारा जिल्हयातील पाटण तालुक्याचे संजय गांधी सामाजिक अर्थसहाय्ययोजनेनुसार वित्तीय सहाय्य मागणीसाठी आलेल्या अर्जाची छाननी करुन निर्णय घेणेसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदी गोविंदराव गोटुगडे (आप्पा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे.


गोविंदराव गोटुगडे (आप्पा) यांनी यापूर्वी काळगांव ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषवले आहे. गोटुगडे हे सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या या निवडीमुळे विभागातील महिलांना त्यांच्या पदाचा लाभ मिळेल. 


या निवडीबद्दल त्यांचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, गटनेते पंजाबराव देसाई, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भरत साळुंखे, अष्टविनायक पतसंस्थेचे संस्थापक सुभाषराव बावडेकर, बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, विशाल पवार, कृष्णत पाचुपते, उपसरपंच शिवाजीराव पवार, उपसरपंच वसंत देसाई व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच ग्रामपंचायत धामणी, काळगांव, कुंभारगांव गण यांच्यावतीने देखील गोविंदराव गोटुगडे यांचा सत्कार करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...