गुरुवार, २७ जुलै, २०२३

काळगावसह परिसरात रोपा लावणीच्या कामाला सुरुवात

काळगावसह परिसरात रोपा लावणीच्या कामाला सुरुवात

तळमावले/वार्ताहर
काळगांव खोऱ्यात भात हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. याशिवाय कमी पाण्यावरील व जास्त पाण्यावरील भाताची विविध पीके घेतली जातात. ज्या ठिकाणी कमी पाणी आहे. अशा ठिकाणी धूळवाफेवरील भाताचे पीक व ज्या ठिकाणी पाणी मुबलक आहे अशा ठिकाणी भात लावणीचे बी घेण्यात येते. सध्या सर्वत्र भात लावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतशिवार माणसांनी गजबजून गेला आहे.
प्रतिवर्षी या विभागातील मुंबई-पुणे व अन्य ठिकाणी नोकरीस असलेला चाकरमानी या कामासाठी हमखास हजर राहतो. जास्तीत जास्त वेळ शेतीमध्ये देण्याचा प्रयत्न या लोकांचा दिसून येतो. तसेच यंदा आतापर्यंत पावसाने चांगल्या पध्दतीने साथ दिल्यामुळे शेतकरी राजा देखील सुखावला आहे.
धूळवाफेवरील पेरणी पूर्ण केल्यानंतर पावसाची उघडीप दिल्यामुळे भांगलणी, कोळपणी अशी कामे लोकांनी उरकली आहेत. दरम्यान, याच कालावधीत भात लावणीसाठी तरवा देखील टाकला जातो. तरवा टाकण्यापूर्वी संबंधित क्षेत्र शेतातील घाण, शेणी, पालापाचोळा टाकून पेटवले जाते. त्यानंतर त्यात भाताचे बी टाकून तरवा तयार केला जातो. त्यानंतर संबंधित रानात पाणी सोडले जाते. पाणी सोडून ते पुन्हा नांगरले जाते. त्यात चिखल तयार करतात. त्यानंतर लाकडी दात असलेल्या शेती औजाराने ते शेत एकजीव केले जाते. त्यात अगोदरच्या दिवशी उपटलेल्या तरव्याची रोपे रोवली जातात. या संपूर्ण क्रियेस रोपा लावणी किंवा भात लावणी म्हणतात. सध्या या भात लावणीच्या कामाला वेग आलेला दिसून येत आहे. भात लावणीसाठी शेतकऱ्याला हवा तास पाऊस या भागात मिळाल्याने शेतकरी देखील सुखावला आहे.

__________________________________________________________________________



भात लावणीच्या या पध्दतीस आमच्याकडे रोपा लावणे असे म्हटले जाते. प्रचंड मेहनत करावी लागणारी ही प्रक्रिया आहे. परंतु या पध्दतीमुळे भाताचे उत्पन्न चांगले मिळते. त्यामुळे आम्ही ही पध्दत वापरतो. एका औताच्या पाठीमागे किमान 8 माणसे तरी लागतात. 2 औत धरण्यासाठी, 2 बांध धरण्यासाठी व 4 भात लागण करण्यासाठी. अजूनपर्यंत तरी या कामासाठी पैरा पध्दत आमच्याकडे आहे. यामुळे लोकांच्यातील एकोप्याची भावना देखील दृढ होत आहे.
-भरत डाकवे, शेतकरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...