रविवार, ३१ जुलै, २०२२

मुंबई - नऊ तासाच्या चौकशीनंतर अखेर आज ईडीकडून संजय राऊतांना अटक

नऊ तासाच्या चौकशीनंतर अखेर आज ईडीकडून संजय राऊतांना अटक

 पत्राचाळ प्रकरणात टांगती तलवार असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना नऊ तासाच्या चौकशीनंतर अखेर आज ईडीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. राऊतांच्या घरी आज सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं होतं.
दरम्यान, भांडुप येथील त्यांच्या राहत्या घरी सकाळी ईडीचे अधिकारी आले होते. सकाळपासून आत्तापर्यंत त्यांची कसून चौकशी चालू होती. यादरम्यान त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले असून जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली होती. त्यानंतर, "पण तरीही मी शिवसेना सोडणार नाही." असं ट्वीट संजय राऊतांनी केलं होतं. दरम्यान राऊतांच्या घरी सीआरपीएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. पण अखेर नऊ तासाच्या चौकशीनंतर राऊतांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं आहे

शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

*सांगली : कोरोना संक्रमणामुळे पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय – पालकमंत्री जयंत पाटील*


सांगलीदि. कोरोनाचे संक्रमण अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्याला आपल्याला तोंड द्यावे लागेलत्याला पर्याय नाही. यासाठी आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय आजच जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे. नववी व दहावी मधील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याची मोहिम सुरू आहे. तरीही सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रसार कमी होईल यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून पुढील काळात रूग्णालयातील बेड्स कमी पडू नयेत असा आपला प्रयत्न असला पाहिजे, असे आवाहन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

कोरोनाचा संसर्ग उच्चस्तराला पोहोचला की तो हळूहळू कमी होतो असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. कोरोना संसर्ग फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढत जाईल व मार्च महिन्यामध्ये तो ओसरेल. राज्यात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे थोडीशी भिती लोकांच्यामध्ये आहे. तरी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप यासारखे कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरीत आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून त्वरीत कोविड चाचणी करून घ्यावी. त्याचबरोबर ज्यांनी अद्यापही  कोविड लस घेतली नाही, ज्यांचा दुसरा डोस प्रलंबित आहे अशांनी त्वरीत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही केले.

सातारा : डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय औषध दिल्यास मेडिकल दुकानांवर कारवाईजिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा इशारा

सातारा : डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय औषध दिल्यास मेडिकल दुकानांवर  कारवाई

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा इशारा

 

 सातारा, दि.7  : औषध दुकानदारांनी  नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) असल्याशिवाय औषधे देऊन नयेत. दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.

कोरोना संसर्गाबाबत मार्गदर्शनाप्रमाणे उपचार असल्यामुळे शेड्युल एच औषधे व स्टेरॉइडस् यांची विक्री नोंदणीकृत डॉक्टराच्या चिठ्ठीवर होणे आवश्यक आहे. नागरिकांनी आजारी पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

स्टेरॉइडस, गर्भपातावरील औषधे ॲन्टीबायोटीक्स आदी औषधे रुग्णांच्या तोंडी मागणीवर विक्री केली जाऊ नयेत यासाठी  औषध दुकानांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नोंदणीकृत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास अशा औषध दुकानदारांवर कडक कारवाई करण्याचेही आदेश अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त यांना दिले आहेत.

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

*महाराष्ट्रात सध्या तरी लॉकडाऊन नाही ; कडक निर्बंध लावण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निर्णय*


 महाराष्ट्रात सध्या तरी लॉकडाऊन नाही कडक निर्बंध लावण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निर्णय 
मुंबई दि.5:राज्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असली तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढती गर्दी आणि रुग्णसंख्या पाहता निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार राज्यसरकारने केला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात तासभर बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि मुख्य सचिवही उपस्थित होते. यावेळी राज्यात कोणताही लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कंटेन्मेट झोन वाढवणे, लसीकरण वेगाने करणे, रुग्णालयांची सज्जता आदींचा आढावा यावेळी घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली जाणार आहे.

राज्यातील कोरोनाचा आकडा काय?

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल 18 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 308 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासूनची आकडेवारी पाहिली तर राज्यात आतापर्यंत 67 लाख 30 हजार 494 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 65 लाख 18 हजार 916 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 1 लाख 41 हजार 573 झाली आहे.

ओमिक्रॉनचे 75 नवे रुग्ण

राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. राज्यात आज 75 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 40 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. आजच्या 75 रुग्णांसह राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 653 वर पोहोचली आहे.


*आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणासाठी ( ईडब्ल्यूएस’): ५ एकरची अट शिथिल करण्याबाबत ‘कॅबिनेट’मध्ये होणार चर्चा* *राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार- मंत्री अशोक चव्हाण यांचे सूतोवाच*

आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणासाठी ( ईडब्ल्यूएस’): ५ एकरची अट शिथिल करण्याबाबत ‘कॅबिनेट’मध्ये होणार चर्चा
राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार- मंत्री अशोक चव्हाण यांचे सूतोवाच
मुंबई, दि. ४ – आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणासाठी कमाल ५ एकर जमीन धारणेच्या मर्यादेची अट शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असून, यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून ही अट शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली जाईल, असे सूतोवाच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या अटीचा उल्लेख आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यात एकत्रित कुटुंबांची संख्या मोठी असून, अन्य कोणत्याही आरक्षणाचे लाभ मिळत नसलेले बहुतांश शेतकरी कुटूंब केंद्र सरकारच्या या अटीमुळे १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणापासून देखील वंचित राहणार आहेत. या गंभीर विषयासंदर्भात राज्य सरकारकडून केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. याबाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात जमीनधारणेचे प्रमाण जास्त आहे. केवळ या विभागांमध्येच नव्हे तर इतरही विभागांत अविभाजित कुटुंबांमध्ये ५ एकर पेक्षा जास्त शेतजमीन असू शकते. ५ एकर पेक्षा जास्त जमीन असली तरी बहुतांश शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रूपयांपेक्षा कमीच असते. त्यामुळे मराठा समाजासह इतर अनेक समाजातील शेतकऱ्यांना केंद्राच्या या शिफारसीमुळे मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने कमाल ५ एकर जमीनधारणेच्या अटीवर फेरविचार करावा आणि सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुधारित प्रतिज्ञापत्र दाखल करावे, अशी आमची मागणी असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

*कराड: येथील महिला खुनाचा चार तासात उलगाडा :खून झालेली महिला पाटण तालुक्यातील महिंद गावातील*

कराड येथील महिला खुनाचा चार तासात उलगाडा :पाटण तालुक्यातील महिंद येथील संबंधित महिला 

कराड : येथे एका महिलेचा साेमवारी खून झाला हाेता. संबंधित महिला काेण हाेती हे त्यावेळी घटनास्थळी गेलेल्या पाेलिसांना समजू शकले नव्हते. त्यानंतर पाेलिसांनी अवघ्या चार तासात या खूनाचा छडा लावून एकास अटक  केली आहे. खून झालेल्या महिलेच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली. त्याच्या आधारे संबंधित महिला ही महिंद (ता. पाटण) येथील असल्याचे समजले आहे . याच चिठ्ठीमुळे संबंधित संशयित आराेपीस पकडण्यात पाेलिसांना यश आले आहे.

पाेलिसांनी अत्यंत हुशारीने संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळल्ल्याने आता पाेलिसांची समाज माध्यमातून काैतुक केले जात आहे.

दरम्यान पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार खून झालेल्या महिलेचे नाव वनिता आत्माराम साळूंखे वय ३० ,रा. महिंद, ता. पाटण असे आहे. तिने लिहिलेल्या चिठ्ठीत एका व्यक्तीचे नाव आहे. त्या व्यक्तीने  मला लग्नाचं आमिष दाखवून आणले, माझ्याशी संबंध ठेवले. माझ्या बराेबर लग्नाचं खोटे आश्वासन दिले पण आत्ता लग्न करत नसून मला मारहाण करुन माझ्याशी संबंध ठेवत होता. माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाले किंवा मी जीव दिला तर त्यास ताे जबाबदार आहे असा मजूकर हाेता. त्याअनुषंगाने संबंधित व्यक्तीची चाैकशी केली असता. एकाकडून खात्रीशिर माहिती मिळताच संशयित आराेपीला पकडण्यात आले आहे.शरद हणमंत ताटे (वय 30, रा. येरवळे, ता. कराड) असे संशयिताचे नाव आहे


सोमवार, ३ जानेवारी, २०२२

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘शिवडी न्हावाशेवा सी लिंक’ची पाहणी

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘शिवडी न्हावाशेवा सी लिंक’ची पाहणी

शिवडी - न्हावा शेवा सी लिंक वरील ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची यशस्वी उभारणी

प्रकल्पाचे ६५ टक्के काम पूर्ण; डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण सी लिंकचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

मुंबई, दि. ३ – मुंबई शहराला नवी मुंबई शहर आणि रायगड जिल्ह्याशी जोडणाऱ्या शिवडी न्हावाशेवा पारबंदर प्रकल्पातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आज पार पडला. आज या प्रकल्पात ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची यशस्वीरीत्या उभारणी करण्यात आली. नगरविकास मंत्री स्पीड बोटीतून या कामाची पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह खासदार राजन विचारे, एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवडी आणि न्हावाशेवा या दरम्यान उभारण्यात येत असलेला पारबंदर मार्ग हा भारतातील सगळ्यात मोठा पारबंदर मार्ग आहे. तब्बल २२ किलोमीटर लांबीचा असा हा पारबंदर (सी लिंक) प्रकल्प असून १८ हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. आज या प्रकल्पात ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची उभारणी करण्यात आली. टाटा प्रोजेक्ट्स- देवू जेव्ही यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात येत असून असे ३२ गाळे बसवून हा ७.८१ किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या गाळ्याच्या फॅब्रिकेशनचे काम जपान, दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएतनाम, म्यानमार या देशात करण्यात आले असून १८० मीटर एवढ्या लांबीच्या अजस्त्र गर्डर तयार करण्यात आले आहे. या संपूर्ण स्ट्रक्चरचे लोंचिंग करण्यासाठी एका खास बार्जची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवाजी नगर येथील इंटरचेंजचे काम देखील करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम जवळपास ६५ टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.मुंबई-नवी मुंबई दरम्यानचे अंतर कमी होणारठाणे-रायगड जिल्हे एकमेकांना जोडले जाणार – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

शिवडी न्हावाशेवा पारबंदर प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबई या शहरातील अंतर कमी होणार असून ते २० मिनिटात कापता येणे शक्य होणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील चिरले पर्यंत हा पारबंदर प्रकल्प जाणार असल्याने ठाणे आणि रायगड हे जिल्हे देखील एकमेकांना जोडले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मोठी मदत होणार असून त्याद्वारे जेएनपीटी बंदरातून होणारी वाहतूक अधिक वेगवान होणार असल्याचे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

या गाळ्यांच्या लॉचिंगसाठी कारंजा येथे विशेष जोडणी यार्ड  तयार करण्यात आले असून तिथे जोडणी करून ते समुद्रात नेण्यात येतात. त्यासाठी खास बार्ज तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अतिशय नियोजनबद्धरित्या हे महाकाय गाळे लाँच करण्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी स्पष्ट केले.

आज करण्यात आलेल्या ह्या कामामुळे हा पारबंदर प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...