महाराष्ट्रात सध्या तरी लॉकडाऊन नाही कडक निर्बंध लावण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निर्णय मुंबई दि.5:राज्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असली तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढती गर्दी आणि रुग्णसंख्या पाहता निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार राज्यसरकारने केला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात तासभर बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि मुख्य सचिवही उपस्थित होते. यावेळी राज्यात कोणताही लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कंटेन्मेट झोन वाढवणे, लसीकरण वेगाने करणे, रुग्णालयांची सज्जता आदींचा आढावा यावेळी घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली जाणार आहे.राज्यातील कोरोनाचा आकडा काय?
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल 18 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 308 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासूनची आकडेवारी पाहिली तर राज्यात आतापर्यंत 67 लाख 30 हजार 494 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 65 लाख 18 हजार 916 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 1 लाख 41 हजार 573 झाली आहे.
ओमिक्रॉनचे 75 नवे रुग्ण
राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. राज्यात आज 75 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 40 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. आजच्या 75 रुग्णांसह राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 653 वर पोहोचली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा