शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

*कराड : पर्यावरणाच्या संतुलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हि काळाची गरज - पृथ्वीराज चव्हाण*

 *कराड : पर्यावरणाच्या संतुलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हि काळाची गरज - पृथ्वीराज चव्हाण* 
 *कराड:* स्वच्छ पर्यावरणासाठी पुढील काही वर्षांमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने वापरणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त सौर ऊर्जा व ई-वाहन प्रदर्शनाचे आयोजन मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले होते या सप्ताहाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्यासह नगरसेवक नगरसेविका व नागरिक उपस्थित होते. 

 *यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,* ऑटो इंडस्ट्री मध्ये आज झपाट्याने वाढ होत आहे, यामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मितीच्या काही कंपन्यांनी भारतात आपले जाळे मजबूत केले आहे. या मोटारसायकलींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढले आहे, कार उत्पादनाची गरज लक्षात घेता त्याचीसुद्धा उत्पादन वाढ भविष्यात होईल. भविष्यात नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या वाहनाचा वापर करणे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. 

यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्येक स्टॉल ला भेट दिली तसेच त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादन खर्च व कालावधी, वाहनाचा दर्जा, बॅटरी क्षमता, चार्जिंग कालावधी याची माहिती घेतली तसेच वाहनांच्या विक्री पश्चात सर्व्हिस चा सुद्धा विचार महत्वाचा असल्याचे त्यांनी इलेक्ट्रिक वाहन डिस्ट्रिब्युटर यांना सांगितले. 
 ---------------------------------------------------

*सातारा : जिल्हा नियोजन कार्यकारी समिती बैठक**एकूण 394 कोटी 25 लक्षच्या प्रारुप आराखड्यास कार्यकारी समितीची मान्यता*

*सातारा : जिल्हा नियोजन कार्यकारी समिती बैठक*
*एकूण 394 कोटी 25 लक्षच्या प्रारुप आराखड्यास कार्यकारी समितीची मान्यता*

  सातारा दि. 16 : सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सातारा जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2022-23 च्या कमाल नियतव्यय मर्यादा रुपये 314 कोटी 42 लक्ष आणि अनुसूचित जाती योजनेअंतर्गत 79 कोटी 83 लक्ष रुपये अशा एकूण 394 कोटी 25 लक्ष  रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.

  या बैठकीला जिल्हा नियोजन कार्यकारी समितीचे सदस्य आमदार मकरंद पाटील, सुनिल माने, विजय कणसे, राजेश कुंभारदरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सर्वसाधारण योजनेअंतर्गत कृषि व संलग्न सेवेसाठी 33 कोटी 33 लक्ष, ग्रामीण विकास 27 कोटी 50 लक्ष, सामाजिक सामुहिक सेवा 111 कोटी 27 लक्ष, लघु पाटबंधारे 20 कोटी 75 लक्ष, ऊर्जा  विकास 21 कोटी 40 लक्ष, उद्योग व खाणकाम 71 लक्ष, परिवहन 60 कोटी 34 लक्ष, सामान्य सेवा 13 कोटी 22 लक्ष, सामान्य आर्थिक सेवा 75  लक्ष आणि नाविन्यपूर्ण योजनेसाठी 14 कोटी 15 लक्ष, महिला व बाल कल्याण 9 कोटी 43 लक्ष व इतर 1 कोटी 57 लक्ष रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे.

            अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत कृषि व संलग्न सेवेसाठी 6 कोटी 41 लक्ष, ऊर्जा  विकास 8 कोटी 50 लक्ष, उद्योग व खाणकाम 17 लक्ष, वाहतूक व दळणवळण 7 कोटी, सामाजिक सामुहिक सेवा 36 कोटी 77 लक्ष, मागासवर्गीयांचे कल्याण 18 कोटी 57 लक्ष आणि नाविन्यपूर्ण योजनेसाठी 2 कोटी 39 लक्ष रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे.

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात ड्रोनद्वारे लस वाहतूक यशस्वी

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात ड्रोनद्वारे लस वाहतूक यशस्वी

पालघर दि. 16 :- सध्या संपूर्ण जगात वेगवेगळया क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपली कामे जलद व सुलभरित्या पार पाडली जात आहेत. या श्रृंखलेमध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम व लांबच्या कार्यक्षेत्रात ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत आहे. सदर प्रयोग महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लू इन्फिनिटी इनोवेशन लॅब व आय आय एफ एल फाऊंडेशनच्या मदतीने राबविण्यात येत आहे.

या उपक्रमामध्ये ड्रोनद्वारे लसवाहतुकीमुळे अतिदुर्गम भागात जलद गतीने लस पोहोचवता येईल ज्यामुळे शीतसाखळी अबाधित राहील आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या वेळेची व मनुष्यबळाची बचत होईल.

हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील काळात ड्रोनद्वारे अत्यावश्यक औषधे पाठविणे, रक्त पाठविणे, प्रत्यारोपणाकरिता अवयव एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत पाठविणे विना अडथळा व अत्यंत कमी वेळामध्ये सहज शक्य होईल.

सदर उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास व सार्वजनिक आरोग्य आयुक्त तथा अभियान संचालक एन.एच.एम डॉ. रामास्वामी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हयाच्या आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांचा सहकार्याने राबविण्यात येत आहे. हा उपक्रम राबविताना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संचालक सार्वजनिक आरोग्य विभाग आणि उपसंचालक मुंबई मंडळ ठाणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य उपयुक्त ठरले आहे.

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन

मुंबई, दि. १६ – कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२२ असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ३१ मार्च ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.

इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/ अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ५ एप्रिल ते २५ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जुलै २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.

परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.

कुंभारगाव : ढेबेवाडी पोलिसांची कारवाई तीन तासात चोरीचा पर्दापाश : आरोपी गजाआड



कुंभारगाव : ढेबेवाडी पोलिसांची कारवाई तीन तासात चोरीचा पर्दापाश : आरोपी गजाआड

कुंभारगाव कळंत्रेवाडी भैरवदरा तालुका पाटण येथे काल दुपारी तीन ते चारच्या दरम्यान घरफोडीचा  प्रकार घडला होता तो तीन तासात पोलिसांनी उघडकीस आणला या घरफोडी मध्ये आरोपीने १ लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता तो त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला
      याबाबत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी पोलीस ठाण्यात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली याबाबत माहिती देताना ते म्हणाले फिर्यादी आनंदा सखाराम यादव यांच्या पत्नी काल दुपारी घराच्या आतील दरवाजा बंद करून दळण दळण्यासाठी गावात गेल्या होत्या त्या दळण दळण्यासाठी  गेल्याचे समजल्यानंतर आरोपी तुषार तानाजी यादव वय २४ वर्षे राहणार कळंत्रे वाडी याने घराच्या माळ्यावरून जाऊन घरातील कपाटाचा दरवाजा उघडून कपाटा मधील एक मंगळसूत्र एक सव्वा तोळ्याची सोन्याची चैन कानातील बुगडी व १३ हजार रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिल्यानंतर आम्ही फिर्यादीच्या घराची पाहणी केल्यानंतर तेथेच राहणारा राहणाऱ्या  तुषार आनंदा यादव याची हालचाल  संशयास्पद वाटली त्यानंतर त्यायाकडे चौकशी केली त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली 
      त्यानंतर  त्याला पोलिसी खाक्या  दाखवल्यानंतर   आपण चोरी केल्याची त्याने कबुली दिली त्यानंतर त्याला अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याने चारून नेलेला मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला  घटनास्थळी  पोलीस विभागीय अधिकारी रणजीत पाटील यांनी भेट दिली  त्यांच्या मार्गदर्शनाखाली  घरफोडीचा प्रकार उघडकीस आणण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक एम एस तलबर पोलीस संजय राक्षे प्रशांत शेवाळे संदेश लादे ज्ञानदेव मुळगावकर नवनाथ कुंभार पोलीस पाटील प्रवीण मोरे व अमित शिंदे यांनी सहकार्य केले

बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्याचा निर्णय शेतकरी हिताचा, पशुधनाचं संवर्धन करणारा – उपमुख्यमंत्री अजित पवार

बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्याचा निर्णय शेतकरी हिताचा, पशुधनाचं संवर्धन करणारा – उपमुख्यमंत्री अजित पवार

बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वागत

मुंबई, दि. 16 :- “राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या लढाईत आदरणीय शरद पवार साहेबांनी लक्ष घातलं. मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेत्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही लढाई ध्येयनिष्ठेनं, संपूर्ण ताकदीनं लढली. या लढाईत सहभागी सर्व नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारनं सर्वशक्तिनिशी या न्यायालयीन लढाईला बळ दिलं. त्यातून मिळालेलं हे यश राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आनंद व्यक्त केला.

बैलगाडा शर्यती आता राज्यात पुन्हा सुरु होतील. मात्र शेतकऱ्यांनी सर्व अटी, नियमांचं पालन करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं बंदी उठवण्यासंदर्भात आज दिलेल्या निर्णयावर पुन्हा घटनापीठ विचार करणार असलं तरी, तिथेही शेतकऱ्यांचाच विजय होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

नियमांचे पालन न करणाऱ्या 52 व्यक्तींकडून 12 हजार 800 इतका दंड वसुलप्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन

नियमांचे पालन न करणाऱ्या 52 व्यक्तींकडून 12 हजार 800 इतका दंड वसुल
प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन
सातारा दि. 15 :  दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेला कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर    जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी आदेश काढून निर्बंध आखून दिलेले आहेत.   निर्बंधांचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील 52 व्यक्तींवर कारवाई करुन 12 हजार 800 इतका दंड वसुल करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाबाबत  प्रशासनाने   दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

   सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील मोठया गांवामध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसलेचे दिसून येत आहे.  जिल्हयातील पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार यांना मोठया आस्थापना व गर्दीचे ठिकाणे येथे भेट देऊन जेथे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येईल तेथे दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 

सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन यांचेमार्फत दि. 29 नोव्हेंबर ते दि. 14 डिसेंबर 2021 पर्यंत सातारा जिल्हयात विनामास्क फिरणा-या 52 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 12 हजार 800  इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे.

  सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील स्थानिक प्रशासनाकडून वाहनाव्दारे व्यावसायिक तसेच इतर दुकानदार यांना त्यांचे आस्थापनांमध्ये मास्क घालणे, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा  वापर करण्याबाबत लाऊडस्पिकरव्दारे सूचना देण्यात आलेल्या आहेत.  

*नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस वेळेत घ्यावे*

 सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी   शासनामार्फत सुरु असलेल्या कोरोना प्रतिबंधक  मोफत लसिकरणाचा लाभ घ्यावा व आपले दोन्ही लसीकरणाचे डोस वेळेत पूर्ण करुन घ्यावेत.   सातारा जिल्ह्याकरिता कोरोना संदर्भातीलनवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. जे कोणी कोविड अनुरुप वर्तनाचे किंवा कार्यपध्दतीचे पालन करणार नाही अशा व्यक्ति, संस्था किंवा आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी  कोविड  नियमांचे पालन करावे, असे आवाहनही श्री. सिंह यांनी  केले. 

*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...