सोमवार, १७ एप्रिल, २०२३

आ.बाळासाहेब पाटील यांचेकडून डाॅ.संदीप डाकवेंच्या कार्याची दखल

 

 



तळमावले/वार्ताहर

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणारे व आपल्या अंगभूत कला, लेखणीतून आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवलेले पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यसनमुक्तीचा ध्यास घेवून जनजागृतीसाठी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या या लिखाणाची दखल ‘वर्ल्ड गेटेस्ट बुक ऑफ रेकाॅर्ड’ ने घेतली आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव माजी सहकार व पणन मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा व विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांना पत्र पाठवून केला आहे.


अनेक जण व्यसनांच्या आहारी जात आहेत. व्यसनमुक्तीचे ध्येय घेवून डाकवे समाजात जनजागृती चे काम करीत आहेत. विविध लेख व समाजमाध्यमांवर ते लिखाण करुन जनजागृती करीत आहे. ‘निर्धार व्यसनमुक्तीचा’ या शीर्षकांतर्गत व्यसनमुक्ती या विषयावर त्यांनी लेख, बातम्या, फोटो फिचर, यशोगाथा इ. लिहून त्या प्रसिध्द केल्या आहेत. याबरोबर या बातम्यांचे हस्तलिखित, बातम्यांच्या कात्रणांचे प्रदर्शन, व्यंगचित्रे, पोस्टर प्रकाशन आदी नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
डाॅ.संदीप डाकवे यांच्या या कार्याची दखल माजी सहकारमंत्री आ.बाळासाहेब पाटील यांनी घेतली आहे.


 

 


मंगळवार, ११ एप्रिल, २०२३

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

 सातारा दि. 11 : निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्त झालेल्या तसेच सन 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 42 दि. 26 ऑगस्ट 2022  च्या कलम 7 नुसार एकूण 188  ग्रामपंचायत मधील 279 सदस्य व थेट सरपंचाच्या 12 रिक्त जागांच्या पोट निवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी महसूल प्रशांत आवटे यांनी कळविले.

            


पोट निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती / घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

            तालुकानिहाय रिक्त पदांच्या पोट निवडणूकांसाठी पात्र असणाऱ्या ग्रामपंयाचतींची संख्या पुढीलप्रमाणे . सातारा तालुक्यात 31 गांवे, कराड-19, खंडाळा -5, पाटण-13, वाई-9, महाबळेश्वर-32, कोरेगांव-19, माण-3, जावली-34, फलटण-11, खटाव तालुक्यातील 12 गावांचा समावेश आहे.

            वरील पोटनिवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावाचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे. तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक मंगळवार 18 एप्रिल 2023.  नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) मंगळवार दि. 25 एप्रिल ते मंगळवार दि. 2 मे 2023 सकाळी 11 ते दुपारी 3 वा. पर्यंत (शनिवार  दि. 29 , रविवार दि. 30 एप्रिल व सोमवार दि. 1 मे 2023 ची सार्वजनिक सुट्टी वगळून).  नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) बुधवार दि. 3 मे 2023 रोजी सकाळी  11 वा. पासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ) सोमवार दि. 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वा. पर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ सोमवार दि. 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वा. नंतर.  आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक गुरुवार दि. 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 वा. पासून सायं. 5.30 वा.पर्यंत. मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाणी व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील)  शुक्रवार दि. 19 मे 2023. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक बुधवार दि. 24 मे 2023 पर्यंत.

 

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

रेशीम शेतीने गणपत मदने यांच्या जीवनाला कलाटणी

 


पारंपरिक पद्धतीने शेती करताना ओढाताण होणारे कुटुंबीय… ते आज रेशीम शेतीच्या आधारावर मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण पूर्ण… माळशिरस तालुक्यातील गणपत मदने यांच्या जीवनाला रेशीम शेतीने खऱ्या आणि चांगल्या अर्थाने कलाटणी दिली आहे. माळशिरस तालुक्यातील साळमुखवाडी हे गणपत महादेव मदने यांचे गाव. त्यांची 7 एकर शेती आहे. त्यातील 3 एकर क्षेत्रावर रेशीम शेती ते करतात.

गणपत मदने पूर्वी पारंपरिक पद्धतीने ऊस, मका, ज्वारी ही पिके घेत. पण खर्च वजा जाता हातात काही मिळत नव्हतं. विशेष म्हणजे ऊस पिकासाठी येणारा खर्च, मिळणारे उत्पन्न आणि लागणारा कालावधी यांचा ताळमेळ बसत नसल्याने त्यांची खूप ओढाताण व्हायची. त्यांनी दूध व्यवसायही करून पाहिला. त्यांना ४ मुली व एक मुलगा. घरखर्च भागत नसल्याने घरची मंडळी शेजारी रोजंदारीने कामावर जात होती. स्पर्धेच्या युगात मुलांच्या शिक्षणाची व भविष्याची चिंता त्यांना सतावत असे.

अशा परिस्थितीत शेजारच्या सुरवसे भाऊसाहेबांनी केलेल्या रेशीमशेतीने श्री. मदने यांच्याही मनात आशेची पालवी फुटली. त्यांनी 2017 साली तुती लागवड करून रेशीम व्यवसायाचा श्रीगणेशा केला. पहिल्या वर्षी नफा कमी झाला. पण, मिळालेला अनुभव, शास्त्रोक्त मार्गदर्शन व त्रुटींची पूर्तता करत दुसऱ्या वर्षीपासून श्री. मदने यांनी प्रगतीकडे वाटचाल सुरू केली.

याबाबत गणपत मदने म्हणाले, मी 2017 ला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एक एकर क्षेत्रावर तुती लागवड करून रेशीम व्यवसायाची सुरूवात केली. पहिल्या वर्षी विशेष अनुभव नसल्याने आणि लागणारी औषधी, साहित्य सहज मिळत नसल्यामुळे फार कमी नफा झाला. पण दुसऱ्या वर्षी आजुबाजूच्या अनेक शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यास सुरवात केली होती. रेशीम कोष वाहतुकीसाठी सुरवसे भाऊसाहेब यांनी टेम्पो घेऊन कोष विक्री करण्याकरिता कर्नाटकातील रामनगर गाठले आणि खऱ्या अर्थाने आमच्या रेशीम उद्योगाला रंगत येऊ लागली.

गणपत मदने यांना रेशीम अधिकारी आणि समूह प्रमुख यांच्याकडून वेळोवेळी शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळत गेले. त्यांच्याच एका नातेवाईकाने रेशीम उद्योगास लागणारी औषधे आणि साहित्य याचे दुकान सुरू केले. त्यामुळे पंचक्रोशीतल्या सर्व शेतकऱ्यांची अडचण दूर झाली.

याबाबत गणपत मदने म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लागवड केल्याने घरच्या शेतात काम करून प्रत्येक आठवड्याला मजुरी, साहित्य खरेदीसाठी अनुदान आणि रेशीम संगोपन गृह यासाठी मला जवळपास पावणेतीन लाख रूपये मिळाले. रामनगरला कोष विक्री केल्याने दरपण चांगला मिळाला. प्रत्येक चिकातून एकरी 50 ते 60 हजार रूपये मिळत होते. अगदी कोरोनाच्या मंदीच्या काळात जगाचे व्यवहार ठप्प झाले असताना मी रेशीम शेतीमधून नफा मिळवला आहे. फेब्रुवारी 2023 अखेर गेल्या वर्षभरात मी साधारण 1500 अंडीपुंजाचे संगोपन घेतले आहे आणि त्यापासून मला आजअखेर 6 लाख रुपये नफा मिळाला.

गणपत मदने यांचे दर तीन महिन्याला दोन लॉट विक्रीसाठी जातात. हे कोष सातारा जिल्हा, आत्मा, सोलापूर आणि रामनगर (कर्नाटक) येथे विक्रीसाठी जातात. काही कंपन्या शेतावरही येऊन प्रत्यक्ष खरेदी करतात. जूनमध्ये दोन एकर क्षेत्रावर रेशीम शेती वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

गणपत मदने यांनी रेशीम शेतीच्या आधारावर मोठ्या मुलीचे लग्न, दोन मुलींचे डी. फार्म आणि एका मुलीचे एम. एस्सी (मॅथ्स) चे शिक्षण दिले. ती आज बँकेत नोकरी करत आहे. तसेच त्यांचा मुलगा बीसीएस अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. आता त्यांच्या घरचे मंडळी रोजंदारीवर जात नाहीत. याउलट चार ते पाच शेतमजूर त्यांच्या शेतात राबत आहेत. या सुखाच्या दिवसाला एकमेव कारण फक्त रेशीम शेती आहे, असे गणपत मदने अभिमानाने सांगतात. रेशीम शेतीमुळे त्यांच्या घरात सुख समृद्धी आली आहे.

कृषि यांत्रिकीकरणांतर्गत सातारा जिल्ह्यात ७ हजार ९९० जणांनी घेतला लाभ

 


शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे व कृषि क्षेत्रात ऊर्जेचा वापर वाढवणे या मुख्य उद्देशाने शासनाकडून कृषि यांत्रिकीकरण उप उभियान कार्यक्रम राबवण्यात येतो. सातारा जिल्ह्यात यंदाच्या वर्षी या योजनेंतर्गत 39 हजार 468 जणांची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 7 हजार 990 जणांनी या योजनाचा लाभ घेतला आहे. एकूण 42 कोटी रुपयांपेक्षा जास्ती अनुदान प्राप्त झाले आहे.

कृषि यांत्रिकीकरण अभियनांतर्गत विविध घटकांना अर्थसहाय्य करण्यात येते. त्यामध्ये कृषि यंत्र सामुग्री व उपकरणे खरेदी, भाडे तत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषि अवजारे बँक स्थापने, उच्च तंत्रज्ञान व उत्पादनक्षम आधारित साहित्याचे हब निर्मिती या घटकांचा समावेश आहे.

कृषि यंत्र सामुग्री व उपकरणे खरेदीसाठी अर्थसहाय्य – राज्यातील शेतकऱ्यांना कृषि यंत्रसामुग्री/अवजारे खरेदीस प्रोत्साहीत करणे व त्याद्वारे कृषि यंत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे हा या घटकाचा प्रमुख उद्देश आहे. विभागनिहाय पीक रचनेनुसार आवश्यक असलेली व पूर्व तपासणी केलेली दर्जेदार कृषि अवजारे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करुन देणे, शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार व मागणीप्रमाणे कृषि यंत्र सामुग्री / अवजारे उत्पादने अनुदानावर उपलब्ध करून देणे, कृषि उत्पादन प्रक्रियेत अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशांचाही यात समावेश आहे.

कृषि यांत्रिकीकरणांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित यंत्र व अवजारे, ट्रॅक्टर व पावर टिलर चलित यंत्र व औजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित अवजारे, प्रक्रिया युनिट्स, भाडे तत्वावर कृषि यंत्र व अवजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी या घटकांसाठी अनुदान दिले जाते.

या योजनेच्या लाभासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. एकत्रित संगणकीय सोडतीच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. या योजनेंतर्गत विविध घटकांसाठी ज्या योजनेतून अनुदान उपलब्ध होईल त्या योजनेतून संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार लाभ दिला जातो. शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण या घटकासाठी योजनानिहाय स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसून त्यांनी अर्ज केलेल्या बाबी ज्या ज्या योजनेतून उपलब्ध असतील त्या सर्व योजनांसाठी अर्जाचा विचार केला जाईल.

या योजनेंतर्गत पुढीलप्रमाणे अनुदान दिले जाते. ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक व महिला लाभार्थींना किंमतीच्या 50 टक्के किंवा 1 लाख 25 हजार रुपये या पैकी जे कमी असेल ते. इतर लाभार्थ्यांना 40 टक्के किंवा 1 लाख या पैकी जे कमी असेल ते, याप्रमाणे लाभ दिला जातो. इतर अवजारांसाठी कृषि यांत्रिकीकरण उपअभियानाच्या केंद्र शासनाने ठरवलेल्या जास्तीत जास्त मर्यादा किंवा संबंधित अवजारांच्या किंमतीची ठरलेली टक्केवारी यापैकी कमी असेल ते, यानुसार अनुदान दिले जाते.

शेतकऱ्यांनी यंत्र, अवजारे खरेदीचे देयक सादर केल्यानंतर क्षेत्रीय अधिकारी मोका तपासणी करतील. छाननीअंती अनुदानाबाबत क्षेत्रीय स्तरावरून शिफारस करण्यात येईल. त्यानंतर राज्यस्तरावरून शेतकऱ्यांच्या अधार सलग्न बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.

भाडेतत्वावरील कृषि यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषि अवजारे बँक स्थापनेकरिता अर्थसहाय्य – कोरडवाहू भागात कृषि अवजारे, उपकरणे खरेदी करण्यास शेतकऱ्यांना मर्यादा येतात. यासाठी शेतकऱ्यांना कृषि अवजारांच्या सेवा कमी दराने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कृषि अवजारे सेवा सुविधा केंद्र ( कृषि अवजारे बँक) स्थापन करणे हा मुख्य उद्देश आहे. तसेच यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, पीक रचनेनुसार पिकाच्या पेरणीपासून काढणीपश्चात प्रक्रियेपर्यंत शेतकऱ्यांना माफक दराने यांत्रिकीकरणाची सेवा – सुविधा भाडे तत्वावर उपलब्ध करुन देणे, लहान व सिमांतीक शेतकऱ्यांना कृषि यांत्रिकीकरण सुविधेचा लाभ देणे, या उद्देशांचाही समावेश आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. सोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, लाभार्थी अ.जा./अ.ज. प्रवर्गातील असल्यास वैध जात प्रमाणपत्राची प्रत, खरेदी करावयाच्या यंत्र / अवजारे संचाचे दरपत्रक व परिक्षण अहवाल, संस्थेच्या बँक पासबूकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, संस्थेशी संबंधित व्यक्तीच्या बँक सलग्न खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधिकृत केले असल्यास, प्राधिकृत केल्याचे पत्र व संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड / फोटो असलेले ओळखपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत.

स्थापन करण्यात येणाऱ्या अवजारे बँकेसाठी अवजारांची निवड ही स्थानिक पीक पद्धतीनुसार संबंधित पिकाचे पूर्वमाशगत ते काढणीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावरील आवश्यक कामांसाठी उपयोगात येतील अशा पद्धतीची असावी. स्थानिक परिस्थितीनुसार निवडक अवजारांचा संच करुन त्याप्रमाणे खरेदी करणे आवश्यक आहे. याकरिता भांडवली गुंतवणुकीच्या 40 टक्के किंवा अनुदानाची जास्तीतजास्त मर्यादा यापैकी जे कमी असेल त्या मर्यादेत अनुदान दिले जाते. म्हणजे बँक स्थापनेचा खर्च 10 लाखांपर्यंत असल्यास 4 लाखांपर्यंत अनुदान व 25 लाखांपर्यंत असल्यास 10 लाखांपर्यंत अनुदान दिले जाते.

अनुदान वाटपाची प्रक्रिया कृषि यंत्रसामुग्री खरेदी प्रमाणेच आहे. या अवजारे बँकेचे पर्यवेक्षण जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हे करतात.

शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ मिळवून देणारी ही योजना आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने शेती करणे  तसेच उत्पादनामध्ये वाढ होण्यासही यामुळे मदत होत आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही या योजनेचा चांगला फायदा होत आहे.

 

-हेमंतकुमार चव्हाण,

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, सातारा.

00000

रविवार, २ एप्रिल, २०२३

*आजोबांच्या स्मृतिप्रित्यर्थ नातीकडून मुलींसाठी रोख पारितोषिक*

आजोबांच्या स्मृतिप्रित्यर्थ नातीकडून मुलींसाठी रोख पारितोषिक
तळमावले/वार्ताहर
आपल्या दिवंगत आजोबांच्या स्मृतिप्रित्यर्थ नातीकडून मुलींसाठी रोख पारितोषिक देण्याचा संकल्प पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाकवे परिवाराने केला आहे. कु.सांची रेश्मा संदीप डाकवे हिचा पहिला वाढदिवस 4 एप्रिल, 2023 रोजी येत आहे. त्यानिमित्त तिच्या नावे ठेवपावती ठेवण्यात येणार असून या ठेवपावतीच्या व्याजाच्या रकमेतून न्यू इंग्लिश स्कूल काळगांवमध्ये इ.दहावीत मुलींमध्ये प्रथम येणाऱ्या मुलीस स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे सांचीला बर्थ डे गिफ्टऐवजी रु.200/-, रु.300/-, रु.500/- किंवा स्वइच्छेने पारितोषिकासाठी रक्कम देवून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन डाॅ.संदीप डाकवे व परिवाराने केले आहे.
यापूर्वी सांचीच्या बारशानिमित्त विविध क्षेत्रातील 13 महिलांचा नारी रत्न पुरस्कार देवून सन्मान केला होता. तसेच तिच्या बोरन्हाण समारंभाला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा संदेश देत महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप केले होते.
गतवर्षी सांचीचे आजोबा राजाराम डाकवे (तात्या) यांचे आकस्मिक निधन झाले. शेती आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिलेल्या तात्यांच्या आठवणी चिरकाल ठेवण्यासाठी इ.10 वी मध्ये प्रथम येणाऱ्या मुलीला हे पारितोषिक देण्याची संकल्पना श्रीमती गयाबाई डाकवे, डाॅ.संदीप डाकवे, सौ.रेश्मा डाकवे व परिवाराने मांडली आहे.
राजाराम डाकवे (तात्या) यांच्या निधनानंतर डाकवे परिवाराने रक्षाविसर्जन नदीत न करता त्यामध्ये वृक्षारोपण केले, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन, तात्यांच्या आठवणी जागवणारे ‘तीर्थरुप तात्या’ पुस्तकाचे प्रकाशन आदि नावीण्यपूर्ण उपक्रम राबवत त्यांच्या सामाजिक कार्याला सलाम केला आहे.
 यापूर्वी डाकवे परिवाराने चि.स्पंदन डाकवे याच्या वाढदिवसानिमित्त रु.35,000/- ची मदत, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला निधी, ग्रंथतुलेतून जमलेली पुस्तके जि.प.शाळेला, दिव्यांग मुलांना चित्रकलेचे साहित्य, शांताई फाऊंडेशन ला जीवनावश्यक  वस्तू, गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी, श्री बालाजी मतिमंद मुलांच्या शाळेस मदत, ऊसतोड मजूरांना दिवाळी कीट वाटप इ. उपक्रम राबवले आहेत.
तसेच विविध कौटुबिक समारंभानिमित्त मोफत शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, शालेय तक्त्यांचे वितरण, अनाथाश्रमात धान्याचे वाटप, ऊसतोड मजूरांना शाल वितरण, कापडी पिशव्यांवर शासकीय योजनांचे लोगो छापून त्यांचे वाटप, पत्रिकेतून समाजप्रबोधन, मान्यवरांचे स्वागत शाल श्रीफळ ऐवजी पुस्तकाने, अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर (भाऊ) यांची 83 चित्रे रेखाटून शुभेच्छा, 16 बाय 2 आकाराचे पोस्टर रेखाटून वारकऱ्यांना शुभेच्छा, छत्रीव्दारे व्यसनमुक्तीचा प्रयत्न, जटानिर्मूलनासाठी प्रयत्न, कॅलीग्राफीतून जवानांना सलाम, मोरपीस-सुपारी-जाळीदार पिंपळपान आणि खडूयावर कलाकृती, एक दिवा जवानांसाठी अशाप्रकारचे शेकडो नावीण्यपूर्ण उपक्रम राबवत सामाजिक भान जपण्याचे काम डाकवे परिवाराने केले आहे.
सामाजिक जबाबदारीचे भान ओळखत डाॅ.संदीप डाकवे व परिवाराने राबवलेले उपक्रम नक्कीच अभिनंदनीय आहेत. या उपक्रमाला बाळासाहेब कचरे, प्रा.ए.बी.कणसे, आई गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, भरत डाकवे, आप्पासोा निवडूंगे, सविता निवडूंगे तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभते. कुटूंबातील प्रत्येक कार्यक्रमामधून समाजासाठी काहीतरी करावे असा ध्यास डाकवे परिवाराने घेतला आहे. तसेच स्पंदन ट्रस्टच्या माध्यमातून तळागाळातील लोकांसाठी भरीव कामगिरी केली जात आहे.
आजोबांच्या स्मृतिप्रित्यर्थ नातीकडून मुलींसाठी रोख पारितोषिक ही संकल्पना लोकांना आवडेल असा आशावाद डाकवे कुटुंबाने व्यक्त केला आहे.


सासऱ्यांच्या आकस्मिक जाण्याचे दुःख अजूनही आमच्या कुटूंबावर आहे. परंतू याही स्थितीत कु.सांचीच्या प्रथम वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे. समाजभान जपणारा हा उपक्रम राबवला असल्याचे मत असे मत सांचीची आई सौ.रेश्मा डाकवे यांनी केले आहे.

रविवार, २६ मार्च, २०२३

स्पंदन दिवाळी अंक व सेल्फी विथ गुढी स्पर्धेचे निकाल जाहीर

स्पंदन दिवाळी अंक व सेल्फी विथ गुढी स्पर्धेचे निकाल जाहीर

तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट ने आयोजित केलेल्या दिवाळी अंक आणि सेल्फी विथ गुढी या स्पर्धांना संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फुर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला आहे. दिवाळी अंकासाठी महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा अखंडपणे जपण्यासाठी दिवाळी अंक स्पर्धा घेतली होती. तसेच ‘चला संस्कृती जपूया’ ही टॅगलाईन घेवून ‘सेल्फी विथ गुढी’ ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली होती. या दोन्ही स्पर्धांचे निकाल जाहीर झाले असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
दिवाळी अंक स्पर्धेत सर्जनशीलतेचा नवाविष्कार, ग्रामसेवा, गावगाथा, सुभाशित, रंगतदार, धगधगती मुंबई गुंफण, शब्द शंकरपाळी, गझल अमृत, शब्द शिवार, अवतरण-सकाळ, आयुष्मान, कृष्णाकाठ या अंकांना उत्कृष्ट दिवाळी अंकांचा सन्मान मिळाला आहे. या विजेत्यांना सन्मानचिन्ह, ग्रंथ आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
तसेच ‘सेल्फी विथ गुढी’ या स्पर्धेत सौ.ऐश्वर्या प्रसाद काटकर (सातारा), चैतन्य भास्कर करमरकर (सातारा) यांनी अनुक्रमे प्रथम व व्दितीय, जयवंत निवृत्ती सावंत (मुंबई) आणि विक्रम विष्णू करपे (देवाची आळंदी) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे. सौ.कविता सतीश कचरे (तळमावले) यांना उत्तेजनार्थ तर डाॅ.बलराज पाटील यांना विशेष पारितोषिक देण्यात आले आहे. या विजेत्या स्पर्धकांना आकर्षक गौरवचिन्ह, पुस्तक आणि अभिमानपत्र देण्यात येणार आहे.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने शेकडो नावीण्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवत आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. या कामाची दखल घेत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्कार, यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार इ.नी गौरवण्यात आले आहे. दिवाळी अंक स्पर्धा व सेल्फी विथ गुढी या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना लवकरच एका दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.

शनिवार, ४ मार्च, २०२३

वैराटवासी महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांचे देहावसान.

वैराटवासी महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांचे देहावसान.
श्री श्री 1008 प.पु.महामंडलेश्वर वैराटवासी स्वामी आबानंदगिरी महाराज (श्रीपंचदशनाम जुना भैरव आखाडा) श्री क्षेत्र वैराटगड यांचे शुक्रवार दि. 3 मार्च, 2023 रोजी सायंकाळी 7.25 वाजता देहावसान झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेमध्ये घालवले. अध्यात्माबरोबरच ‘‘मानवसेवा हीच ईश्वर सेवा’’ हे ब्रीद घेऊन जनसेवेचा नंदादीप त्यांनी अखंड तेवत ठेवला.
वैराटवासी आबानंदगिरी महाराज यांचा जन्म 15 मार्च, 1953 रोजी झाला. वडील सखाराम बळवंत पांचाळ व आई लक्ष्मीबाई यांच्या संस्कारात त्यांची जडणघडण झाली. सातारा जिल्ह्यातील वाझेगाव ता.फलटण हे आबानंदगिरी महाराजांचे मुळ गाव.
19 मे 1975 पासुन ते प.पु. स्वामी गगनगिरी महाराजांचे सान्निध्यात आले. गगनगड येथे ते गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला गेले आणि त्यांचे पाईक झाले. सन 1980 साली प.पु. स्वामी गगनगिरी महाराजांच्या कृपाशिर्वादाने बिंबातुन प्रतिबिंब शोधण्यासाठी स्वामी आबानंद कृष्णेच्या जवळ असलेल्या वैराटगडावर आले, ते लोकांतातुन एकांतात आले व एकांतात ध्यान धारणा करु लागले. अनेक वर्ष साधना केल्यानंतर आपल्या दिव्य साक्षात्कारांचा उपयोग दुःखी पिडीत जनतेसाठी करावा ही इच्छा जागृत झाली व महाराजांनी एकांतातून लोकांतात येण्याचे ठरविले.
1982 साली श्री वैराटगडावर शिवपिंड भूगर्भातून काढून श्री वैराटेश्वराची स्थापना केली. 1987 साली प.गगनगिरी महाराजांना वैराटगडावर आणले व त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनीत पावन केली. 15 मार्च, 1988 रोजी गगनगिरी महाराजांचे कृपाशिर्वादाने स्वामी आबानंदगिरी महाराजांनी परमशांतीधाम वृद्धाश्रम ट्रस्टची मुहुर्तमेढ रोवली. सुरवातीचे काही दिवस अगदी खडतर होते. दहा खोल्या उभ्या राहील्या. स्वामी महाराजांच्या चौकस वृत्तीने कालांतराने बघता बघता दोन मजली इमारत या ठिकाणी उभी राहीली. आश्रमात वृद्धांची हरेक प्रकारे काळजी घेतली जाते. निराधारांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जातो. शांतीधाम वृद्धाश्रम नव्हे तर आपले कुटुंबच वाटते.
श्री क्षेत्र वैराटगडाच्या कुशीत वसलेल्या कापसेवाडी या ठिकाणी गावकऱ्यांनी दान केलेल्या भूमीत शिवदत्त मठाची स्थापना करून महाराजांनी पवित्र असे ज्ञानदानाचे कार्य सुरु केले आहे. 2004 साली महंत आबानंदगिरी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून निराधार, निराक्षित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी महायोगी गगनगिरी विद्यार्थी वसतीगृह स्थापन करून मुलांची निवासाची व भोजनाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली तर महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालयाची स्थापना करून पंचक्रोशीतील मुलांच्या शिक्षणाची उत्तम सोय महाराजांनी केली.
आळंदी येथे गगनगिरी भक्त निवासाची सोय, पंढरपुर येथे गगनगिरी भक्त निवास, तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे साधुसंतासाठी भक्त निवासाची सोय केली आहे. प्रवचनाच्या माध्यमातून महाराजांनी समाजजागृती व अंधश्रध्दा निर्मुलनाची कामे त्यांनी केली. महंत आबानंदगिरी दिंडीच्या माध्यमातून महाराजांचे मार्गदर्शनाखाली सुमारे पाचशे पेक्षा जास्त भाविक आळंदी पंढरपुरची वारी करतात.
स्वामी आबानंदगिरी महाराज ‘जय गगनगिरी’ साप्ताहिक चालवतात. संत गाडगेबाबा आणि स्वामी विवेकानंद यांना आदर्श मानून महाराजांनी आपले जीवनक्रमण केले. त्यांच्या या कार्याला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मानाचा रायगड भूषण हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. स्वामी विवेकानंदानी स्थापन केलेल्या विश्वधर्म संसदेचे ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. रायगड जिल्हा वारकरी महामंडळाचे ते उपाध्यक्ष होते. मिडीया एवम् पोलिस पब्लीक ट्रस्ट नवी दिल्लीचे ते अध्यक्ष होते. नवी दिल्ली येथे त्यांना राजीव गांधी ग्लोबल पुरस्कार 2010 ला मिळाला आहे.
प.पु. महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराजांनी अनेक रंजल्या गांजल्या उपेक्षित लोकांना आभाळ माया देण्याचे काम निस्वार्थ भावनेने केले. एवढे मोठे कार्य करून सुद्धा ते कायम प्रसिद्धी पासुन दुर राहिले. अनेक जण भक्तीचा मार्ग स्वीकारतात मात्र दगडात देव शोधताना त्यांना माणसांमधील देव त्यांना दिसत नाही परंतु स्वामी आबानंदगिरी महाराज त्याला अपवाद होते. निस्सीम भक्तीच्या मार्गाने जातानाच वृद्ध, दिनदुबळयांच्या सेवेला त्यांनी वाहून घेतले होते. अशा समाजसेवी सेवाव्रती तपस्वी व्यक्तीमत्वास विनम्र अभिवादन...!



शब्दांकन: श्री.जयवंत तरडे
मुख्याध्यापक, महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालय
मो. 9767690087

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...