आजोबांच्या स्मृतिप्रित्यर्थ नातीकडून मुलींसाठी रोख पारितोषिक
तळमावले/वार्ताहर
आपल्या दिवंगत आजोबांच्या स्मृतिप्रित्यर्थ नातीकडून मुलींसाठी रोख पारितोषिक देण्याचा संकल्प पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाकवे परिवाराने केला आहे. कु.सांची रेश्मा संदीप डाकवे हिचा पहिला वाढदिवस 4 एप्रिल, 2023 रोजी येत आहे. त्यानिमित्त तिच्या नावे ठेवपावती ठेवण्यात येणार असून या ठेवपावतीच्या व्याजाच्या रकमेतून न्यू इंग्लिश स्कूल काळगांवमध्ये इ.दहावीत मुलींमध्ये प्रथम येणाऱ्या मुलीस स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे सांचीला बर्थ डे गिफ्टऐवजी रु.200/-, रु.300/-, रु.500/- किंवा स्वइच्छेने पारितोषिकासाठी रक्कम देवून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन डाॅ.संदीप डाकवे व परिवाराने केले आहे.
यापूर्वी सांचीच्या बारशानिमित्त विविध क्षेत्रातील 13 महिलांचा नारी रत्न पुरस्कार देवून सन्मान केला होता. तसेच तिच्या बोरन्हाण समारंभाला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा संदेश देत महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप केले होते.
गतवर्षी सांचीचे आजोबा राजाराम डाकवे (तात्या) यांचे आकस्मिक निधन झाले. शेती आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिलेल्या तात्यांच्या आठवणी चिरकाल ठेवण्यासाठी इ.10 वी मध्ये प्रथम येणाऱ्या मुलीला हे पारितोषिक देण्याची संकल्पना श्रीमती गयाबाई डाकवे, डाॅ.संदीप डाकवे, सौ.रेश्मा डाकवे व परिवाराने मांडली आहे.
राजाराम डाकवे (तात्या) यांच्या निधनानंतर डाकवे परिवाराने रक्षाविसर्जन नदीत न करता त्यामध्ये वृक्षारोपण केले, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन, तात्यांच्या आठवणी जागवणारे ‘तीर्थरुप तात्या’ पुस्तकाचे प्रकाशन आदि नावीण्यपूर्ण उपक्रम राबवत त्यांच्या सामाजिक कार्याला सलाम केला आहे.
यापूर्वी डाकवे परिवाराने चि.स्पंदन डाकवे याच्या वाढदिवसानिमित्त रु.35,000/- ची मदत, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला निधी, ग्रंथतुलेतून जमलेली पुस्तके जि.प.शाळेला, दिव्यांग मुलांना चित्रकलेचे साहित्य, शांताई फाऊंडेशन ला जीवनावश्यक वस्तू, गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी, श्री बालाजी मतिमंद मुलांच्या शाळेस मदत, ऊसतोड मजूरांना दिवाळी कीट वाटप इ. उपक्रम राबवले आहेत.
तसेच विविध कौटुबिक समारंभानिमित्त मोफत शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, शालेय तक्त्यांचे वितरण, अनाथाश्रमात धान्याचे वाटप, ऊसतोड मजूरांना शाल वितरण, कापडी पिशव्यांवर शासकीय योजनांचे लोगो छापून त्यांचे वाटप, पत्रिकेतून समाजप्रबोधन, मान्यवरांचे स्वागत शाल श्रीफळ ऐवजी पुस्तकाने, अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर (भाऊ) यांची 83 चित्रे रेखाटून शुभेच्छा, 16 बाय 2 आकाराचे पोस्टर रेखाटून वारकऱ्यांना शुभेच्छा, छत्रीव्दारे व्यसनमुक्तीचा प्रयत्न, जटानिर्मूलनासाठी प्रयत्न, कॅलीग्राफीतून जवानांना सलाम, मोरपीस-सुपारी-जाळीदार पिंपळपान आणि खडूयावर कलाकृती, एक दिवा जवानांसाठी अशाप्रकारचे शेकडो नावीण्यपूर्ण उपक्रम राबवत सामाजिक भान जपण्याचे काम डाकवे परिवाराने केले आहे.
सामाजिक जबाबदारीचे भान ओळखत डाॅ.संदीप डाकवे व परिवाराने राबवलेले उपक्रम नक्कीच अभिनंदनीय आहेत. या उपक्रमाला बाळासाहेब कचरे, प्रा.ए.बी.कणसे, आई गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, भरत डाकवे, आप्पासोा निवडूंगे, सविता निवडूंगे तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभते. कुटूंबातील प्रत्येक कार्यक्रमामधून समाजासाठी काहीतरी करावे असा ध्यास डाकवे परिवाराने घेतला आहे. तसेच स्पंदन ट्रस्टच्या माध्यमातून तळागाळातील लोकांसाठी भरीव कामगिरी केली जात आहे.
आजोबांच्या स्मृतिप्रित्यर्थ नातीकडून मुलींसाठी रोख पारितोषिक ही संकल्पना लोकांना आवडेल असा आशावाद डाकवे कुटुंबाने व्यक्त केला आहे.
सासऱ्यांच्या आकस्मिक जाण्याचे दुःख अजूनही आमच्या कुटूंबावर आहे. परंतू याही स्थितीत कु.सांचीच्या प्रथम वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे. समाजभान जपणारा हा उपक्रम राबवला असल्याचे मत असे मत सांचीची आई सौ.रेश्मा डाकवे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा