संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५
मानखुर्द : शेवाळे कुटुंबात उमेदवारीचा पेच; माजी नगरसेविकेचा अचानक झालेल्या प्रभाग बदलामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण.
साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानखुर्द परिसरातील राजकारण तापू लागले असून उमेदवारीच्या गणितांमुळे शिवसेनेत (शिंदे गट) अंतर्गत चर्चांना वेग आला आहे. मानखुर्दमधील प्रभाग क्रमांक १४२ मधून माजी नगरसेविका वैशाली शेवाळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच, अचानक झालेल्या प्रभाग बदलामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
प्रभाग १४२ मधून यापूर्वी एसटी आरक्षणातून निवडून आलेल्या वैशाली शेवाळे यांनी यावेळीही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती. २०१७ नंतर त्यांनी प्रभागातील तळागाळातील नागरिकांशी थेट संपर्क साधत काम केल्याने त्यांची स्वतंत्र ओळख तयार झाली होती. त्यामुळे आरक्षण सर्वसाधारण महिला गटासाठी खुले झाल्यानंतरही त्या पुन्हा याच प्रभागातून लढतील, असा अंदाज व्यक्त होत होता.
मात्र, याच दरम्यान शिवसेनेचे (शिंदे) नेते व माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांनी देखील प्रभाग १४२ मधून नगरसेविका पदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्ये उमेदवारीचा पेच निर्माण झाला. अखेर नाईलाजाने वैशाली शेवाळे यांना प्रभाग १४२ सोडून धारावीतील प्रभाग क्रमांक १८३ मधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
विशेष म्हणजे, २०१२ पासून मानखुर्दमधील प्रभाग १४२ मध्ये शेवाळे कुटुंबाचे वर्चस्व आहे. यावेळीही त्या कुटुंबातीलच सदस्य उमेदवारीसाठी पुढे आल्याने विरोधकांकडून घराणेशाहीचा आरोपही केला जात आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राहुल शेवाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर वैशाली शेवाळे यांनीही ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटाची वाट धरली.
दरम्यान, कामिनी शेवाळे या गेल्या अनेक वर्षांपासून अप्रत्यक्षपणे राजकारणात सक्रिय आहेत. त्या २००२ साली भायखळा येथून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. २०१७ साली पुन्हा त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर सामाजिक कार्यक्रम, महिला मेळावे, हळदी-कुंकू, मंगळागौर यांसारख्या उपक्रमांमधून त्यांचा जनसंपर्क कायम राहिला आहे. त्यामुळे यावेळी पुन्हा नगरसेविका पदासाठी त्या प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे.
या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया देताना माजी नगरसेविका वैशाली शेवाळे म्हणाल्या, “माझा जन्म धारावीतील आहे. यापूर्वी सासरी म्हणजे मानखुर्दमध्ये जनसेवेची संधी मिळाली. त्या प्रभागातील काम पाहून धारावीतील नागरिकांनी मला तिथून निवडणूक लढवण्याची मागणी केली. त्यामुळे मी प्रभाग १४२ सोडून १८३ मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.”
दरम्यान, याबाबत कामिनी शेवाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, ‘जाऊबाई जोरात’ या चर्चेमुळे मानखुर्द आणि धारावी परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी निवडणुकीत शेवाळे कुटुंबाची रणनीती काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा