तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील सलतेवाडी (वाझोली) येथील श्रीमती झिंगुबाई भैरु सलते यांचे काही दिवसापूर्वी वयाच्या 110 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. कोरोना संसर्गामुळे रक्षाविसर्जनानंतर त्यांचा कोणताही धार्मिक विधी केला नाही. मात्र त्यांच्या स्मृती जपण्यासाठी 110 झाडे लावण्याचा निर्णय पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांच्या कुटूंबियांनी व नातेवाईकांनी केला आहे. झिंगुबाई सलते या डाॅ.डाकवे यांच्या आजी होत. त्यांच्या उत्तर कार्यादिवशी नैवेद्य वगळता इतर सर्व कार्यक्रम टाळून प्रातिनिधिक स्वरुपात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी झिंगुबाई सलते यांच्या मुली सौ.गयाबाई डाकवे, श्रीमती पारुबाई येळवे, नातू डाॅ.संदीप डाकवे, नातसून सौ.रेश्मा डाकवे, परतवंडे पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे, चि.स्पंदन डाकवे व अन्य उपस्थित होते. डाकवे परिवाराने वृक्षारोपनाला भावनिकतेची जोड दिली.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पर्यावरणपूरक वृक्ष, रोपटी लावून आजीच्या स्मृती चिरकाल टिकवण्यासोबतच समाजऋण व निसर्गऋण फेडण्याचा शाश्वत प्रयत्न या निमित्ताने केला आहे. अशा स्वरुपाच्या वृक्षारोपनाने प्रियजनांच्या आठवणी चिरंतन स्मृतीत राहतील व पुढील पिढीपुढे एक चांगला आदर्श ठेवता येईल.
‘‘वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी होत असून याचे दुष्परिणाम दिसत आहेत. यासाठी मोठया प्रमाणात वृक्षलागवड व त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. विविध प्रकारची झाडे उपलब्ध झाल्यानंतर 110 झाडे लावून व त्याचे संवर्धन करुन आजीच्या स्मृती जपणार आहे’’.
- डाॅ.संदीप डाकवे, संस्थापक/अध्यक्ष, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा