तब्येती बाबत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून विचारणा झाल्यास खरी ती माहिती दयावी
सातारा दि. 18 : नागरिकांनी व बाहेरगावावरुन आलेल्या आपल्या नातेवाईकांची माहिती न लपवता आपल्याकडे येणाऱ्या आशा वर्कर, सरपंच, पोलीस पाटील यांना योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
जगामध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे. विशेषत: महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे येथे त्याचा प्रसार जास्त झाला आहे. सातारा जिल्ह्यातील नागरिक विविध कामासाठी मुंबई, पुणे व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात गेले आहेत. या परिस्थितीत घराच्या ओढीने ते आपल्या घरी परतत आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये दुर्दैवाने सातारा जिल्ह्यात एकूण 38 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 16 नागरिकांचा मृत्यू हा प्रशासनाची इच्छा असतानाही त्यांच्यावर वेळीच योग्य उपचार न झाल्याने या नागरिकांचा त्यांच्या घरी किंवा ते ज्या ठिकाणी विलगीकरणात होते त्या ठिकाणी झाला आहे. नागरिकांनी आपल्या गावामध्ये आलेले नागरिक, ग्रामस्थ यांची माहिती द्यावी. रोगाची काही लक्षणं दिसत असतील तर वेळीच त्याची माहिती द्यावी. वेळीच उपचार झाल्यास या साथीच्या रोगामध्ये पेशंट हा निश्चितच बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता प्रशासनाला आपली माहिती देण्याचे सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा