शनिवार, १४ मार्च, २०२०

पाटण:- 107 ग्रामपंचायतींची ऑगस्ट महिन्यात होणार निवडणुका

पाटण /वार्ताहर :- 

पाटण तालुक्‍यात 241 ग्रामपंचायती आहेत.जुलै महिन्यात त्यातील 107 ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम ऑगस्टमध्ये जाहीर होणार आहे. तालुक्‍यात पुन्हा ग्रामपंचायतीच्या निमित्ताने देसाई-पाटणकर दोन्ही गटात ग्रामपंचायत निवडणुकीचा सामना रंगणार असल्याची चर्चा आहे

 ग्रामपंचायतीच्या निवडणुका मोठ्या चुरशीने लढल्या जातात. आगामी काळात ऑगस्ट महिन्यात पाटण तालुक्‍यातील 107 ग्रामपंचायतींच्या निवडणूका होणार असून त्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतींच्या वॉर्ड प्रस्तावांची कामे तहसील कार्यालयातील प्रशासनाकडून अंतिम टप्प्यात आली आहेत.

पाटण तालुक्‍यात विधानसभेच्या निवडणुकापेक्षा स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायतीच्या निवडणूका मोठ्या चुरशीने लढल्या जातात. आत्तापासूनच काहीजण सरपंच पदासाठी फिल्डिंग लावून बसले आहेत. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या निवडणूका कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या असल्याने वॉर्ड प्रस्तावानंतर तालुक्‍यात देसाई-पाटणकर गटाचे कार्यकर्ते ग्रामपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जोरदार कामाला लागले आहेत.

भाजप सरकारने अस्तित्वात आणलेल्या थेट जनतेतून सरपंच निवडण्याच्या प्रक्रियेला महाविकास आघाडी शासनाने बदल केला आहे. त्यामुळे थेट निवडणुकीद्वारे सरपंच निवड होणार की निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांकडून सरपंच निवडणार याची चर्चा सुरू आहे.

तालुक्‍यात जवळपास अनेक गावांमध्ये मंत्री शंभूराज देसाई विरुद्ध माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटात दुरंगी लढत बघावयास मिळते. यावेळी राज्यातील महाविकास आघाडीचा फार्म्युला बाजूला ठेवून गावागावात देसाईविरुद्ध पाटणकर गट असाच संघर्ष बघावयास मिळण्याची शक्यता आहे कारण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन शंभर दिवस उलटले तरी पाटणमध्ये मात्र नेत्यांचे मनोमिलन झाल्याचे दिसत नाही. उलट एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण दोन्ही गटांकडून चालूच आहे. याचा प्रत्ययही पंचायत समितीत घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात दिसून आला. त्यामुळे अजूनही दोघांमध्ये मतभेद कायम असल्याचे दिसते. साहजिकच ग्रामपंचायत निवडणूका राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अर्थात देसाई विरुद्ध पाटणकर गट होणार असे दिसते.

सध्या पाटण तालुक्‍यातील राजकीय स्थितीचा आढावा घेतल्यास सलग दोनवेळा आमदारकीची माळ येथील जनतेने शंभूराज देसाई यांच्या गळ्यात घातली तर पंचायत समितीची सत्ता मात्र विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने स्थापन केली आहे.

तालुक्‍यातील ग्रामपंचायतींचा राजकीय आढावा घेता मंत्री शंभूराज देसाई यांच्यापेक्षा माजी मंत्री पाटणकर यांचे नेतृत्व मांडणाऱ्या ग्रामपंचायती जास्त आहेत. पंचायत समिती व जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादीकडे असल्याने त्याचा फायदा या निवडणुकीत पाटणकर गटाला मिळणार हे निश्‍चित मानले जात आहे. मात्र, मंत्री देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी तालुक्‍यात होणाऱ्या आगामी ग्रामपंचायतीसाठी गोळाबेरीज आतापासूनच सुरू केली आहे.

तसेच आगामी जिल्हा बॅंक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणूक बाबत धोरण ठरवण्यासाठी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने करून घेण्यात दोन्ही नेत्यांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे मध्यंतरीच्या काळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे वातावरण पुन्हा निवळले. मल्हारपेठ, मोरगिरी, कोयनेचा काही भाग यावर सध्या मंत्री शंभूराज देसाई यांचे वर्चस्व आहे. पाटणकर गटाने या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर गावागावात दुरूस्ती करून राजकीय दबदबा कायम राखला आहे. ऑगस्ट महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा सर्वात मोठ्या टप्पा आहे. यामध्ये दोन्ही गटात मोठा संघर्ष पहावयास मिळणार आहे. तसेच ढेबेवाडी विभागात नरेंद्र पाटील आणि हिंदुराव पाटील यांच्यात संघर्ष बघायला मिळतो.

पाटण तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात वॉर्ड प्रस्ताव करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीची आरक्षणे जाहीर होऊन निवडणुकांचा कार्यक्रम ऑगस्ट महिन्यात जाहीर होण्याची शक्‍यता आहे.
समीर यादव प्रभारी तहसीलदार पाटण.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...