अलिबाग : कांदळवनामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. त्यामुळे कांदळवनाच्या संवर्धनासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. कांदळवन क्षेत्राचे संरक्षण करताना त्यातून स्थानिकांना उपजीविका निर्माण करण्याच्या हेतूने वन विभागामार्फत प्रयत्न करण्यात आला आहे.पर्यटन वाढीसाठी श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजे गावातील पहिले केंद्र विकसित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे पर्यटक, अभ्यासक, निसर्गप्रेमींसाठी निसर्ग न्याहाळण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. या प्रकल्पातून रोजगाराचे साधन खुले होण्यास मदत झाली आहे.आपत्तीसह अतिवृष्टीच्या काळात कांदळवनांचे विशेष महत्त्व आहे.कांदळवनांमुळे अनेक प्राणी, पक्षी व मत्स्य प्रजातींचेही संरक्षण होत आहे. त्यामुळे निवाराही उपलब्ध होत आहे. त्यामुळेच कांदळवनात प्राणी व वनस्पतींची जैवविविधता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. जैवविविधतेमुळे निसर्ग पर्यटनाला वाव मिळावा तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी कांदळवन कक्षाकडून संवर्धन आणि उपजीविका योजना कार्यान्वित केली आहे.
जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजे येथे कांदळवन निसर्ग पर्यटनाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. येथील गर्द हिरव्या कांदळवनालगत वाहणारी खाडी, समृद्ध अशी जैवविविधता पर्यटकांसाठी उत्तम पर्यटनस्थळ उभारण्यात आले आहे.काळिंजे येथील कांदळवनातील जैवविविधता लक्षात घेत येथे शाश्वत निसर्ग पर्यटनांतर्गत मॅन्ग्रोव्ह बोटसफारी, मॅन्ग्रोव्ह ट्रेल, कांदळवन रोपवाटिकेला भेट, जंगलातील व बेटावरील पक्षी निरीक्षण, पारंपरिक मासेमारी व अँगलिंग, पंचक्रोशीतील आकर्षक स्थळांचा समावेश केला आहे. वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडून यासंदर्भातील प्रयत्न सुरू असून स्थानिकांना प्रशिक्षण देण्याची कामे सुरू आहेत.
असे आहेत उपक्रम
कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजनेंतर्गत, खेकडा पालन, जिताडा पालन, मत्स्य पालन, निसर्ग पर्यटन अशा प्रकारचे उपक्रम कांदळवन असलेल्या गावांना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून काळिंजे येथे कांदळवन सरंक्षण व उपजीविका निर्माण योजना सुरू करण्यात आली आहे.
निसर्गसंपन्न बेट
काळिंजे गाव हे मुंबईपासून 193 किलोमीटर अंतरावर आहे. माणगाव रेल्वे स्थानकापासून 55 किलोमीटर अंतरावर श्रीवर्धन 14 किलोमीटर तसेच हरिहरेश्वर हे पर्यटन क्षेत्र फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे. काळिंजे गावाला भव्य असे 190 हेक्टरचे कांदळवन क्षेत्र लाभले आहे. यामध्ये कांदळवनाच्या 11 प्रमुख प्रजाती तसेच 5 संलग्न प्रजाती आढळून येतात. काळिंजे खाडीच्या मध्यभागी असलेल्या बेटाभोवती कांदळवनांचे दाट आच्छादन आहे. बेटावर जुनी वस्ती, गुरांचे गोठे, आंबा-बोरांची झाडे, नारळ व सुपारीच्या बागा आहेत. चारही बाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेल्या बेटाच्या मध्यभागी गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत
श्रीवर्धनपासून 14 किलोमीटर अंतरावर काळिंजे गाव आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी मिळाली आहे. आतापर्यंत अनेकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कांदळवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- संदेश अंभोरे, समन्वयक, कांदळवन प्रतिष्ठान
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा