गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

*पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस अधीक्षकांकडून श्रध्दांजली** समाजातील प्रत्येक नागरिकाने पोलीसांच्या कामात सहकार्य करावे* नि:पक्षपातीपणे काम करुन कायदा व सुरक्षेचा प्रश्न अबाधित राखवा* गोरगरीब, दीनदलित, महिला व बालकांना तत्पर व योग्य न्याय द्यावा हीच खरी शहिदांना श्रद्धांजली ठरेल

*पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस अधीक्षकांकडून श्रध्दांजली*

* समाजातील प्रत्येक नागरिकाने पोलीसांच्या कामात सहकार्य करावे
* नि:पक्षपातीपणे काम करुन कायदा व सुरक्षेचा प्रश्न अबाधित राखवा
* गोरगरीब, दीनदलित, महिला व बालकांना तत्पर व योग्य न्याय द्यावा हीच खरी शहिदांना श्रद्धांजली ठरेल
सातारा, दि.21 :-  पोलीस स्मृतीदिनानिमित्त गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावित असताना धारातीर्थी पडलेले देशभरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना  पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
 पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे  यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, 26/11 चा अतिरेकी हल्ला आठवल्यावर आजसुद्धा आपल्या अंगावर शहारे उभे राहतात. सिमेवर काम करत असताना तेथे शत्रु कोण, मित्र कोण याची पूर्व कल्पना असते, परंतु अंतर्गत सुरक्षा करताना तेथे शत्रु कोण व मित्र कोण याची माहिती पोलिसांना नसते. कोणीही शुल्लक कारणावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु शकतो. अंतर्गत सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची शहिद होण्याची संख्या वाढली आहे. पोलीसांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून त्याचा पोलीसांच्या आरोग्यावर परिणाम होवू लागला आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक नागरिकांनी पोलीसांना काम करताना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
समस्यांचा विचार न करता उपलब्ध मनुष्यबळाचा व साधनसामुग्रीचा पुरेपुर वापर करुन तसेच शहिद जवानांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्तृत्वाचा ठसा समाजात उमटवून नि:पक्षपातीपणे काम करुन कायदा व सुरक्षेचा प्रश्न अबाधित राखवा. तसेच गोरगरीब, दीनदलित महिला व बालकांना तत्पर व योग्य न्याय देवून आपले कर्तव्य पार पाडावे, हीच खरी शहिदांना श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
  गेल्या वर्षभरात कर्तव्यावर असताना शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांचे वाचन करण्यात आले.   यावेळी संपूर्ण पोलीस दलाने उभे राहून मानवंदना दिली.
त्यानंतर पोलीस दलाने बंदूकीच्या तीन फैरी झाडून व पोलीस बिगुल वाद्य वाजवून स्मृतीस्तंभास मानवंदना दिली.  पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

कराड :आंबवडे येथे जनावरांना लाळ खुरकत लसीकरणाची सुरवात

कराड :आंबवडे येथे जनावरांना लाळ खुरकत लसीकरणाची सुरवात
कराड : सातारा जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लाळखुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.त्या अनुषंगाने सहा उपायुक्त डॉ.बेर्डे,पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उंडेगावकर पंचायत समिती कराड यांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुक्यातील आंबवडे येथे दि 19 रोजी लसीकरणाला येथे सुरुवात करण्यात आली.पशुवैद्यकीय दवाखाना येणके यांच्या मार्फत हे शिबीर घेण्यात आले होते.
 पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण अभियान संपूर्ण जिल्हाभर राबवण्यात येत आहे. लाळ खुरकत रोगात जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी होते, जनावरे वैरण खात नाहीत, बहुतांश वेळी पायाच्या नख्यांमध्ये जखमाही होतात. तोंडात गरे ( जखम) पडतात. यातून अनेक वेळा जनावरे दगावतात. ही दगावलेली जनावरे शेतकऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर न टाकता जमिनीत खड्डा घेऊन दफन करावीत. त्यामुळे रोगाचा प्रसार वाढत नाही आजारापेक्षा प्रतिबंध चांगला या रोगाला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनी या लसीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ.सतिष पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी आंबवडे गावच्या सरपंच सौ.सुवर्णा पाटील, नयना कदम,महेंद्र साळुंखे,दीपक पाटील,डॉ.सतिष देसाई,बाबासो गरुड,स्वप्नील पवार ,रमजान पटेल,के.के.पवार,यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

तळमावले : ज्ञानाची शिदोरी देवून साजरा होणार ‘स्पंदन’ चा वाढदिवस

ज्ञानाची शिदोरी देवून साजरा होणार ‘स्पंदन’ चा वाढदिवस

तळमावले/वार्ताहर
‘‘वाढदिवस आपल्या स्पंदनचा, संदेश सामाजिक बांधिलकीचा’’ अशा आशयातून स्पंदनचा प्रत्येक वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प डाकवे परिवाराने केला आहे. याच संकल्पनेतून यावर्षी स्पंदनच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना शालेय साहित्याची ज्ञानाची शिदोरी देण्यात येणार आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील चि.स्पंदन रेश्मा संदीप डाकवे याचा 7 वा वाढदिवस गुरुवार दि. 21 ऑक्टोबर, 2021 रोजी येत आहे. या निमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवण्यात येत आहे.
स्पंदनच्या प्रथम वाढदिवसादिशी भेटवस्तूऐवजी जमा झालेली रक्कम रु. 35,000/- ‘नाम’ फाऊंडेशनला दिली आहे. दुसऱ्या वाढदिवसाचा खर्च टाळून वाढदिवसाचे रु.5,000/- आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला जमा केले आहेत. तिसऱ्या वाढदिवसाला स्पंदनची ग्रंथतुला करुन जमलेली रु.11,000/- ची सर्व पुस्तके जि.प. शाळेला दिली आहेत. चौथ्या वाढदिवसाचा खर्च टाळून दिव्यांग मुलांना चित्रकलेचे साहित्य दिले आहे. पाचव्या वाढदिवसाला शांताई फाऊंडेशन ला रु.5,000/- किमतीचे जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत. सहाव्या वाढदिवसाला गरजू विद्यार्थ्यांची  रु.6,000/- ची शैक्षणिक फी जमा केली आहे. अशाप्रकारे चि.स्पंदनचा प्रत्येक वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत एका वेगळया उपक्रमाने साजरा केला जातो.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र च्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात चांगले योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एक वही एक पेन 16,000/- ची मदत, माणुसकीच्या वहया 11,000/- ची मदत, ज्ञानाची शिदोरी 28,100/- ची मदत, रु.3,000/- चे गणवेष वाटप, डाकेवाडी शाळेला 5,000/- चे तक्ते वाटप, ग्रंथतुलेतून 11,000/- ची पुस्तके वाटप, प्राथ. शाळा डाकेवाडी व कराड नगरपरिषद अंगणवाडी रंगकाम व बोलक्या भिंती, कुठरे व जांभूळवाडी  शाळेला महापुरुषांच्या प्रतिमांचे वाटप,  ग्रंथालयांना दिवाळी अंक वितरण, मान्यवरांचे स्वागत पुस्तके देवून, गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जावून सत्कार, 3 री विद्यार्थी स्वाध्याय माला वितरण, विनामूल्य भिंती रेखाटन, किल्ले बनवा स्पर्धा,  असे उपक्रम राबवले आहेत.
डाॅ.संदीप डाकवे आणि परिवाराने सामाजिक जबाबदारीचे भान ओळखत राबवलेले उपक्रम नक्कीच प्रशंसनीय आहेत. या उपक्रमाला शिवसमर्थ समुहाचे  शिल्पकार जनार्दन बोत्रे, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, बाळासाहेब कचरे, प्रा. ए.बी.कणसे, प्रा.जयंत कदम, सुरेश जाधव, वडील राजाराम डाकवे, आई सौ.गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, भरत डाकवे, आप्पासोा निवडूंगे तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभते.
ज्ञानाची शिदोरी या उपक्रमात ज्यांना मदत करावयाची आहे तसेच ज्यांना प्रत्यक्ष या वाढदिवसासाठी येणे शक्य नाही अशा व्यक्तींनी डाॅ.संदीप डाकवे मो. 9764061633 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन डाकवे परिवाराकडून करण्यात आले आहे.

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

कराड :किरपे गावात ग्रामसभेत राडा - गावात पोलीस बंदोबस्त

कराड :किरपे गावात ग्रामसभेत राडा - गावात पोलीस बंदोबस्त 
कराड :- किरपे (ता. कराड) येथे ग्रामसभेवेळी दोन गटात  राडा झाला. उपस्थित दोन्ही गटांनी एकमेकांना शिविगाळ, दमदाटी करीत दोन्ही गटातील ग्रामस्थांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. आज दि.20 रोजी बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने गावात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून दोन्ही गटातील एकुण सहाजणांवर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गावात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरपे येथे बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेसाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधक उपस्थित होते. तसेच ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आणि बेकायदा वृक्षतोडीचाही आरोप झाला. या दोन्ही विषयावर वादळी चर्चा झाली. चर्चेचे पर्यवसन हमरीतुमरीत झाल्यानंतर सभा उधळली. दोन गट आमने-सामने भिडले. त्यांनी एकमेकांना शिविगाळ, दमदाटी करीत धक्काबुक्की केली. सभास्थळी तणाव निर्माण झाल्यानंतर याबाबतची माहिती कराड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेऊन दोन्ही गटांना शांत राहण्याचे आवाहन केले. रात्री उशिरा याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.उपसरपंच विजय जयसिंगराव देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, पांडूरंग लक्ष्मण कदम, उत्तम नामदेव लोहार यांच्यासह अन्य काहीजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसभा सुरू असताना विविध विषय मांडून त्यावर चर्चा करण्यात येत होती. त्यावेळी संशयीतांनी गोंधळ घालीत शिविगाळ, दमदाटी करण्यास सुरूवात केली. सरपंच प्रज्ञा विद्याधर देवकर यांच्यासह उपसरपंचांनी संबंधितांना शांत राहण्यास सांगीतले असतानाही त्यांनी शिविगाळ, धक्काबुक्की केल्याची तक्रार उपसरपंच देवकर यांनी केली आहे.

याउलट पांडूरंग लक्ष्मण कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, विद्याधर पंढरीनाथ देवकर, शंकर महादेव देवकर, राहूल आनंदा देवकर, प्रदीप शंकर देवकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीतील घोटाळा आणि बेकायदा वृक्षतोडीचा आरोप केला म्हणून तसेच त्याबाबतची तक्रार गटविकास अधिकारी आणि वन विभागाकडे केल्याचा राग मनात धरुन संशयीतांनी धक्काबुक्की, शिविगाळ केल्याचे कदम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

सातारा : 24 ऑक्टोंबरपर्यंत हरभरा प्रमाणित बियाणे वितरण मोहिम सप्ताह

सातारा : 24 ऑक्टोंबरपर्यंत हरभरा प्रमाणित बियाणे वितरण मोहिम सप्ताह 
सातारा दि.20 : रब्बी हंगामात हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रम मोहिम स्वरुपात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने 24 ऑक्टोंबर 2021 पर्यंत हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी दिली आहे.
 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा पिकाचे 10 वर्षाआतील पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, RVG 202 व BDNGL 798 या वाणांचे एकूण 89606 क्विंटल प्रमाणित बियाणे रक्कम 2500 प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच प्रात्यक्षिके अंतर्गत 22339 क्विंटल  हरभरा बियाणे मोफत तिवरीत करण्यात येणार आहे. या अभियानात प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.
 2021-22 बियाणे व लागवड उपभियानांतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत 10 वर्षावरील जॉकी-9218 या वाणाचे एकूण 8500 क्विंटल प्रमाणित बियाणे रक्कम 2500 प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेत प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत लाभ देय आहे. तसेच या मोहिमेंतर्गत हरभरा बियाण्यास बिजप्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन करुन बिजप्रक्रीयेचे महत्व शेतकऱ्यांना  सांगण्यात येणार आहे.

सातारा - कोविड मुळे मृत्यु झालेल्या वारसांना सानुग्रह अनुदान

सातारा - कोविड मुळे मृत्यु झालेल्या वारसांना सानुग्रह अनुदान
सातारा दि.20 :-  सर्वोच्च न्यायालयाचे 30 जून 2021 रोजीच्या आदेशानुसार व त्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी 11 सप्टेंबर 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार एवढे सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केलेले आहे.
त्यानुसार सानुग्रह अनुदान वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता पुढील प्रमाणे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय,   आपत्ती व्यवस्थापन विभाग, सातारा पिन-415001 असा आहे. संपर्क क्रमांक 02162-232349, टोल फ्री क्र.1077 व ई-मेल rdcsatara@gmail.com.
सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी, सातारा आहेत. मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपद्धती लवकरच अधिसुचित करण्यात येईल.

सातारा : मार्गदर्शक सुचनेनुसार बंदिस्त सभागृहे, मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी

सातारा : मार्गदर्शक सुचनेनुसार बंदिस्त सभागृहे, मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी
सातारा दि.20-  कोविड-19 चे अनुषंगाने राज्य शासनाच्या   मार्गदर्शक सूचनेनुसार वेळोवेळी आदेश निर्गमित करणेत आलेले आहेत.  त्या मार्गदर्शक सुचनेस अधिन राहून अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्हयातील बंदिस्त सभागृहे, मोकळया जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोंबर 2021 पासून परवानगी  दिली आहे.  

मार्गदर्शक सूचना :
परिशिष्ट-अ 
          भाग-१ बंदिस्त सभागृह 
१. सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टव्दारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची / आयोजकांची जबाबदारी असेल. 
२. बंदिस्त सभागृहाच्या एकुण बैठक क्षमतेच्या ५० टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असु नये. 
३. बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान ६  फुट) आवश्यक राहिल, 
४. बैठक व्यवस्थेत सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहिल, 
५. बंदिस्त सभागृहातील सादरकर्त्या कलाकारांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक राहिल. 
६. आरोग्य सेतू उपयोजन (अॅप) सुसंगत साधनांवर स्थापित (installed) करून ते दिवसभर सुरू ठेवावयाचे आहे. तसेच बालकलाकारां व्यतिरिक्त सर्व कलाकार / आयोजक व साह्यभूत कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण ( दोन डोस व दुस-या डोसनंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) झालेले असणे आवश्यक असेल. बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅप वरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्य दृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती सुरक्षित" अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील. 
७. सभागृहातील सर्व परिसर / खोल्या / प्रसाधन गृहे वेळोवेळी स्वच्छ करणेबाबत सभागृह व्यवस्थापनाने वेळापत्रक आखावे व प्रसाधन गृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी. तसेच, वेळोवेळी निर्जतुकीकरण करण्यात यावे. 
८. बंदिस्त सभागृहात उपस्थित सर्वांनी पूर्णवेळ मास्क लावणे बंधनकारक राहील.
९. सभागृहातील कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणारे सर्व उपकरणांचे निर्जतुकीकरण करणे आवश्यक आहे.
 १०.कार्यक्रमासाठीची सहाय्यक कामे त्या-त्या कामांसाठी नेमून दिलेल्या व्यक्तींनीच करावीत. 
 ११.कार्यक्रमासाठी लागणारी साधन-सामुग्री ( संगीत व्यवस्था / लॅपटॉप/ माईक / प्रकाश योजना इ.) जी कोण व्यक्ती हाताळणार असतील, त्यांनीच ती वापरावी याबाबत दक्षता घेण्यात यावी. शक्यतो ज्याने त्याने स्वत:चीच साधनसामुग्री वापरावी. 
१२.बंदिस्त सभागृहामध्ये रंगभूषाकाराची आवश्यकता असेल तर त्यांनी पीपीई कीट धारण करणे आवश्यक आहे.      
१३.बंदिस्त सभागृहात प्रवेश करतेवेळी गर्दी होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घेणे आवश्यक आहे. यास्तव, सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार, प्रवेशद्वारे व समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात. 
१४.कोणत्याही प्रेक्षकांना कलाकार कक्षात जाण्यास मनाई राहील.
१५.परिवास्तूच्या प्रवेशाच्या व निर्गमनाच्या मार्गावर तसेच सामाईक क्षेत्रामध्ये, हात स्वच्छ करण्यासाठी प्राधान्याने हाताचा - स्पर्शरहित पध्दतीने घेता येणारे निर्जंतुक द्रव्य उपलब्ध ठेवावे. 
१६.श्वसनविषयक शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. खोकताना / शिंकताना प्रत्येकाने स्वत:चे तोंड व नाक टिप कागदाने (टिश्यू पेपर) / हात रुमालाने/ कोपराने पूर्णपणे झाकून घेणे आणि वापरलेल्या टिप कागदाची (टिश्यू पेपर) योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. 
१७.सभागृहातील कार्यक्रम संपल्यानंतर सभागृहाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक आहे. 
१८.जनजागृतीचा भाग म्हणून सभागृहाच्या दर्शनी ठिकाणी कोविड - १९ च्या संबंधातील प्रतिबंधात्मक उपाय-योजनांवरील भित्तीपत्रके / उभे फलक झळकविण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. 
१९.सभागृह वातानुकुलीन असेल अशा ठिकाणी तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे. 
२०.खाद्य व पेय पदार्थांच्या क्षेत्रामध्ये, शक्य असेल तेथे तेथे, अनेक विक्री केंद्रे उपलब्ध करून देण्यात यावीत. प्रत्येक विक्री केंद्रावर सुरक्षित अंतर  राखण्यासाठी, जमिनीवर चिकट-पट्ट्या (स्टिकर) वापरून एक-रांग पद्धतीचा अवलंब करावयाचा आहे. केवळ आवेष्टित खाद्यपदार्थ व पेय पदार्थ यांनाच परवानगी देण्यात येईल. सभागृहाच्या/प्रेक्षागाराच्या आत खाद्यपदार्थांची व पेय पदार्थांची पोचवणी करण्यास मनाई करण्यात येईल.
आयोजक व कार्यक्रमासाठी सहाय्य करणारे कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन तत्वे
1. बंदिस्त सभागृहात काम करणा-या सर्व कर्मचा-यांनी कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक राहील.
२.  वयाने ज्येष्ठ कर्मचारी, गर्भवती महिला कर्मचारी, ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे,असे कर्मचारी यांना ज्या ठिकाणी जास्त जनसंपर्क असलेल्या ठिकाणी कामासाठी नेमण्यात येऊ नये व त्यांची अधिकची काळजी घेण्यात यावी.
३. कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्वांनी आरोग्य सेतू" अॅपचा वापर करावा. 
४. सर्व कर्मचा-यांनी आपल्या आरोग्याबाबत सजगता दाखवावी व आपल्या असणाऱ्या आजाराच्या तात्काळ व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणावे.
----------------------------------–-------
                      भाग-२ 
बंदिस्त सभागृहाव्यतिरीक्त मोकळ्या जागेत आयोजित होणारे कार्यक्रम.
१. मोकळ्या जागेतील कार्यक्रमासाठी ६-६ फुटांवर खुणा करुन त्यानुसार लोक बसण्याची / उभे रहाण्याची व्यवस्था करावी. त्यानुसार प्रेक्षक बसतील/ उभे राहतील, याची संयोजकांनी दक्षता घ्यावी. सादरीकरण करणा-या कलाकारांपासून प्रेक्षक कमीत कमी ०६ फुट अंतरावर असावेत.
२. कार्यक्रम/कला सादर होणाऱ्या ठिकाणी प्रेक्षकांना मास्क घालणे अनिवार्य राहील. 
३. बालकलाकारां व्यतिरिक्त सर्व कलाकार / कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंध लसीकरण (दोन डोस व दुसऱ्या डोस नंतर १४   दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असणे आवश्यक असेल.) बाल कलाकारांची आरोग्य सेतू अॅप वरील आरोग्य स्थिती सुरक्षित असणे आवश्यक राहील तसेच त्यांची आरोग्य दृष्ट्या वारंवार तपासणी होणे आवश्यक राहील. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती "सुरक्षित" अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील. 
४. थुंकी उत्पन्न करणारे पदार्थ जसे की तंबाखूजन्य पदार्थ व पान इ. बाळगण्यास मनाई राहील. 
५. नशा आणणा-या पदार्थांचे / द्रव्यांचे सेवन करुन कार्यक्रमाच्या ठिकाणी येता येणार नाही. 
६. थर्मल गन, सॅनिटायझर कार्यक्रमाच्या ठिकाणी असावेत व आयोजकांनी तपासणी करुनच प्रवेश दयावा.
७. गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा व्यवस्था असावी. 
८. मोकळे मैदान, रस्ता, खुले सभागृह, इत्यादी ठिकाणी कार्यक्रम होणार असल्यास, कार्यक्रम पाहण्यासाठी उभे राहणे अथवा बसणे याकरिता मार्किंग करावे.
९. ज्या ठिकाणी अनियंत्रित गर्दी आहे त्या ठिकाणी ध्वनी प्रदुषणविषयक नियम पाळून ध्वनीक्षेपकावरुन सूचना द्याव्यात. 
१०.अनियंत्रित गर्दी व रस्त्यावरील कार्यक्रमांना स्थानिक प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन परवानगी द्यावी. 
११.कार्यक्रमाच्या ठिकाणी खाद्यपदार्थ / पेये विक्रीस बंदी राहील. 
१२.कार्यक्रम सादरीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारे नेपथ्य, प्रकाश व ध्वनी यंत्रणा, मंडप व मंडपाचे साहित्य, सजावट साहित्य यांचे निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तींची राहील. 
१३. माझे कुटुंब माझी जबाबदारी" ला अनुसरुन शक्य असेल तेथे कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी याबाबत ध्वनीफित तसेच संबंधित फलक लावावेत. 
१४.उपरोक्त बाबत राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग ( आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनवर्सन ) / सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडून Break the Chain अंतर्गत वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक तत्वांचे काटकोर पालन करणे बंधनकारक आहे. 
या आदेशातील अटी व शर्तीचे उल्लंघन केलेस संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005  व  साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये कठोर कारवाई करण्यात  येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी.

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...