बुधवार, ३ जुलै, २०२४

*स्वर्गीय पी.डी. पाटील कर्मयोगी विकास पुरुष - प्रा. सुरेश यादव*

*स्वर्गीय पी.डी. पाटील कर्मयोगी विकास पुरुष - प्रा. सुरेश यादव* कराड*: स्वर्गीय पी. डी. पाटील हे नव महाराष्ट्राचे शिल्पकार असून लोकसेवा हाच स्वधर्म मानून त्यांनी आयुष्यभर जनकल्याणाचे कार्य केले. पी. डी. पाटील साहेबांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा, विचारांचा व समाजकारणाचा वारसा अखंडितपणे पुढे नेला. राजकारणात राहून त्यात न रमता कराडच्या विकासात शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत असणारे हे साहेब म्हणजे कृष्णा-कोयना प्रीती संगमाला पडलेले विकासाचे इंद्रधनुषच होय, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथील प्रा. सुरेश यादव यांनी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडचे महाराष्ट्र हायस्कूल, कराड व श्री. शिवाजी विद्यालय प्राथमिक शाळा तर्फे स्वर्गीय आदरणीय पी. डी. पाटील साहेब यांची 107 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक श्री. शशिकांत शिंदे होते.
       या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र हायस्कूल कराडमध्ये स्वर्गीय पी. डी. पाटील साहेब यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त संस्थांतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत संस्थेतील विठामाता हायस्कूल, श्री शिवाजी विद्यालय, कराड, दा.भास्करराव शामराव थोरात विद्यालय, कार्वे,  श्री. शिवाजी विद्यालय, मसूर तसेच दे. भिकोबा आप्पाजी साळुंखे विद्यालय, किवळ व महाराष्ट्र हायस्कूल कराडचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वर्गीय पी. डी. पाटील यांच्यावर तयार केलेले भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. इंग्रजी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेच्या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पेन व वह्यांचे वाटप करण्यात आले.
     ज्येष्ठ शिक्षक श्री. शिंदे एस. बी. यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्री. सूर्यवंशी एस. जे. यांनी मनोगत व्यक्त केले. सौ. धनश्री कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कु. सायली रामदासी यांनी आभार मानले. कार्यक्रमास श्री शिवाजी विद्यालय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सूर्यवंशी एस. टी., श्री खाडे एन. जे. श्री ठाकरे आर. के. श्री माळी आर. एम. सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

मंगळवार, २ जुलै, २०२४

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पाटण मध्ये प्रचंड प्रतिसाद..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पाटण मध्ये प्रचंड प्रतिसाद..
पाटण -  शासनाने नुकत्याच  जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेस महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
पाटण मध्ये आज दुसऱ्या दिवशी देखील सेतू कार्यालय, महा ई सेवा केंद्र, तलाठी ग्रामसेवक यांची कार्यालय या महिलांच्या गर्दीने गजबजून गेली असल्याचे चित्र संपूर्ण पाटण तालुक्यात दिसून येत होते.
तहसीलदार अनंत गुरव व प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी या योजनेसाठी लागणारे कागदपत्र ग्रामीण स्तरावर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने गावोगावी आयोजित केलेल्या कॅम्प साठी तारळे महसूल मंडळात भेट देऊन ग्रामस्तरिय कर्मचारी यांचे मार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला .
तसेच या योजनेची नेमकी माहिती नसल्याने या योजने बाबत जनजागृती देखील करणे आवश्यक असल्याने अशा काही कॅम्प मध्ये या योजनेची सविस्तर माहिती देखील देण्यात येत आहे.
सामाजिक अर्थसहाय्य योजनेत समाविष्ट असणारे लाभार्थी या योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांनी अर्ज करू नये.आयकर भरणाऱ्या महिला, 2.50 लक्ष पेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या महिला या योजनेच्या निकषात बसत नसल्याने त्यांनी यासाठी अर्ज करू नये. याव्यतिरिक्त या योजनेच्या निकषात  बसणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने उत्पन्नाचा दाखला व रहिवासी दाखला मिळविण्यासाठी महिलांनी स्थानिक तलाठी कार्यालयात  धाव घेतली आहे.  या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना सुलभ रीतीने उत्पणनचा दाखला व रहिवासी दाखला  मिळण्यासाठी स्थानिक महसूल प्रशासनाचे अधिकारी लक्ष ठेऊन आहेत.
तारळे  महसूल मंडळातील मुरुड या गावी  स्थानिक तलाठी श्री निलेश चव्हाण यांनी केवळ दोन तासात सुमारे 300 महिलांना वरील कागदपत्रे उपलब्ध करून दिली आहे. 
प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये सुमारे 10000 पेक्षा अधिक महिलांना त्यांना आवश्यक असलेली प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे सांगितले आहे.
 या योजनेसाठी लागणारे कागदपत्र ,तसेच काही महिला या वारीसाठी बाहेरगावी असल्याने यासाठी मुदत वाढ मिळण्याची भावना काही महिलांनी बोलून दाखविली आहे.एकंदरीत या योजनेमुळे पात्र महीलाच्या अपेक्षा उंचावल्या असल्याने सर्व ग्रामस्तरिय तसेच तालुका स्तरीय  सेतू व तहसील कार्यालयात सध्या याच योजनेसाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

"पाटण मध्ये 21 ते 60 या वयोगटात सुमारे 1.12 लक्ष महिला असून सुमारे 50 हजर पेक्षा अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरतील असा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्ष अर्ज प्राप्त झाल्यानंतर ही संख्या निश्चितपणे कळेल. मात्र तोपर्यंत सर्व पात्र लाभार्थी याना आवश्यक ते प्रमाणपत्र लवकर मिळेल या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे.तसेच याबाबत शासनाकडून जे बदल वेळोवेळी सुचविण्यात येईल त्यानुसार कार्य वाही करण्यात येईल"
प्रांताधिकारी सुनील गाढे .

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ४२ लाख रु. इतका संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर.

 माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ४२ लाख रु. इतका संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर.




 कराड : वारुंजी हे नदीकाठी वसलेले गाव असून येथे पुरामुळे लोकवस्तीला धोका निर्माण होत असतो. यामुळे याठिकाणी संरक्षक भिंतीची गरज लक्षात घेऊन तसेच स्थानिकांची मागणी लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ४ कोटी ४२ लाख इतका निधी राज्य शासनाकडून मंजूर झाला आहे.

वारुंजी गावाला व परिसराला पुरापासून संरक्षण मिळणार आहे. या आमच्या गावकऱ्यांच्या मागणीची माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गांभीर्याने दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा करून संरक्षण भिंतीसाठी ४ कोटी ४२ लाख इतका भरघोस निधी मिळवून दिला आहे याबद्दल आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे वारुंजी ग्रामस्थांकडून मन:पूर्वक आभार मानतो. अशी प्रतिक्रिया माजी पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील यांनी दिली आहे. तसेच ते पुढे म्हणाले कि, वारुंजी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची कायमच साथ मिळाली आहे. त्यांनी गावाला आतापर्यंत भरघोस तसेच कोट्याबधी रुपयांचा निधी दिल्याने गावातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावता आले आहेत.

वारुंजी हे गाव कृष्णा व कोयना च्या प्रीतिसंगमापासून अत्यंत जवळ असल्याने व नदीस वारंवार येणाऱ्या पुरामुळे नदीकाठची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. नदीकाठच्या जमिनीची धूप होऊन वस्ती लगतचा नदीकाठ व भूभाग अस्थिर होत असल्यामुळे पुराच्या पाण्यापासून कोयना नदी काठी वसलेल्या गावठाणच्या भागाचे रक्षण करण्याकरिता पूर संरक्षक भिंतीचे काम करून मिळणेबाबत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य शासनाकडे मागणी केली होती तसेच विधानसभेत सुद्धा प्रश्न मांडला होता. त्यानुसार वारुंजी येथील कोयना नदीकाठी पूर संरक्षक भिंत बांधकामाच्या प्रस्तावास राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामासाठी ४ कोटी ४२ लाख ९८ हजार ७०० रुपये एवढ्या खर्चासाठी मान्यता देण्यात आली आहे.

पी एम जनमन योजने अंतर्गत पाटण मधील तारळे परिसरातील धनगरवाडी येथील कातकरी कुटुंबांना जातीच्या दाखल्याचे घरपोहच वितरण...

 पी एम जनमन योजने अंतर्गत पाटण मधील तारळे परिसरातील धनगरवाडी येथील कातकरी कुटुंबांना जातीच्या दाखल्याचे घरपोहच वितरण...


 

तारळे - तारळे ग्रामपंचायत अंतर्गत धनगर वाडी येथे 45 कुटंबाची वस्ती आहे. सदर 45 कुटुंब हे समजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असले तरी पी एम जन मन योजने मूळे त्यांचे जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे.
पाटण तालुक्यातील महसूल प्रशासनाने पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्यातील तारळे मुरुड अडूल पेठ, पाटण शहर, बिबी,येथील कुटुंबांना यापूर्वीच आधार कार्ड रेशन कार्ड ,मतदान ओळखपत्र, रहिवासी दाखला इत्यादीचे वितरण केले आहे. कातकरी  समाजातील  कुटुंबातील मतदारांनी यावेळी प्रथमच मतदार यादीत नाव आल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मतदान यंत्रावर  प्रथमच आपला मतदानाचा हकक बजावता आला आहे.
मूळ कातकरी समाज हा उदर निर्वाहासाठी एका ठिकाणी राहत नसतात, वेगवेगळ्या ठिकाणी ते नेहमी भटकंती करत असतात. मात्र या कुटुंबातील नवीन पिढी शिक्षण घेताना दिसत असल्याने ही कुटुंबे आता एका ठिकाणी स्थिरावत असल्याचे दिसून येत आहे.
या मुलांना शैक्षणिक कारणासाठी जातीच्या दाखल्याची गरज असते तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील जातीच्या दाखल्याची आवश्यकता असते. त्यामुळे या कामी कागदपत्राची जुळवा जुळव करणे हे आव्हानात्मक काम असते.
पाटण तालुक्यात अशा कातकरी कुटुंबांना जातीचा दाखला मिळवून देण्यासाठी स्थानिक महसूल प्रशासनाने पुढाकार घेऊन तारळे येथील 19 कुटुंबातील विद्यार्थ्यांना व पालकांना जातीच्या दाखल्याचे थेट त्यांचे वस्तीवर व ग्राम पंचायत कार्यालयात  जाऊन वितरण केले आहे. याप्रसंगी  , तहसीलदार पाटण श्री अनंत गुरव , मंडळ अधिकारी किशोर वाडकर , तसेच परिसरातील बबन शिंदे,अभिजित पाटील,रामभाऊ पाटील,तसेच कातकरी कुटंबाचे प्रतिनिधी रामदास वाघमारे आदी हजर होते.
 मुलांना घरपोहच जातीचे दाखले मिळाल्याने कातकरी कुटुंबांनी समाधान व्यक्त केले आहे.

"पी एम  जन मन योजने अंतर्गत पाटण तालुक्यात बहुतांश  कातकरी कुटुंबांतील व्यक्तींना यापूर्वीचआधार कार्ड रेशन कार्ड,  मतदार ओळखपत्र,जातीचे दाखले इत्यादी शासकीय कागदपत्रे देण्यात आली असून कातकरी समाजातील एकही व्यक्ती यापासून वंचित राहणार नाही यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्नशील राहील "
सुनील गाढे प्रांताधिकारी पाटण.

 

तारळे तील कातकरी वस्ती मध्ये नोंदणी करण्यात आलेले 149 मतदार असून नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 120 मतदारांनी मतदानाचा हकक बजावून लोकशाही मजबुतीकरण साठी हातभार लावला आहे."

"माझी लाडकी बहीण" योजनेला नोंदणीची मुदत काढावी - आ. पृथ्वीराज चव्हाण यांची विधानसभेत मागणी

  "माझी लाडकी बहीण" योजनेला नोंदणीची मुदत काढावी - आ. पृथ्वीराज चव्हाण यांची विधानसभेत मागणी




निवडणुकीपुरती या योजेनची घोषणा नसावी यासाठी कायदा करण्याची गरज असल्याची आग्रही मागणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.

 कराड : यावर्षीच्या अंदाजपत्रकात शासनाने "माझी लाडकी बहीण" हि योजना जाहीर केलेली आहे. या योजनेची नोंदणीची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ केलेली आहे, अशी नोंदणीला कोणतीही मुदत न देता ती काढावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. यासोबतच या योजनेमध्ये सुधारणा आणणेसाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी चार मागण्या केल्या आहेत. ज्यामध्ये या योजनेची नोंदणी मुदत काढून टाकावी, या योजनेतील महिलांची वयोमर्यादा ६० वर्षावरील महिलांना सुद्धा लाभ मिळावा, तसेच अविवाहित महिलांना सुद्धा या योजेनचा लाभ मिळावा यासाठी २१ वर्षावरील अविवाहित महिलांना योजनेचा लाभ व्हावा तसेच हि योजना निवडणुकीची घोषणा न राहता याचा कायदा केला जावा अशा प्रमुख मागण्या योजना दुरुस्तीबाबत केल्या आहेत.

 यावेळी पुढे बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की , या योजनेच्या १५ जुलै अंतिम नोंदणीच्या तारखेमुळे राज्यात नोंदणी केंद्राबाहेर मोठी गर्दी होत आहे. तसेच राज्यात काही भागात उन्हाची तीव्रता अजून असल्याने काही महिलांना भोवळ आल्याची घटना घडल्या आहेत. तसेच काही भागात पावसात सुद्धा रांगा लागल्या आहेत. आज महाराष्ट्रात पंढरपूरची वारी सुरु आहे. आषाढी एकादशी १७ जुलै ला आहे. या वारीत जवळपास १० लाख वारकरी सहभागी होत असतात, या वारीत निम्याहुन अधिक महिला भाविक असतात. अशावेळी या योजेनच्या नोंदणीसाठी भाविक महिलांनी वारी सोडून यायचे का ? त्यामुळे या योजनेला तारखेचे बंधन नसले पाहिजे. प्रत्येक महिलेला तिचा अधिकार मिळालाच पाहिजे. केंद्रातील युपीए सरकारने ज्याप्रमाणे अधिकारावर आधारित कायदे केले गेले होते. त्याप्रमाणे या योजनेचा सुद्धा कायदा केला गेला पाहिजे. हि योजना फक्त निवडणुकीपुरती सुरु करायची व त्यानंतर बंद करायची हे योग्य होणार नाही. यासाठी या योजनेबाबतचा कायदा करण्याची गरज असल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आग्रहाने मांडले आहे. त्याचबरोबर या योजनेत २१ वर्षावरील अविवाहित महिलांना वगळले आहे, त्यांचा काय दोष आहे ? त्यांना या योजनेचा फायदा मिळालाच पाहिजे. त्याचबरोबर ६० वर्षावरील सर्व महिलांना ज्यांना कोणी सांभाळणारे नसतील तर अशा वयोवृद्ध महिलांना या योजेतून वगळणे योग्य नाही.

तसेच यासोबतच आणखी महत्वाची टिपणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे कि, या योजनेमुळे नोंदणी केंद्राबाहेर एजेंटचा सुळसुळाट झाला आहे. महिलांना उत्पानांचा दाखल काढण्यासाठी ७००-८०० रुपये मागितले जात आहेत, १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे. अशा अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी शासनाने लवकरात लवकर दूर केल्या पाहिजेत.

सोमवार, १ जुलै, २०२४

*गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक -.मा.श्री.रविराज देसाई दादा*

*गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक -.मा.श्री.रविराज देसाई दादा* 
पाटण - विद्यार्थ्याना स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शिक्षकानी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी स्पर्धा परीक्षा आयोजन व मार्गदर्शन, शालेय - सहशालेय उपक्रम, असे विविधांगी उपक्रम शालेय स्तरावर राबविणे आवश्यक आहे, असे मत यावेळी  मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा यांनी व्यक्त केले,  तसेच स्व.शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांनी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष होतोय यांचा मला सार्थ अभिमान वाटतो असेही ते यावेळी म्हणाले,आज ते  न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ - धावडे या विद्यालयाच्या नूतन मुख्याध्यापक पदी नियुक्त झालेल्या श्री.एन.एस.कुंभार सर यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते,यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री.यशराज देसाई दादा यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी श्री.एन.एस.कुंभार सर यांचा शाल, श्रीफळ,व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला, यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे वतीने शुभेच्छा दिल्या, या सत्कार समारंभ प्रसंगी शिवाजीराव देसाई विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल. केंडे  सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर  आभार श्री.संतोष कदम सर यांनी मानले, यावेळी  प्राचार्य डॉ.श्री.एस.एम.शिंदे, प्राचार्य श्री.जी. आर.सत्रे,प्राचार्य श्री.ए. टी.शिंदे, मुख्याध्यापिका सौ.वाय.डी.संकापाळ, श्री.राजेंद्र गव्हाणे, सौ.यादव एस.एस., श्री. टी. व्ही.शेजवळ, तसेच मोरणा शिक्षण संस्था परीवार व बाळासाहेब देसाई फौंडेशन मधील सर्व सेवक उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणी साठी पाटण महसूल प्रशासनाची युद्ध पातळीवर तयारी सुरू...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणी साठी पाटण महसूल प्रशासनाची युद्ध पातळीवर तयारी सुरू...
पाटण - महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील महिला वर्गासाठी  नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ह्या योजनेची घोषणा करण्यात आली असून प्रशासकीय पातळीवर याबतचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे. 
2.50 लाखापेक्षा कमी उत्पन्न गटातील 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी हो योजना असून ह्या योजनेत अशा महिलांना दरमहा 1500 रू मिळणार आहेत. ह्या योजनेसाठी विवाहित ,विधवा  घटस्फोटित,परितक्त्या व निराधार महिला पात्र ठरणार असून यासाठी अर्ज करण्याची मुदत 1जुलै ते 15 जुलै अशी असणार आहे
यासाठी उत्पन्नाचा दाखला,आधार कार्ड रेशन कार्ड,रहिवासी दाखला ,बँक पासबुक आदी कागदपत्राची आवश्यकता लागणार असून अशा पात्र महिलांचे अर्ज महा ई सेवा केंद्र आपले सरकार केंद्र,अंगणवाडी सेविका ,ग्रामपंचायत कार्यालय,ग्रामसेवक यांचे मार्फत स्वीकारले जाणार आहे.
पाटण तालुक्यात ह्या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या सर्व महिलांना ह्याचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्थानिक महसुल प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यामुळे तहसीलदार अनंत गुरव व प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी महा ई सेवा केंद्र चालक ,आपले सरकार केंद्र चालक तलाठी ,मंडळ अधिकारी  यांची बैठक घेऊन आवश्यक ते नियोजन करत आहेत. याकरिता रात्री उशिरा पर्यंत बसून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी महसूल प्रशासनाने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. जिल्हास्तरावर देखील याबाबत नियोजन सुरू असून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
आज आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने पाटण मध्ये कागदपत्र प्राप्त करण्यासाठी तसेच योजनेची माहिती घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत होते. 
या योजनेमुळे पाटण सारख्या दुर्गम भागातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक उत्पंनाचे  कुठलेही खात्रीशीर साधन नसल्याने दरमहा 1500 रू मिळणार असल्याने त्यांना निश्चितपणे दिलासा मिळणार आहे.त्यामुळे या योजनेमुळे ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व इतर कोणत्याही योजनेचा लाभ न मिळणाऱ्या महिलांच्या अपेक्षा या योजनेमुळे निश्चितपणे उंचावल्या असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
चौकट
"पाटण मध्ये सध्या 18 वर्षांवरील एकूण 3 लक्ष मतदार असून त्यापैकी सुमारे 1.50 लक्ष महिला मतदार आहेत .21 ते 60 हा वयोगट लक्षात घेतल्यास पाटण मध्ये जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ  देणे शक्य असून तो देण्याचा दृष्टीने आम्ही नियोजन केले असून एकही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही यासाठी पुढील काही दिवस वेळ पडली तर 24 तास  प्रयत्नाची शिकस्त करू"
सुनील गाढे प्रांताधिकारी पाटण

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...