शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पाटण तालुक्यात ४६ लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड; भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वात उपक्रम”


पाटण : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा.श्री.अतुल भोसले साहेब यांच्या नेतृत्वात तसेच पाटण तालुक्याचे नेते व राज्य परिषदेचे सदस्य मा.श्री.सत्यजित सिंहपाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्यात आयुष्यमान भारत कार्ड वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व होते. कृष्णा हॉस्पिटल आणि भारतीय जनता पार्टी पाटण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत तब्बल ४६ लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा कार्डचे वितरण करण्यात आले. या योजनेमुळे गरजू नागरिकांना मोफत व दर्जेदार वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध होणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी पाटण दक्षिणचे अध्यक्ष गणेश यादव, साईकडे गावच्या सरपंच सौ. सुवर्णाताई मोरे यांच्यासह स्थानिक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा सामाजिक कार्यातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

या उपक्रमामुळे पाटण तालुक्यातील गरजू कुटुंबांना आरोग्य सुरक्षा कवच मिळाल्याने भारतीय जनता पार्टीच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

*मंद्रूळकोळे खुर्द येथे बैलगाडी स्पर्धा उत्साहात.* *संपन्न.गावाने चांगले मैदान घेतल्याबद्दल स्पर्धक व शौकिनांनी धन्यवाद व्यक्त केले.*

ढेबेवाडी प्रतिनिधी 
         मंद्रूळकोळे खुर्द येथे श्री. जोतिबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यती घेण्यात आल्या यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक आदी ठिकाणहून 150 गाड्यांची नोंद करण्यात आली होती यामध्ये तळमावले ता.पाटण येथील इशारा व चॉपर या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळविला. येथील शर्यती उत्साहात संपन्न झाल्या या विभागात मंद्रूळकोळे खुर्द गावाने बैलगाडा स्पर्धकाना मैदान उपलब्ध करून देऊन चांगल्या स्पर्धा घेतल्याबद्दल बैलगाडा स्पर्धकांनी व शौकिनांनी गावचे धन्यवाद व्यक्त केले.
         मंद्रूळकोळे खुर्द गावाने जोतिबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले होते. शर्यतीचे नेटके नियोजन ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी लांबून आलेल्या स्पर्धकांची गावच्या वतीने चांगली सोय करण्यात आली. या स्पर्धेस लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अशोकराव पाटील, व्हा. चेअरमन पांडुरंग नलवडे, माजी शेती सभापती हिंदुराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, उद्योजक महेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य मृणाल पाटील, पंचायत समिती सदस्य नितीन काळे दादा, पंचायत समिती सदस्या सौ.संपदाताई जाधव, माजी उपसभापती रघुनाथ जाधव, लोकनेते कारखान्याचे संचालक सुनिल पानस्कर, आनंदराव पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील, युवा नेते नितीन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पाटील, माजी सरपंच सचिन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
         या स्पर्धेत प्रथम क्रमाकांचे बक्षिस शंकरराव पाटील माजी मुख्याध्यापक यांच्याकडून 51000 रुपयांचे ठेवण्यात आले होते, तळमावले येथील फॅन्स क्लब सागर पवार यांचा इशारा व भागवत पाटील डॉ. गौरव कदम ईश्वरपूर यांचा चॉपर या बैलजोडीने मिळविले, द्वितीय क्रमांकाचे 41000 हजार रुपयांचे बक्षीस पंचायत समिती सदस्य नितीन काळे व सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्या कडून तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस युवा नेते नितीन पाटील यांच्याकडून 31000 बक्षिस ठेवण्यात आले होते ते संयुक्त रित्या कु.वैभवी प्रकाश पवार दाढोली यांचा लक्ष्या, पै. राणा देशमुख वाई व प्रदीप नाना कापूसखेड यांचा मुत्या तसेच सावता माळी बनवडी यांचा सुर्या व श्रीकांत पाटील आसिफ भैय्या काले यांचा सर्जा या बैलजोडीनी पटकावले आहे. चौथ्या क्रमांकाचे बक्षिस जिल्हा परिषद सदस्य कु. मृणाल महेश पाटील यांच्याकडून 21000 रुपयांचे ठेवण्यात आले होते हे बक्षिस येरळवेकरांचा आयफोन तानाजी पाटील जिंती यांचा सुंदर यांनी प्राप्त केला. युवा नेते रणजित पाटील यांच्याकडून पाचव्या क्रमांकाचे 11000 बक्षिस ठेवण्यात आले होते ते आनंदराव भिसे तारुख यांचा सरदार व मानेगावचा सरदार यांनी प्राप्त केले. सहाव्या क्रमांकाचे बक्षिस तंटामुक्ती अध्यक्ष अमर पाटील यांच्याकडून सात हजार रुपये ठेवण्यात आले होते ते वेदिका संकेत यादव साईकडे यांचा पक्षा, निनाम यांचा बल्ली तसेच संकेत शेठ सुतार सुसगाव साईकडे गुरुकृपा मित्र परिवार कराड यांचा वश्या, महेश जाधव कुरळप यांचा गज्या यांनी प्राप्त केले. यावेळी विजेत्यांनी जल्लोष केला. दरम्यान क्वार्टर सेमी फायनलला प्रथम आलेल्या रमेश भिंगारदेवे, अर्जुन भिंगारदेवे काळगावकर यांच्यासह इतर सेमी धारकांनी गुलाल उधळण करीत जल्लोष केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच संजय लोहार यांनी सर्वांचे स्वागत केले. अमित कापसे यांनी आभार मानले.
    
 चौकट   
    उपसरपंच संजय लोहार यांच्याकडून प्रथम आलेल्या सहा क्रमांकास ढाली देण्यात आल्या तर कॉटर सेमी फायनल मध्ये आलेल्या प्रथम सहा क्रमांकास ॲड ए. पी. पाटील यांच्याकडून 2000 बक्षिस व सन्मान चिन्ह शिवमुद्राचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बबलू पाटील यांच्याकडून देण्यात आले.
      शर्यती यशस्वी करण्यासाठी अमित कापसे, ग्रा. सदस्य बाळासाहेब कदम, पोलिस पाटील विजय लोहार, मा. चेअरमन दादासाहेब साळुंखे, मा. सरपंच सतिश कापसे, शिवमुद्रा संस्थापक शिवाजी यादव, मा. चेअरमन अविनाश साळुंखे, समीर साळुंखे, सदाशिव कदम महाराज, धनाजी भरुगडे, राजू देसाई, राजाभाऊ रोडे, सचिन लोहार, रमेश पाटील या प्रमुख कार्यकर्त्यांसह चेतना, दत्तगुरु, हनुमान, तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

येरफळे येथे श्री स्वामी समर्थ महाराज व संत गोरा कुंभार यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.


पाटण, प्रतिनिधी :
पाटण तालुक्यातील येरफळे गावात श्री स्वामी समर्थ महाराज व संत गोरा कुंभार यांची पुण्यतिथी युवक व ग्रामस्थांच्या संयुक्त पुढाकारातून अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संतांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संतांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अद्वैत, भक्ती व सेवाभावाच्या शिकवणीबरोबरच संत गोरा कुंभार यांच्या साधेपणा, श्रमसंस्कार आणि नामस्मरणाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजात सद्भावना, एकात्मता आणि सेवा वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. संतांचे विचार हे आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असून त्यांच्या शिकवणीतून जीवन जगण्याची दिशा मिळते, असे मतही व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमामुळे गावात एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली असून नव्या पिढीला संतांच्या विचारांची प्रेरणा मिळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भविष्यातही अशा धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शंकर भिसे यांनी केले. यावेळी श्री. संतोष कदम सर, श्री. विकास पडवळ, श्री. रामचंद्र भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. अरविंद पडवळ सर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महादेव कुंभार, बाळासाहेब भिसे, दादासो कुंभार, बाळासो कुंभार, बबन कोळी, विकास पडवळ, संतोष कदम सर, बबन पाटील, आत्माराम पाटील, संजय पडवळ, आनंदा पानस्कर, अरविंद पडवळ, पांडुरंग चव्हाण, रामचंद्र कदम, अंकुश माळी, निखिल पडवळ, गणेश भेलसे, रविंद्र पुजारी, तुकाराम मुगदुम आदींसह ग्रामस्थ व युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

*कु. समर्थ बोरगे यांची उल्लेखनीय कामगिरी; नॅशनल हिंदी ऑलिम्पियाडमध्ये केंद्रात प्रथम.*



कुंभारगाव (ता. पाटण) येथील जि. प. प्राथमिक शाळा कुंभारगाव नं. २ मधील विद्यार्थी कु. समर्थ संतोष बोरगे याने Talent Olympiad आयोजित नॅशनल हिंदी ऑलिम्पियाड (इयत्ता ७ वी) स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. समर्थने या स्पर्धेत केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरावर १७ वा क्रमांक मिळवला असून त्याला Excellence Award ने गौरविण्यात आले आहे.

 अत्यंत स्पर्धात्मक आणि दर्जेदार असलेल्या या परीक्षेत समर्थने मिळवलेले यश हे त्याच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित मानले जात आहे.त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा न.2 चाळकेवाडी एकूण 7 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते सर्व विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले आहेत.

शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद तसेच पालकांनी समर्थचे विशेष कौतुक करत त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर विद्यार्थ्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच, ग्रामपंचायत चाळकेवाडीचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शिक्षकवर्ग, विद्यार्थीवृंद आणि पालक यांनी समर्थ बोरगे याच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत त्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कुंभारगावच्या शैक्षणिक प्रगतीचा हा एक अभिमानास्पद टप्पा मानला जात असून, यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.

मंगळवार, १४ एप्रिल, २०२६

*मत्रेवाडीतील — शेडला भीषण आग, दोन म्हशी होरपळल्या*


साप्ताहिक कुमजाई  पर्व न्यूज मत्रेवाडी (ता. पाटण) येथील एका कष्टकरी शेतकऱ्यावर अचानक ओढवलेल्या आगीच्या संकटामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. यशवंत ज्ञानू मत्रे यांच्या जनावरांच्या शेडला लागलेल्या आगीत दोन म्हशी गंभीर भाजल्या असून शेड पूर्णतः जळून खाक झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत मत्रे हे काल सायंकाळी नेहमीप्रमाणे आपल्या घराजवळील शेडमधील जनावरांना चारापाणी करून घरी झोपायला गेले होते. सर्व काही सुरळीत असताना रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास अचानक शेडमधून धूर निघताना दिसला. घरच्यांनी तत्काळ धाव घेतली असता शेडला भीषण आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

क्षणातच परिस्थिती गंभीर बनली. त्यांनी तात्काळ आरडाओरडा केल्याने गावातील नागरिक घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करून आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.

या आगीत शेड पूर्णपणे जळून खाक झाले असून अंदाजे ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे शेडमध्ये बांधलेल्या दोन म्हशी या आगीत गंभीर भाजल्या. त्यांच्या गळ्यातील दोऱ्या जळून तुटल्याने त्या कसाबसा जीव वाचवू शकल्या, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच गाव कामगार तलाठी रामचंद्र कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेमुळे मत्रे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून त्यांना तात्काळ शासकीय मदत मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मत्रेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, “कष्टाने उभं केलेलं सगळं काही क्षणात जळून खाक झालं,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

रविवार, १२ एप्रिल, २०२६

*सामाजिक विषमतेच्या अंधकारावर समतेचा प्रकाश टाकणारा क्रांतीसुर्य म्हणजे म. ज्योतिबा फुले:- सुरेश यादव*

 (कराड प्रतिनिधी) 11 एप्रिल 2026 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताह व महात्मा फुले जयंती द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांचे वतीने महात्मा फुले: जीवन व कार्य या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुरेश यादव होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, सामाजिक विषमतेच्या अंधकारावर समतेचा प्रकाश टाकणारा क्रांतीसुर्य म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय. हजारो वर्षाच्या सामाजिक गुलामगिरीत संपूर्ण बहुजन समाज देशात अडकलेला होता. अन्याय, अज्ञान, अस्पृश्यता, जातीभेद या समस्यांनी संपूर्ण समाज गुरफटलेला  होता. अशा परिस्थितीत महात्मा फुलेंनी सामाजिक समतेची चळवळ सुरू केली . स्वतःची पत्नी सावित्रीबाईंना शिक्षित करून इतर स्त्रियांना शिकवायला लावले. स्त्री शिक्षणास सुरुवात केली. अनेक शाळा सुरू केल्या. अन्याय अत्याचार झालेले स्त्रियांच्यासाठी पाळणाघरे सुरू केली. अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी स्वतःचा पानवठा उपलब्ध करून दिला. ब्रिटिश राजपुत्रा पुढे भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा महात्मा फुले यांनी रचला. महात्मा फुले हे गर्भ श्रीमंत होते. त्यांची स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी होती.  सुखांचा उपभोग घेण्यापेक्षा समाजसेवेचे व्रत त्यांनी ठेवले.
          कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, या देशात सामाजिक समता चळवळीचे मुख्य प्रेरणास्थान म्हणजे महात्मा फुले होत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा फुले या पती-पत्नींनी दिनदलित व सर्व समाजातील स्त्रिया यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. या अन्याया मागचे मुख्य कारण अज्ञान आहे. हे त्यांनी ओळखले व शिक्षणाचा प्रचार प्रसार केला. शाळा सुरू केल्या व समाज घडविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुलेंचे कार्य भविष्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेले. आज जयंतीदिनानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो!
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रघुनाथ गवळी कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले. आभार प्रा. विश्वनाथ सुतार यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा. मनाली रानडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व प्राध्यापक गुरुदेव कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

श्री क्षेत्र करपेवाडीची ५४ वर्षांची अखंड परंपरा; ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहाने रंगली भक्तीमय यात्रा.


तळमावले/पाटण :
अध्यात्मिक वारसा आणि संत परंपरेची अखंड ज्योत जपत श्री क्षेत्र करपेवाडी (ता. पाटण) येथे यंदाही ५४ व्या वर्षी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत भक्तीभावात आणि उत्साहात संपन्न झाला. तमाशा, कुस्ती, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना पूर्णतः फाटा देत केवळ अध्यात्मिक आणि संस्कारमय परंपरा जपणारी ही यात्रा परिसरात आदर्श ठरत आहे.

यंदाचा सप्ताह ३ एप्रिल ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडला. या दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, काकडा आदी धार्मिक कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन पारायण मंडळ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले. संपूर्ण आठवडाभर गाव परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता.

गुरुवार, ९ एप्रिल रोजी सायंकाळी श्री मसनाई माता मंदिरात ग्रामस्थांच्या हस्ते महाआरती पार पडली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल व खोबऱ्याच्या उधळणीत श्री मसनाई मातेची पालखी सासन काठ्यांसह भव्य मिरवणुकीतून मंदिरात दाखल झाली. रात्री ह.भ.प. रोहिदास महाराज मालुसरे (वाई) यांचे भावस्पर्शी कीर्तन झाले, ज्यामुळे उपस्थित भाविक भारावून गेले.

शुक्रवार, १० एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस ठरला. सकाळी देवीची आरती करून पालखी, मानकरी, सासन काठ्या, ग्रामस्थ, युवक वर्ग आणि भाविकांच्या उपस्थितीत गुलाल-खोबरे उधळीत व फटाक्यांच्या आतषबाजीत छबीना भवानी मातेच्या मंदिराकडे भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणाई विशेष भक्तीभावाने सहभागी झालेली दिसून आली.

पालखीचे गोल रिंगण हा सोहळ्याचा आकर्षणबिंदू ठरला. माहेरवाशिणी, महिला वर्ग, युवक आणि भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. त्यानंतर पारंपरिक मानाचे दंड स्थान विधी पार पडले. सकाळी ११ ते १२ या वेळेत ह.भ.प. बाबुराव महाराज मस्कर यांचे काल्याचे कीर्तन झाले.

या अध्यात्मिक उत्सवाची सांगता दहीहंडी फोडून व महाप्रसादाने करण्यात आली. संपूर्ण यात्रा अत्यंत शिस्तबद्ध, भक्तीमय आणि पारंपरिक वातावरणात पार पडली.

ही परंपरा यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी, पारायण मंडळ, ग्रामस्थ, युवक वर्ग यांनी मोठे परिश्रम घेतले. करपेवाडी ग्रामस्थांनी जपलेली ही ५४ वर्षांची अध्यात्मिक परंपरा आजच्या आधुनिक काळातही संस्कार आणि भक्तीची प्रेरणा देणारी ठरत आहे.

बुधवार, ८ एप्रिल, २०२६

तळमावले - “मैत्रीचाच झाला घात! आंबा घाटात मित्रानेच घेतला जीव; अपघाताचा बनाव अखेर उघड”


साप्ताहिक कुमजाई पर्व सविस्तर बातमी:
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट परिसरातील दख्खन (कळकदरा) येथे ३१ मार्च रोजी घडलेल्या घटनेने आता धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेल्या या प्रकरणात प्रत्यक्षात मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

देवरुख पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी आशिष शांताराम भावके (वय २७, रा. घोगाव, ता. कराड) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव सुधीर अर्जुन यादव (वय ३०, रा. साईकडे, ता. पाटण) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर यादव आणि आशिष भावके हे दोघे जिवलग मित्र असून नातेवाईकही होते. ते दोघे रत्नागिरी येथे फिरण्यासाठी गेले होते. ‘आरे-वारे’ समुद्रकिनारी त्यांनी जेवण केले आणि परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र ३१ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आंबा घाटातील कळकदरा येथे दोघांमध्ये वाद झाला.

दारू पिण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद अचानक विकोपाला गेला. संतापलेल्या सुधीर यादव याने आशिषच्या गाडीच्या बोनेटवर चढून काच फोडली व वाहनाचे नुकसान केले. यामुळे संतप्त झालेल्या आशिषने गाडी भरधाव वेगाने चालवली. सुधीर खाली पडल्यास त्याचा जीव जाऊ शकतो, हे माहीत असूनही त्याने गाडी न थांबवता पुढेच नेली.

दरम्यान, सुधीर बोनेटवरून खाली पडला आणि काही अंतर फरपटत गेला. यात त्याच्या बरगड्या, पोट आणि पायाला गंभीर दुखापत झाली. या गंभीर अवस्थेत त्याला मदत करण्याऐवजी आशिष घटनास्थळावरून पसार झाला, ही बाब अधिकच धक्कादायक आहे.

दुसऱ्या दिवशी जखमी अवस्थेत सुधीर यादव याला साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे भासवण्यात आले होते.

परंतु देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी केलेल्या सखोल तपासात हा अपघात नसून रागाच्या भरात केलेला गंभीर गुन्हा असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे यांच्या फिर्यादीवरून आशिष भावके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.

मंगळवार, ७ एप्रिल, २०२६

भावपूर्ण स्मरणातून भक्तीचा सोहळा – धामणी येथे कै. सौ.कोमल शंकर सावंत यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त जाहीर कीर्तन.




ता. पाटण येथील धामणी गाव आज संध्याकाळी भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार आहे. गावातील कै.सौ. कोमल शंकर सावंत यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त एक भावपूर्ण आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सायंकाळी ठीक ७ वाजता सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे जाहीर कीर्तन संपन्न होणार आहे.

कै. सौ. कोमल सावंत यांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या कार्याचा व व्यक्तिमत्त्वाचा सन्मान राखण्यासाठी हा भक्तीमय उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, संस्कार आणि अध्यात्मिक ऊर्जा यांचा संगम साधला जाणार आहे.

धामणी पंचक्रोशीतील सर्व भाविक, नागरिक व श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कीर्तनाचा लाभ घ्यावा, तसेच पुण्यस्मरण सोहळ्यास आपली उपस्थिती दर्शवून दिवंगत आत्म्यास आदरांजली वाहावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामुळे गावात एकात्मता, श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार असून, कै. सौ. कोमल सावंत यांच्या स्मृतींना हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरणार आहे.

शनिवार, ४ एप्रिल, २०२६

*मध्यरात्रीचा थरार! कुत्र्याला वाचवताना शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; पवारवाडीत भीतीचे सावट*


साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी - पवारवाडी कुठरे (ता. पाटण) येथे मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत शेतकरी विनोद भीमराव कदम यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात कदम जखमी झाले असून त्यांच्यावर ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ मार्च रोजी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास विनोद कदम हे जेवण करून घरी झोपले होते. अचानक त्यांच्या पाळीव कुत्र्याचा जोरात ओरडण्याचा आवाज आल्याने ते तात्काळ घराबाहेर आले. बाहेर येताच त्यांनी पाहिले की, एका बिबट्याने त्यांच्या कुत्र्याला पकडले होते.

धाडसाने त्यांनी कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी बिबट्याने संतापून त्यांच्यावरच झडप घातली. झालेल्या झटापटीत कदम जखमी झाले. आरडाओरड आणि गोंधळामुळे बिबट्या घटनास्थळावरून पळून गेला.

घटनेनंतर जखमी अवस्थेत विनोद कदम यांना तातडीने ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून पाहणी केली.

दरम्यान, या घटनेमुळे पवारवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्री एकटे बाहेर न पडणे, पाळीव जनावरांची काळजी घेणे व संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, असेही सांगण्यात आले आहे.

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

रयत सहकारी पतपेढीचा रौप्यमहोत्सवी टप्पा; २५ कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल, सभासदांसाठी ११% व्याजदराची विशेष ठेव योजना.



मुंबई – रयत सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई-२ या संस्थेने आपल्या स्थापनेपासून सामाजिक बांधिलकी जपत आज २५ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. संस्थेचे संस्थापक-संचालक श्री. शिवाजीराव बापूसाहेब माटेकर यांनी सन २००२ मध्ये गोरगरीब जनतेची आर्थिक अडचण दूर व्हावी आणि सावकारीच्या जाचक व्याजातून त्यांची मुक्तता व्हावी या उद्देशाने या पतसंस्थेची स्थापना केली.

स्थापनेपासूनच सर्वसामान्यांच्या विश्वासावर उभी राहिलेली ही संस्था आज भक्कम आर्थिक प्रगती करत असून सन २०२६ अखेर संस्थेचा व्यवसाय तब्बल १५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे, रौप्यमहोत्सवी वर्षात संस्था २५ कोटींच्या व्यवसायाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

या विशेष वर्षानिमित्त संस्थेने आपल्या सभासदांसाठी आकर्षक मुदत ठेव (FD) योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ३७ महिन्यांच्या कालावधीसाठी ११% इतका आकर्षक व्याजदर देण्यात येत आहे. सुरक्षित गुंतवणुकीसह जास्त परतावा मिळवण्याची ही उत्तम संधी असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग तसेच दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही प्रगती साध्य झाली असून, आगामी काळातही सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

तरी सर्व सभासद व हितचिंतकांनी या रौप्यमहोत्सवी विशेष ठेव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.या योजनेबाबत अधिक माहिती, अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी सभासदांनी जवळच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्कासाठी –

मुख्य कार्यालय (धोबीतलाव): ८३६९३४४८५८

पवई शाखा: ७०२१६९०९६१

सानपाडा शाखा: ९३७२४२७२३६

बुधवार, १ एप्रिल, २०२६

“गोवा मुक्ती संग्रामातील शिलेदार हरपला… कुंभारगावचे जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक गणपत गुरव यांचे निधन”


कुंभारगाव (ता. पाटण) येथील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गोवा मुक्ती संग्रामातील धाडसी शिलेदार श्री. गणपत विष्णू गुरव यांचे दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुंभारगावसह संपूर्ण पाटण तालुक्यावर शोककळा पसरली असून, स्वातंत्र्यलढ्यातील एक जिवंत इतिहास आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

स्वातंत्र्य, न्याय आणि देशभक्ती यांसाठी आयुष्य झिजवणारे गणपत गुरव हे पाटण तालुक्यातील एकमेव जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जात होते. विशेषतः गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य होते. त्यांच्या धाडस, त्याग आणि राष्ट्रप्रेमामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली.

त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्री. अनंत गुरव, मंडळ अधिकारी श्री. मुल्ला, तलाठी श्री. गायकवाड तसेच कुंभारगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा श्री. संजय गुरव (माजी ग्रामपंचायत सदस्य), सून सौ. वैशाली गुरव (ग्रामपंचायत सदस्य), दोन मुली, तसेच नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या अस्थींचे रक्षाविसर्जन दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता वैकुंठधाम, कुंभारगाव येथे होणार आहे.

गणपत गुरव यांचे आयुष्य म्हणजे देशसेवेचा दीपस्तंभच… त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी राहतील.

शेतात झाडाच्या फांद्या तोडताना लागला विजेचा धक्का; उमरकांचनच्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

 

पाटण तालुक्यातील जिंती - उमरकांचन गावावर दुःखाचे सावट पसरवणारी हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली. शेतातील झाडाच्या फांद्या तोडत असताना विजेचा तीव्र धक्का बसून आनंदा विष्णू मोहिते (वय ५६) या कष्टकरी शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंदा मोहिते हे आपल्या पानंदिवली शिवारातील शेतात नेहमीप्रमाणे कामासाठी गेले होते. शेतातील झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम ते करत होते.करंजीच्या झाडावर चढून फांद्या तोडत असताना अचानक एक फांदी तुटून जवळून गेलेल्या ३३ केव्ही वीजवाहक तारांमध्ये अडकली. क्षणार्धात जोरदार विद्युतप्रवाह त्या फांदीतून त्यांच्या शरीरात उतरला आणि त्यांना भीषण शॉक बसला.

घटना इतकी अचानक आणि भीषण होती की, त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही क्षणातच त्यांनी प्राण सोडले. कुटुंबासाठी आधारस्तंभ असलेला माणूस अशा दुर्दैवी घटनेत गमावल्याने मोहिते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती दादाराम मोहिते यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण, हवालदार प्रशांत चव्हाण, तसेच धीरज मुळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

मृतदेह पुढील तपासणीसाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. पी. दोडके पुढील तपास करत आहेत.

शेतात काम करताना विजेच्या तारांपासून सुरक्षित अंतर राखणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देणारी ही दुर्दैवी घटना आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अशा उघड्या वीजवाहक तारांबाबत योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

बुधवार, २५ मार्च, २०२६

तळमावले परिसरात पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी; अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम.तेल पुरवठा सुरळीत ! अफवांवर विश्वास ठेवू नका पुरवठा विभागाचे आवाहन.

 

📍 तळमावले, ता. पाटण | दि. २५ मार्च २०२६

तळमावले व परिसरात आज सकाळपासून पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याची अफवा पसरल्याने नागरिकांनी घाईघाईने इंधन भरण्यासाठी पंपांकडे धाव घेतली.

स्थानिकांमध्ये अशी चर्चा सुरू होती की अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी खबरदारी म्हणून आपल्या वाहनांमध्ये अतिरिक्त इंधन साठवण्याचा प्रयत्न केला.

परिणामी, तळमावलेत विविध पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थितीही निर्माण झाली होती. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पंप कर्मचाऱ्यांनाही ताणाचा सामना करावा लागला.पेट्रोल पंप धारकांनाही याबाबत आगाऊ सूचना मिळाली नसून तेल पुरवठा व्यवस्थित सुरू आहे.पण अफवा पसरल्यामुळे नागरिक विनाकारण पंपावर तेल भरण्यासाठी गर्दी करत आहे,असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर स्पष्टीकरण देताना पुरवठा विभाग पाटणचे अधिकारी श्री. ज्ञानेश्वर खरोडे यांनी स्पष्ट केले की,
“तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. कोणतीही टंचाई नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.”

तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केली की, अनावश्यक घाई किंवा साठेबाजी टाळावी आणि परिस्थिती शांत ठेवण्यास सहकार्य करावे.

सद्यस्थितीत कोणतीही इंधन टंचाई नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्यामुळे नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. अफवांमुळे निर्माण होणारी घबराट टाळणे हीच खरी जबाबदारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शनिवार, २१ मार्च, २०२६

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.


सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होणार आणि कोणाचा ‘गेम’ वाजणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क रंगत असतानाच अखेर २० मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड पार पडली आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.

सुरुवातीला सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची सत्ता स्थापन होईल, असे स्पष्ट चित्र दिसत होते. मात्र शेवटच्या क्षणी घडलेल्या राजकीय घडामोडींनी सर्व गणिते कोलमडली आणि भाजपने अनपेक्षितरीत्या बाजी मारत जिल्हा परिषदेत ‘कमळ’ फुलवले.

या निवडीत भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर राजू भोसले यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. या निकालामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांना जबर धक्का बसला आहे.

दरम्यान, या विजयाचा आनंद तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

या वेळी भारतीय जनता पार्टी पाटण तालुका अध्यक्ष मा. गणेशजी यादव, बनपुरी ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, तालुका उपाध्यक्ष बाबा मोकाशी, कामगार मोर्चा अध्यक्ष ओमकार माने, सरचिटणीस संतोष देसाई, दिव्यांग आघाडी अध्यक्ष गणेश पाटील, धनाजी मोहिते, दरबार हॉटेलचे मालक महेंद्र कांबळे, भगवान माने तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निकालामुळे सातारा जिल्ह्याच्या आगामी राजकारणावर मोठा प्रभाव पडणार असून पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शुक्रवार, २० मार्च, २०२६

ढेबेवाडी - श्री नाईकबा यात्रा २०२६ : प्रशासनाचा यात्रा तयारीचा आढावा पूर्ण.

 

ढेबेवाडी, ता. 20 : श्री क्षेत्र बनपुरी येथील श्री नाईकबा देवाच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसह स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

आज प्रांताधिकारी सोपान टोंपे व तहसीलदार अनंत गुरव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली असून यात्रेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांना जबाबदाऱ्या सोपविताना हयगय अजिबात सहन केली जाणार नाही, असा कडक इशारा देण्यात आला.

येत्या २३ मार्च रोजी नैवेद्य तर २४ मार्च रोजी पालखी सोहळा होणार असल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


 बैठकीतील प्रमुख निर्णय व सूचना

  • धोकादायक वीजवाहिन्या व केबल्सचा तातडीने सर्व्हे करून दुरुस्ती
  • वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिस व आरटीओ यांचा समन्वय
  • पुरेसा पोलिस बंदोबस्त व सीसीटीव्ही यंत्रणा
  • पार्किंगची सुयोग्य व्यवस्था
  • पिण्याच्या पाण्याची शुद्धता तपासणी
  • आरोग्य पथके व औषध साठा सज्ज ठेवणे
  • बेकायदा दारू विक्रीवर कठोर कारवाई
  • स्वयंसेवकांची विशेष टीम नियुक्त
  • मंदिर परिसरात कंट्रोल रूम उभारणे
  • गर्दीत बैलांना प्रवेश न देण्याचे निर्देश
  • अग्निशमन यंत्रणा व अँब्युलन्स सेवा तैनात
  • महिंद धरणातून योग्य वेळी पाणी सोडण्याचे नियोजन

या बैठकीस प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार अनंत गुरव, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे, उपअभियंता गिरीश सावंत, सरपंच मनोज पाटील, उपसरपंच सचिन जानुगडे, ट्रस्ट अध्यक्ष विलासराव जानुगडे, ॲड. अविनाश जानुगडे, तसेच ग्रामपंचायत, यात्रा समिती, ट्रस्ट पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यात्रेकरूंना मदत व्हावी यासाठी अत्यावश्यक मोबाईल क्रमांकांसह विशेष माहितीपत्रक (डायरी) तयार करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.

यंदाची श्री नाईकबा यात्रा अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध होण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.

गुरुवार, १९ मार्च, २०२६

कळंत्रेवाडी भैरवदरा येथे एस.टी. बस थांबा बोर्ड; प्रवाशांच्या अडचणींचा शेवट.

कळंत्रेवाडी भैरवदरा येथे एस.टी. बस थांबा बोर्ड; प्रवाशांच्या अडचणींचा शेवट.

ठाणे – गलमेवाडी मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची घडामोड घडली आहे. कुंभारगाव–मान्याचीवाडी दरम्यान असलेल्या कळंत्रेवाडी भैरवदरा येथे अखेर एस.टी. बस थांब्याचा अधिकृत बोर्ड आज दिनांक १९ मार्च २०२६ रोजी बसविण्यात आला.

ठाणे ते गलमेवाडी व गलमेवाडी ते ठाणे अशी एस.टी. बस सेवा दररोज सुरू असली, तरी कळंत्रेवाडी भैरवदरा येथे अधिकृत थांबा दर्शवणारा बोर्ड नसल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रत्येक वेळी चालक व वाहक वेगळे असल्याने या ठिकाणी बस थांबवावी की नाही, याबाबत संभ्रम निर्माण होत असे. परिणामी, बस थांबवण्यावरून प्रवासी व एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार वाद होत होते.

या समस्येची गांभीर्याने दखल घेत कळंत्रेवाडी भैरवदरा येथील ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, आज अधिकृत थांबा बोर्ड बसवण्यात आला आहे.

या बोर्डामुळे आता चालक व वाहकांना स्पष्ट मार्गदर्शन मिळणार असून, सर्व एस.टी. बसेस नियमानुसार येथे थांबतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होऊन प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले असून, “ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे ही समस्या सुटली,” अशी भावना व्यक्त केली आहे.

ही सुविधा सुरू झाल्याने कळंत्रेवाडी भैरवदरा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बुधवार, १८ मार्च, २०२६

*'सेल्फी विथ गुढी' स्पर्धेत सहभागी होण्याचे 'स्पंदन' चे आवाहन*


तळमावले/वार्ताहर : 
गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुध्द
प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या
पहिल्या दिवशी महाराष्ट्रात साजरा
केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. हिंदू नवीन वर्ष या दिवसापासून सुरु होते. साडेतीन मुहूर्तापैकी एक हा मुहूर्त समजला जातो. दारी
उभारलेली गुढी हे विजय आणि समृध्दीचे प्रतिक आहे असे मानले जाते. त्याचे औचित्य साधत
'चला संस्कृती जपूया' ही टॅगलाईन घेवून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने 'सेल्फी विथ गुढी' ही
अनोखी स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेचे हे सातवे पर्व आहे. सध्या अनेकजण सेल्फी काढून फेसबुक,  व्हॉटसअप, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर अपलोड करीत असतात. सेल्फी काढण्याचा मोह तरुणांपासून ज्येष्ठापर्यंत कुणालाही आवरता आलेला नाही. याच क्रेझचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग कसा करता येईल याचा विचार स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शेतीमित्र डॉ. संदीप डाकवे यांनी केला. आजही आपण आपली संस्कृती तितक्याच उत्साहाने जपत आहोत हे
दर्शवण्यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने 'सेल्फी विथ गुढी' ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. ट्रस्टने आतापर्यंत राबवलेल्या प्रत्येक सामाजिक, कलात्मक उपक्रमाला समाजाच्या सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'सेल्फी विथ गुढी' या स्पर्धेत आपण आपला सेल्फी
'व्हॉटसअप' करायचा आहे. सेल्फी काढताना आपण पारंपारिक पोशाख परिधान केलेला असावा.
सेल्फी मधून आपण आपली संस्कृती जपत असल्याचे दिसले पाहिजे. सदर सेल्फी गुढीपाडव्यादिवशी म्हणजेच गुरुवार दि. 19 मार्च, 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवायचा आहे. सदर सेल्फी पाठवताना त्यावर संपूर्ण नाव आणि पत्ता नमूद करणे आवश्यक आहे. सदर सेल्फी ९७६४०६१६३३ भ्रमणध्वनीवरती पाठवण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे. विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अभिमानपत्र आणि पुस्तक देवून सन्मानित करण्यात येईल. तर सर्व सहभागी स्पर्धकांना ई-डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 'सेल्फी विथ गुढी' या स्पर्धेत आतापर्यंत 24 जणांना गौरवले आहे. नेहमीच नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट ने आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. या कामाची दखल घेत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला अनेक पुरस्कारानी गौरवण्यात आले आहे.

*“वाघजाई देवी यात्रोत्सव २०२६ : भक्ती, परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचा भव्य संगम*


मौजे अंबवडे खुर्द परिसरातील सिध्दार्थ नगर, मघले आवाड, पुढचे आवाड, महादेव नगर, शिंदेवाडी व चोरगेवाडी या गावांचे ग्रामदैवत असलेल्या जागृत देवस्थान श्री वाघजाई देवीच्या भव्य वार्षिक यात्रोत्सवाचे आयोजन गुरुवार दि. १९ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. सकाळी ८.०० ते सायं. ६.३० या वेळेत होणाऱ्या या सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या यात्रोत्सवात धार्मिक विधींसह सामाजिक उपक्रमांचाही सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. सकाळी ८ वाजता श्री वाघजाई देवीला अभिषेक, पूजा, आरती व नैवेद्याने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता श्री नवलाई देवीची पूजा पार पडेल.

विशेष म्हणजे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी, उपचार व भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून, समाजासाठी हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे. “रक्तदान करा, जीवनदान द्या” या संदेशासह नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुपारी २.३० वाजता सरपंच सौ. अनिताताई मोडे व मान्यवरांच्या शुभहस्ते देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार असून, त्यानंतर माहेरवाशिनींसाठी हळदी-कुंकू समारंभ रंगणार आहे. दुपारी ३.१५ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.

दुपारी ३.३० वाजता श्री काळेश्वर देवाच्या पालखीचे आगमन होऊन, पालखी सोहळा आणि देवी दर्शनाचा भव्य कार्यक्रम पार पडेल. सायंकाळी ५ ते ६ दरम्यान गुलाल व खोबरे उधळत यात्रोत्सवाचा जल्लोषमय वातावरणात समारोपाकडे प्रवास होईल. सायं. ६.४५ वाजता यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

भाविकांच्या सोयीसाठी नवलाई देवी परिसरात पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. या यात्रोत्सवाचे आयोजन वाघजाई युवामंच शिंदेवाडी-चोरगेवाडी, ग्रामस्थ व श्री काळेश्वर देवस्थान समिती, अंबवडे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

तसेच शिवसमर्थ परिवार संचलित शिवआरोग्य सेवा हॉस्पिटल, तळमावले आणि महालक्ष्मी ब्लड सेंटर, कराड यांच्या सहकार्याने आरोग्य व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

“चला, रक्तदान करूया आणि एखाद्याच्या जीवनात आनंदाचा किरण निर्माण करूया!”

📞 संपर्क: 94212 09047 / 8169005578 / 70399 03639

👉 आयोजकांनी सर्व भाविकांना सहकुटुंब, मित्रपरिवारासह उपस्थित राहून श्री वाघजाई देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि यात्रोत्सवाची शोभा वाढवावी, असे कळकळीचे आवाहन केले आहे.

मंगळवार, १७ मार्च, २०२६

“कुंभारगाव - पालकमंत्री कार्यालय आपले दारी” उपक्रमास मान्याचीवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

“पालकमंत्री कार्यालय आपले दारी” उपक्रमास मान्याचीवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

पाटण तालुक्यात शासनाच्या योजना गावपातळीवर प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई साहेब यांच्या संकल्पनेतून  राबविण्यात येत असलेल्या “पालकमंत्री कार्यालय आपले दारी” या उपक्रमास मान्याचीवाडी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आज मंगळवार दिनांक १७ मार्च २०२६ रोजी पाहायला मिळाले.

राज्याचे  मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा. श्री. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांची माहिती घेतली तसेच आपल्या अडचणी मांडल्या.

मान्याचीवाडी येथील श्री कुमजाई देवी मंदिर येथे पार पडलेल्या या शिबिरात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध योजना, कागदपत्रे, दाखले, तसेच अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. अनेक नागरिकांची कामे तत्काळ मार्गी लागल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमामुळे नागरिकांना तालुका कार्यालयात वारंवार जावे लागण्याची गरज कमी होत असून, शासन सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी युवा नेते श्री. स्वप्नील भरत माने, शिवसेना शाखा प्रमुख श्री. पांडुरंग आबासो माने, उपशाखा प्रमुख श्री. कुणाल पोपट माने, कुमजाई देवी चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार श्री. संजय बापूराव माने, श्री. तानाजी खाशाबा कुसळे, श्री. रोहित नारायण माने श्री,उमेश बबन माने,श्री.दिलीप आनंदा माने,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करण्यात येत असून, अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पाटण तालुक्यात ४६ लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड; भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वात उपक्रम”

पाटण : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा.श्री.अतुल भोसले साहेब यांच्या नेतृत्वात तसेच पाटण ता...