दिवसा ढवळ्या गावात गव्यांचा थरार! काळगाव–येळेवाडीत वन्यप्राण्यांचा मुक्त संचार!
काळगाव–येळेवाडी बसस्टॉपजवळ सायंकाळी ५ वाजता गव्यांचा मुक्त संचार
शेतकरी भयभीत; वनविभागाच्या दुर्लक्षावर संताप
— साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज
प्रतिनिधी : चंद्रकांत मोडक, काळगाव (ता. पाटण)
काळगाव (ता. पाटण) : येळेवाडी बसस्टॉप ते मुख्य रस्त्याच्या परिसरात दिवसा ढवळ्या सायंकाळी सुमारे ५ वाजता रानगवे राजरोसपणे फिरताना दिसल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या नजरेसमोरून हे रानगवे नानासो येलवे यांच्या घरामागील भागातून ‘भैरीचा डोगर’ या दिशेने निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या भागात बिबट्या, रानगवे तसेच वानर यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शेतकऱ्यांना आता शेतात जाणे आणि पशुधनाची देखभाल करणे जीवघेणे ठरत आहे.
शेती आणि पशुधन धोक्यात
रानगव्यांचा आणि बिबट्यांचा सततचा वावर यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जनावरे चारायला सोडणे, लहान मुले घराबाहेर सोडणे, तसेच सायंकाळनंतर रस्त्यावरून जाणेही धोकादायक बनले आहे.
वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या परिसरात वारंवार वन्यप्राण्यांचे दर्शन होत असतानाही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तातडीने पिंजरे लावणे, गस्त वाढवणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा