गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

“रन फॉर युनिटी” — सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा


“रन फॉर युनिटी” — सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा

ढेबवाडी (प्रतिनिधी)
भारतीय एकतेचे शिल्पकार, लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त उद्या दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजीरन फॉर युनिटी” या विशेष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

हा उपक्रम ढेबवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने राबविण्यात येत असून, सकाळी ठीक 7.00 वाजता ढेबवाडी पोलीस स्टेशनच्या मैदानावरून मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. एकूण 3 किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन असेल.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश देशाच्या एकतेचा आणि एकजुटीचा संदेश देणे तसेच युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना बळकट करणे हा आहे. या निमित्ताने सर्व पत्रकार बांधवांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी आपल्या इच्छुक मित्रांना घेऊन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.

“रन फॉर युनिटी” हा कार्यक्रम देशभरात एकता, बंधुता आणि राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देणारा ठरणार आहे.

महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथे शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे सफाई कर्मचारी यांना मिठाई वाटप.

महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथे सर्व पक्षीय मंडळाच्या सल्लागारांच्या हस्ते उपक्रम संपन्न
मानखुर्द (प्रतिनिधी - विजय साबळे ) — समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखण्याच्या हेतूने शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथील सफाई कर्मचारी बांधवांना मिठाई वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे प्रतिष्ठानने दिवाळी सणाच्या निमित्ताने या कर्मचाऱ्यांना सन्मान आणि आपुलकीचा संदेश दिला. मिठाई वितरण सोहळ्यात सर्व पक्षीय मंडळाचे सल्लागार, स्थानिक मान्यवर आणि प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक करत समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दरवर्षी प्रतिष्ठानतर्फे राबवला जाणारा हा उपक्रम मानखुर्द परिसरात आदर्शवत ठरत असून, सामाजिक संवेदना जपणारी ही उपक्रमशीलता स्थानिकांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे प्रमुख विठ्ठल जाधव आणि अध्यक्ष धीरज गाडघे यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या पुढाकाराने अनेक सफाई कर्मचारी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली.

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

यशवंतनीती दिवाळी अंक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.

यशवंतनीती दिवाळी अंक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न...
सांस्कृतिक परंपरेचा आणि साहित्यातील वैभवाचा उत्सव साजरा करत "यशवंतनीती" दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. 
 या प्रसंगी युवा नेते श्री.चंद्रकांत चाळके साहेब, उद्योजक श्री.सुहास सावंत साहेब,श्री. सुभाष बावडेकर आण्णा,यशवंतनीतीचे संपादक श्री. संजय सावंत, तसेच श्री.शिवाजी नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत,यांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. 

 सुंदर मांडणी, आकर्षक विषय आणि अनेक मान्यवर लेखकांचे मनोगत, लेख आणि कथा यांनी सजलेला हा दिवाळी अंक वाचकांसाठी एक साहित्यिक मेजवानी ठरणार आहे.

 📘 "एकवेळ वाचवा — नक्कीच आवडेल असा हा दिवाळी अंक!"

नवी मुंबई दिवाळी बोनस व पगारवाडीसाठी ( NMMT ) कंत्राटी बस चालकांचा ठिय्या आंदोलन. दिवाळी बोनस आणि पगारवाढ न झाल्याने संताप!

📰नवी मुंबई - नवी मुंबई दिवाळी बोनस व पगारवाडीसाठी ( NMMT ) कंत्राटी बस चालकांचा ठिय्या आंदोलन. दिवाळी बोनस आणि पगारवाढ न झाल्याने संताप!
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम (NMMT) अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी चालक-कामगारांनी आज तुर्भे आगारात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हंसा सिटी बस या ठेकेदार कंपनीअंतर्गत कार्यरत चालकांना दिवाळी बोनस न देणे आणि पगारवाढ न करणे या कारणामुळे संताप व्यक्त करत हे आंदोलन उभारण्यात आले आहे. कामगारांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून ते कंत्राटी तत्त्वावर सेवेत असूनही दरवर्षी दिवाळी बोनस आणि योग्य पगारवाढ मिळत नाही. ठेकेदार कंपनीकडून वारंवार आश्वासन दिले गेले, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळेच आजपासून त्यांनी तुर्भे आगारात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी इशारा दिला आहे की, आज तोडगा निघाला नाही तर हे आंदोलन बेमुदत सुरू राहणार आहे. या आंदोलनामुळे काही बससेवा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासन आणि ठेकेदार कंपनीकडून अद्याप अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेले हे आंदोलन नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम करू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०२५

*सासपाडे येथील आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार* *- पालकमंत्री शंभूराज देसाई*

सासपाडे येथील आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार - पालकमंत्री शंभूराज देसाई* सासपडे येथील दोन्ही पिडीत कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत
सातारा दि.16: सासपडे येथील अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत पाठपुरवा करणार असून पिडीत कुटुंबला सर्व ती मदत केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पालकमंत्री श्री. देसाई यांनी सासपडे येथे जावून हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी खासदार नितीन पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी आशिष बारकुल उपस्थित होते. कुटुंबाला न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी या प्रकरणाची केस फास्ट्रॅक न्यायालयात चालवली जाणार आहे. पोलीस विभागाने सखोल तपास केला असून आरोपी कुठल्यही परिस्थितीत सुटणार नाही. केस फास्ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी नामांकित वकील देण्यात येईल. सासपडे येथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस पेट्रोलिंग वाढवावे, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी पोलीस विभागाला सूचना केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार शिवसेना पक्षाच्यावतीने पालकमंत्री श्री. देसाई यांनी स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रत्येकी 5 लक्ष रुपयाची मदत दोन पिडीत कुटुंबांना दिली आहे.

सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्त्या प्रकरणात फास्ट्रॅक न्यायालयात केस चालवली जाणार -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

सासपडे येथील अल्पवयीन मुलीच्या हत्त्या प्रकरणात फास्ट्रॅक न्यायालयात केस चालवली जाणार
 -राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

सातारा दि.16:  सासपडे येथील अल्पवयीन मुलीची  निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबाला न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी या प्रकरणी केस फास्ट्रॅक न्यायालयात चालवली  जाणार आहे. राज्य महिला आयोगामार्फत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी  शिफारस करणार असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी सासपडे येथे जावून चव्हाण कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी उपस्थित होते.

चव्हाण कुटुंबीयांना कोणत्याही प्रकाराचा त्रास होऊ नये, यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, असे सांगून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, मनोधैर्य योजनेतून कुटुंबाला तातडीने मदत करावी. तसेच  मुख्यमंत्री सहायता निधीतूनही कुटुंबाला मदत मिळवून देण्यात येईल. राज्य महिला आयोग आपल्या पाठीशी असून  न्यायालयात जास्तीत जास्त पुरावे सादर करुन आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील. 

सासपडे सारखी घटना सातारा जिल्ह्यात पुन्हा घडू नये, यासाठी पोक्सोमधील जे गुन्हेगार  बाहेर आहेत  ते सध्या काय करीत आहेत, याची तपासणी करुन काही गैरवर्तन करीत असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश श्रीमती चाकणकर यांनी पोलीस विभागाला दिले.
0000

पाटण मतदारसंघातील विकासकामांसाठी 8 कोटी 42 लाख : ना. शंभूराज देसाई यांचे प्रयत्न

पाटण मतदारसंघातील विकासकामांसाठी 8 कोटी 42 लाख : ना. शंभूराज देसाई यांचे प्रयत्न


ढेबेवाडी - पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी 8 कोटी 42 लाख 28 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ना.शंभूराज देसाई यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

आमदारांच्या स्थानिक विकास निधी,सर्वसाधारण साकव योजना व विशेष घटक साकव योजना या योजने अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी ना.देसाई यांनी शिफारशी केल्या होत्या. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी 8 कोटी 42 लाख 28 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती ना. शंभूराज देसाई यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

ना.देसाई यांनी विविध विकास कामांना शासनाचे वेग वेगळया योजनांमधून निधी मंजूर होण्यासाठी सन 2025-26 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये या कामांचा समावेश होण्यासाठी शिफारशी केल्या होत्या. त्यानुसार संबंधित विभागांनी या कामांचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केले होते. ना. देसाई यांच्या प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आमदारांचे स्थानिक विकास निधी, सर्वसाधारण साकव योजना व विशेष घटक साकव योजना या योजने अंतर्गत 8 कोटी 42 लाख 28 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

स्थानिक विकास निधी अंतर्गत कुंभारगाव ते भैरवदरा ररस्ता डांबरीकरण 10 लाख, कामरगाव अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, जाधववाडी (मालदन) अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, आंबेवाडी (घोट) अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, गर्जेवाडी (कडवे ) येथे अंतर्गत रस्ता सुधारणा करणे व गटर 15 लाख, वाघणे गावपोहोच रस्ता सुधारणा 20 लाख, गोठणे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, मंद्रुळ हवेली येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 15 लाख, मारुलहवेली अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लाख, मेंढोशी वरची येथे अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, गोठणे लिंगवणे ओढा ते गावातील मागासवर्गीय वस्ती सुधारणा 15 लाख, मंद्रुळकोळे बौध्दवसती स्मशानभूमी संरक्षक भिंत 15 लाख, चौगुलेवाडी (काळगाव) आचरेवाडी मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, सातेवाडी मातंगवस्ती (नाटोशी ) येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 15 लाख, मंद्रुळकोळे खुर्द ता.पाटण साबळेवाडी शिव अंतर्गत रस्ता सुधारणा 6.95 लाख या प्रमाणे 15 कामांसाठी 2 कोटी 21 लाख 95 हजार तर

सर्वसाधारण साकव योजने अंतर्गत कोंजवडे ओढयावर साकव 43.15 लाख,तोंडोशी ओढयावर साकव 78.34 लाख,जाळगेवाडी खालची स्मशानभूमी ओढयावर साकव 54.20 लाख,धावडे येडोबा मंदिर रस्त्यावरील ओढयावर साकव 40 लाख, मंगेवाडी मरळी येथील ओढयावर साकव 40 लाख, केळोली खालची येथे ओढयावर साकव 51.67 लाख, धामणी जाधववस्ती ओढयावर साकव 69.99 लाख, साबळेवाडी मानेवस्ती जवळ साकव 38.89 लाख, ऊरुल ते बोडकेवाडी रस्त्यावरील ओढयावर साकव 49 लाख, आडदेव खालचे येथे (स्लॅब ड्रेन )साकव असे 10 साकवचे कामांसाठी 4कोटी 95 लक्ष 24 हजार आणि विशेष घटक साकव योजने अंतर्गत मरळोशी मागासवर्गीयवस्ती रस्त्यावर साकव 45.16 लाख,मंद्रुळकोळे बौध्दवस्ती रस्त्यावर साकव 39.93 लाख व मुळगाव मागासवर्गीयवस्ती रस्त्यावर साकव 40 लाख असे मागासवर्गीय वस्त्यांमधील ओढयावर साकवचे कामांसाठी 1 कोटी 25 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.


तळमावले- महिलांना संमोहित करत पैसे व दागिने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना कपडे फाटेपर्यंत चोप.

तळमावले (ता. पाटण) परिसरात घरात घुसून वयोवृद्ध व्यक्तींसह महिलांना संमोहित करत पैसे व दागिने लुटण्याचा दोघा संशयितांकडून प्रयत्न केला जात असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.या दोन्ही संशयितांना कपडे फाटेपर्यंत स्थानिकांनी चोप दिला आहे. मात्र मंगळवारी रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात झाली नसल्याने अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.

ढेबेवाडी परिसरातील तळमावले विभागात दोन व्यक्ती घरोघरी जाऊन महिला तसेच वयोवृद्घांची भेट घेत होते. दोन्ही व्यक्ती लोकांना विशेषतः महिलांना संमोहित करून घरातून दागिने व पैसे आणा असे सांगत होते आणि एका व्यक्तीकडून चार हजार रूपये घेताना रंगेहाथ सापडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी दोन्ही संशयितांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. दोन्ही व्यक्ती बारामती परिसरात असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी या घटनेची नोंद मंगळवारी रात्रीपर्यंत ढेबेवाडी पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी अशा अनोळखी व्यक्तींविषयी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस अधिकाऱ्यांकडून संशयितांविरुद्ध पुढील कारवाई अपेक्षित आहे.

बुधवार, १५ ऑक्टोबर, २०२५

विद्यार्थ्यांचा सन्मान — प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्थेचा उपक्रम, सळवे येथे गुणगौरव सोहळा व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

विद्यार्थ्यांचा सन्मान — प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्थेचा उपक्रम सळवे येथे गुणगौरव सोहळा व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.
सळवे (ता. पाटण, जि. सातारा) — ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, या हेतूने प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्था नेहमीच कार्यरत असते. सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त यावर्षीही विद्यार्थी गुणगौरव सोहळा व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम शनिवार, दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता सळवे येथील माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात इयत्ता १०वी मध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या पहिल्या सहा विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, बॅग आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सळवे, एकावडेवाडी आणि वरपेवाडी येथील एकूण 150 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय जिजाऊ आश्रम, कोळे येथे धान्य व शालेय वस्तूंचे वाटप करून सामाजिक कार्याचा उत्कृष्ट आदर्श संस्थेने घालून दिला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष आनंद कदम, पदाधिकारी प्रशांत खरात, विजय कदम, संदीप कदम, प्रताप कदम, समाजसेवक तुकाराम कदम महाराज, तसेच सळवे ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली पवार, माजी सरपंच शंकर कुंभार, लक्ष्मण बोर्गे, फौजी विलास मोहिते, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक सौ. प्रतिभा सावंत मॅडम, मुख्याध्यापक चव्हाण सर, पाटील मॅडम, चोरगे सर तसेच इतर शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोगत आणि आभार प्रदर्शनाने सोहळ्याची सांगता करण्यात आली. 🌸 प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्थेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, ग्रामीण भागात शिक्षणाच्या प्रोत्साहनासाठी एक आदर्श उदाहरण ठरले आहे. 🌸

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५

उद्या पाटणमध्ये सासपडे घटनेविरोधात ‘जोडे मारो आंदोलन’;

उद्या पाटणमध्ये सासपडे घटनेविरोधात ‘जोडे मारो आंदोलन’; पाटण (साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी): सासपडे येथे अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ माहेर महिला आधार केंद्र, पाटण व समस्त भगिनींच्या वतीने ‘जोडे मारो आंदोलन’चे आयोजन करण्यात आले आहे. ही केवळ निषेध सभा नसून, अन्यायाविरुद्ध जनआक्रोश व्यक्त करण्यासाठी चपलेने खेद व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे. "निष्पाप मुलीवर अन्याय करणाऱ्या हरामखोरास केवळ शिक्षा नव्हे, तर फाशीच झाली पाहिजे," असा संतप्त सूर महिलांच्या या आंदोलनात उमटतो आहे. बुधवार, दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता झेंडा चौक, पाटण येथे हे आंदोलन होणार आहे. पाटण शहरातील व परिसरातील सर्व बंधू-भगिनींनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक  विद्या म्हासुर्णेकर यांनी केले आहे. 
 आवाहनकर्त्या: विद्या म्हासुर्णेकर (माहेर महिला आधार केंद्र, पाटण) 📞 संपर्क: ९१३०३७५२०९

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

सातारा - जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापतिपदांची आरक्षण सोडत जाहीर.

सातारा -  जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापतिपदांची आरक्षण सोडत जाहीर.


सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापतिपदांची आरक्षण सोडत जाहीर झाली असून त्यामध्ये सातारा, वाई, माण व जावलीसाठी खुला, तर कराड, पाटण व खंडाळा तालुक्याचे सभापतिपद खुला प्रवर्ग महिलेसाठी राखीव झालेे.फलटण व कोरेगावसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तर महाबळेश्वरसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आरक्षण पडले.

खटाव पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झालेे. सात सभापती पदे खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे जिल्ह्यात चुरस पाहायला मिळणार आहे. दरम्यान, दि. 13 ऑक्टोबरला होणार्‍या गट व गणांच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जाहीर करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, नूतन पवार, अधिकारी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुरूवातीला खटाव पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जाती प्रवर्ग महिलेसाठी जाहीर करण्यात आले. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण शालेय विद्यार्थी मंगेश गायकवाड व निशा कोळपे यांच्या हस्ते चिठ्ठ्या टाकून काढण्यात आले. फलटण व कोरेगाव पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी तर महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) आरक्षीत करण्यात आले.

शेवटी माण, सातारा, वाई व जावली पंचायत समित्यांचे सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर कराड, पाटण व खंडाळा समित्यांचे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याचे जाहीर करण्यात आले. सातारा, वाई, माण व जावलीसाठी खुला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी इच्छुकांची संख्या वाढणार आहे. तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत खुल्या गणात चांगलीच चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

कराड, पाटण व खंडाळा तालुक्याचे सभापतीपद खुला प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे या तालुक्यात महिलांसाठी दारे खुली झाली आहेत. त्यामुळे गावोगावी स्थानिक महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोमवार दि. 13 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेचे 65 गट व पंचायत समित्यांच्या 130 गणांचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे या आरक्षण सोडतीनंतरच गट व गणामध्ये इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. त्यामुळे सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले असले तरी गट व गणामध्ये कुणाला लॉटरी लागणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...