गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

सोशल मिडीया युगातील पत्रमित्र: डाॅ.संदीप डाकवे

सोशल मिडीया युगातील पत्रमित्र: डाॅ.संदीप डाकवे

9  ऑक्टोंबर, 1974 मध्ये स्वित्र्झलॅंडमधील बर्न येथे ‘युनिवर्सल पोस्टल युनियन’ ची स्थापना झाली. म्हणून 9 ऑक्टोंबर हा जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त डाॅ.संदीप डाकवे यांच्या पत्रमैत्री छंदाचा हा घेतलेला आढावा..
कराड/प्रतिनिधी
सध्या संगणकाचे युग आहे. तार, पोस्टकार्ड, आंतरर्देशीय पत्र, लखोटा याची जागा मोबाईल, एसएमएस, व्हाटसअप, फेसबुक, सोशल साईट, सोशल मिडीया आदी माध्यमांनी घेतलेली आढळते. सध्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच लोकांचा संवाद सुरु आहे. अशावेळी सुंदर हस्ताक्षरातील पोस्टकार्ड, एखादा लखोटा घरी आले तर गोंधळून जावू नका. कारण पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांनी हा पत्रमैत्रीचा छंद मोठया काळजीपूर्वक जपला आहे. ‘आई माझं पत्र हरवलं’ या बालगीताप्रमाणे सध्या खरोखरंच पत्र हरवल्याची परिस्थिती आहे. संदेशाचे साधन म्हणून मोठया प्रमाणात वापर केले जाणारे पोस्टकार्ड आणि आंतरर्देशीय पत्र नामशेष झाले असून सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पण डाॅ.संदीप डाकवे यांनी पत्रलेखन कला अत्यंत आत्मियतेने जपली आहे.
पूर्वी डोंगराळ आणि ग्रामीण भागात पोस्टमन येण्याचा दिवस असायचा. पोस्टमनलाही गावात मोठे स्थान होते. पत्र पोहोच करण्याबरोबरच वाचन आणि लिखाणही पोस्टमनला करावे लागत होते. गावातून बाहेर नोकरीला असलेल्या मुलांच्या पत्राकडे डोळे लावून बसलेले वृध्द आईवडील तर पोस्टमन दिसला की, हरखून जायचे मात्र सध्या पोस्ट कार्डकडे पाहण्यासाठी कोणाकडेही वेळ राहिला नसल्याची परिस्थिती आहे. पोस्टकार्ड आणि आंतरर्देशीय पत्राच्या माध्यमातून दोन कुटूंबातील ख्याली खुशाली कळत असे. एखाद्या कुटूंबात झालेली दुःखद घटनेची आणि आनंदाची माहिती याचा पत्रातून समजत असे. याबरोबर संपूर्ण देशाच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या आपल्या गावातील सैनिकांना तर आपल्या गावातील, आपल्या घरातील माहिती पत्राच्या माध्यमातून समजत होती. दीपावली, दसरा, पाडवा रक्षाबंधनावेळी पत्रांचा हमखास वापर व्हायचा. मात्र सध्या पत्राच्या माध्यमातून मिळणारा आनंद सोशल मिडीयाने संपवून टाकला आहे. फक्त काही सेकंदामध्ये शुभेच्छा दिल्या जात आहेत. पत्राच्या माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा हृदयापर्यंत पोहोचत होत्या. तसेच त्यात एकमेकांच्या भावना गुुंतलेल्या असायच्या आणि त्या पत्राचे जतनही केले जात होते; पण सोशल मिडीयाव्दारे दिलेले संदेश काही सेकंदामध्ये पुसले जातात. त्याच्या आठवणीही राहत नाहीत.

माणसाला जे समक्ष बोलता येत नाही ते तो पत्रलेखनातून व्यक्त करत होता. आजही ऐतिहासिक पत्राबरोबरच काही महत्त्वाच्या व्यक्तीच्या हस्ताक्षरातील पत्रे आपणाला पहायला मिळत आहेत. या पत्रातून काही व्यक्तींचा इतिहास उलगडला आहे. पण हे सर्व सोशल मिडीयाने नाहीसे केले आहे. आताची पोस्टकार्ड ही फक्त वधू-वर सुचक कार्यालय, बॅंक कार्यालय पोचपावतीकरता उरली असल्याचे दिसत आहे.

या छंदाविषयी बोलताना डाॅ.संदीप डाकवे म्हणाले की, ‘‘मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वाचकांचा पत्रव्यवहार यामध्ये विविध विषयांवर लेख लिहण्याचा छंद होता. या समाजप्रबोधनपर लेखामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना अनेक पत्रे येत असत. यावेळी नाशिक येथील संतोष शिंदे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त करुन आपल्या पत्रमैत्रीचा स्वीकार करावा अशी विनंती केली होती. यावरुनच मला पत्राव्दारे मैत्री करण्याचा छंद जडला आणि तो आजतागायत मी मोठया कौशल्याने जपला आहे. पत्रमैत्री छंदामुळेच आज मला लिखाणाची सवय लागली आहे, त्यामुळेच शासनाच्या विविध स्पर्धांत लेखन करुन महाराष्ट्र राज्य शासनाचे 4 व इतर अन्य संस्थाचे सुमारे 50 पुरस्कार मिळवले आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे.’’
त्यानंतर दैनंदिन वर्तमानपत्रे वाचत असताना त्यातील चांगल्या उपक्रमाचे, कामाचे कौतुक करण्यासाठी, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या व्यक्तीचे अभिनंदन करण्यासाठी डाॅ.संदीप संबंधित व्यक्तीला पत्र पाठवायचे त्याचे प्रत्युतर आल्यानंतर मग दोघांचे पत्रव्यवहार सुरु होतात. साहजिकच पुढे गुढीपाडवा, दसरा, दिपावली व विविध सणांच्यावेळी संदीपने सामाजिक आषय, घोषवाक्ये असलेली पत्रे पाठवली. या पत्रावर विविध प्रकारची डिझाईन टाकून ते कार्ड आकर्षक बनवण्याचा प्रयत्न संदीपचा असतो. या पत्रमैत्री छंदातून संदीपला आज अनेक पत्र मित्र मिळाले आहेत. यातील कित्येक जणांना अजून तो प्रत्यक्ष भेटला नाही. पण पत्रातून निर्माण झालेली ओढ त्याला वेगळा आनंद देते. पत्रमैत्री च्या माध्यमातून आज शेकडो मित्र त्याला मिळाले आहेत. फेसबुक, व्हाटसअप वरील मैत्रीपेक्षा मला अशी झालेली मैत्री जास्त आनंद देते असे संदीपचे मत आहे. आजही त्याला महिन्याला शेकडो पत्रे येत असतात. ही पत्रेही संदीपने जपून ठेवली आहेत.

पत्राच्या माध्यमातून केवळ पत्रमैत्री न करता विविध विषयाचे देवाणघेवाण, विचारांचे आदानप्रदान होते. त्यामध्ये डोंबिवलीचे ज्येष्ठ ग्रंथप्रसारक शरद जोशी हे संदीपला सतत विविध विषयांची माहिती लेख पत्राव्दारे पाठवून देतात. 2001 सालापासून सुरु झालेला हा पत्रांचा प्रवास आजही तितक्याच आत्मीयतेने संदीपने जोपासला आहे.

पत्रमैत्री छंदाबरोबरच संदीपने रांगोळी रेखाटन, शब्दातून चित्रे रेखाटणे, खडूतून अष्टविनायक, मोरपिसावर-जाळीदार पिंपळाच्या पानावर कलाकृती, छत्रीद्वारे व्यसनमुक्तीचा प्रयत्न, सर्वात मोठी ‘प्रतिबिंब’ भित्तीपत्रिका, जटानिर्मूलनासाठी प्रयत्न, विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थामधून कलाप्रदर्शने, अक्षरगणेश उपक्रम, चारोळी-कविता लेखन, व्यंगचित्र रेखाटन, पुस्तकांची मुखपृष्ठे तयार करणे असे विविध छंद सामाजिक बांधिलकीतून जोपासले आहेत. याशिवाय डाॅ.संदीप डाकवे याच्या ‘जलयुक्त शिवार अभियान’ या लेखपुस्तिकेचे, व ‘मनातलं’ हा चारोळीसंग्रह, ‘दीप उजळतो आहे’ या फोटोबायोग्राफी पुस्तिकेचे प्रकाशन झाले असून अजून 3 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
ज्यांना कुणाला डाॅ.संदीप डाकवे यांच्या या छंदाचे कौतुक करावयाचे असेल त्यांनी डाॅ.संदीप राजाराम डाकवे, मु.डाकेवाडी, पो.काळगांव, ता.पाटण, जि.सातारा. 415112. भ्रमणध्वनी : 9764061633 यावर संपर्क साधावा.

चौकट :
तार आल्याने घाबरले कुटूंबीय :

आपल्या पत्रमैत्रीबाबतची आठवण सांगताना डाॅ.संदीप म्हणाले, नाशिक येथील राहूल तोरकडे हे माझे पत्रमित्र आहेत. एकदा त्यांनी काही पत्रे संदीपला पाठवली; पण ती पत्रे संदीपकडे न पोहोचल्यामुळे संदीपकडून या पत्राचे उत्तर द्यायचे राहून गेले. त्यामुळे राहूल तोरकडे हे सुध्दा काळजीत पडले. त्यांनी तात्काळ तार पाठवली. तार आल्यामुळे संदीपच्या अनुपस्थितीत सगळे कुटूंबीय घाबरुन गेले. मात्र त्यानंतर तार वाचली व त्यातील मजकूर वाचून सगळयांना हायसे वाटले.


मान्यवरांकडून छंदाचे कौतुक :

डाॅ.संदीप डाकवे याच्या या अनोख्या पत्रमैत्री छंदाचे कौतुक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई, माजी शालेय शिक्षण मंत्री ना.विनोद तावडे, खा.उदयनराजे भोसले, खा.अरविंद सावंत, खा.डाॅ.अमोल कोल्हे, सिक्कीमचे माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील, सुप्रसिध्द उद्योजक व कामत हाॅटेलचे मालक विठ्ठल कामत, सुप्रसिध्द व्याख्याते प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, कवी इंद्रजित भालेराव,  गझलकार प्रदीप निफाडकर, राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त शिक्षिका ज्योती जीवनदास शहा, अक्षरमित्र ओंकार पाटील, ग्रंथप्रसारक शरद जोशी यांनी प्रत्यक्ष पत्र पाठवून कौतुक केले आहे. त्यामुळे संदीपच्या पत्रमैत्री या छंदाला आणखी ऊर्जा आणि पाठबळ मिळाले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...