कराड विंग प्रतिनिधी :-
विंग येथील आकाश कृष्णत घोरपडे (वय 19) या बालकीर्तनकाराचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला. विषारी औषध प्राशन करून त्याने जीवनयात्रा संपवली. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी आकाशचा मृत्यू अनेकांच्या जिवाला चटका लावून गेला.
याबाबतची अधिक माहिती अशी शुक्रवारी (ता. 28) औषध प्राशन केल्यानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचाराला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मुंबईच्या कांजूरमार्ग पोलिसात घटनेची नोंद झाली आहे, मंगळवारी (ता.3) दुपारी विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.आकाशच्या घरची परिस्थिती बेताची आहे. खेळण्या- बागडण्याच्या वयातच त्याने सांप्रदायिक मार्ग स्वीकारला होता. दोन वर्षांपूर्वी तो आळंदी येथे सावता माळी वारकरी सांप्रदायात सहभागी झाला होता. तत्पूर्वी तेरच्या वारकरी शिक्षण प्रसारक मंडळात तो होता. त्याची मोठा कीर्तनकार बनण्याची इच्छा होती. दरम्यान, तो मुंबईत एका दुकानात नोकरीस लागला. दिवसभर नोकरी करून तो रात्री सांप्रदायिक शिक्षण तो घेत होता, असे ग्रामस्थांनी सांगितले. येथे झालेल्या ज्ञानेश्वरी सप्ताहात त्याने बालकीर्तनही केले होते. त्याच्या मागे आई- वडील व एक भाऊ असा परिवार आहे. वडील मूकबधिर असून, आई अशिक्षित आहे. त्याच्या भाऊ कडेगावला प्राथमिक शिक्षण घेत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा