सातारा प्रतिनिधी :
जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभागाच्या असलेल्या प्रयोगशाळेतून बोगस तांत्रिक अहवाल मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. या विभागातील कर्मचार्यांविरुद्ध जिल्हा परिषद सदस्यांनीच तक्रार केली होती मात्र या तक्रारीवरील कारवाईसाठी जि. प. प्रशासनाकडून मुहूर्त मिळेनासा झाला आहे.
जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यात करण्यात येणार्या विविध कामांची तपासणी करण्याकरता सुसज्ज अशी तांत्रिक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत स्थापत्य अभियात्रिंकी पदवी किंवा पदवीधारण केलेला कर्मचारी काम पहात असतो. बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी एखाद्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्या कामामध्ये वापरण्यात येणार्या साहित्याबाबत त्यांना शंका येत असते.
प्रयोगशाळेतील तांत्रिक बाबींची तपासणी करणे हे कनिष्ठ अभियंता किंवा शाखा अभियंत्याचे काम आहे. मात्र तसे न होता संबंधित कर्मचारी आपल्या अनुभवाच्या जोरावर व आर्थिक देवाण घेवाण करून त्या ठिकाणी आपले चांगले बस्तान बांधून बसले आहेत.अशावेळी कामामध्ये वापरण्यात येणारी वाळू, सिमेंट वीट, भाजकी वीट, क्रश सॅन्ड, खडी, सिमेंट यांची या प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. संबंधित ठेकेदारांच्या अंदाजपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे या साहित्यांची तपासणी केली जाते.जिल्हा परिषदेच्या तांत्रिक प्रयोगशाळा व तेथील असणारे कर्मचारी हे ठेकेदार तसेच जिल्हा परिषदेच्या सदस्यांशी उध्दटपणे बोलतात. तसेच कामांचे अहवाल बोगस दिले जातात याबाबत सदस्यांसह ठेकेदारांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार केली होती.
त्यामुळे हम करे सो कायदा याप्रमाणे या प्रयोगशाळेचा कारभार चालू आहे. अनेक ठिकाणच्या कामावर निकृष्ट दर्जाचा माल वापरला जात आहे. मात्र या प्रयोगशाळेत संबंधित वापरलेल्या साहित्याची तपासणी केली तर हा माल चांगला वापरला जात असल्याचा रिपोर्ट मिळत आहे. त्यामुळे या प्रयोगशाळेविषयीच साशंकता निर्माण होत आहे. संबंधित कर्मचार्याला सीईओंचे कोणतेही आदेश नसताना तो काम करत आहे. मात्र हा कर्मचारी कार्यकारी अभियंत्यांच्या आदेशानुसार काम करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा