राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर, 2020 ते 5 जून, 2021 या कालावधीत राबविण्यात आलेले महा आवास अभियान यशस्वी झाल्याने यावर्षीही 20 नोव्हेंबर या ‘राष्ट्रीय आवास दिना’चे औचित्य साधून महा आवास अभियान 2021-22 राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानात भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे 100 टक्के मंजूरी देणे, पहिल्या हप्त्याचे 100 टक्के वितरण, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण, डेमो हाऊसेस, विविध शासकीय योजनांशी कृती संगम इ. उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या अभियानात बहुमजली गृहसंकुले, भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी लँण्ड बँक, वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी सँण्ड बँक, वाळूला पर्यायी साहित्य वापरण्यासाठी प्रोत्साहन, किफायतशीर बांधकाम तंत्रज्ञान, रेन वॉटर हार्वेस्टींग, सौर उर्जा साधन व नेट बिलींग इ. चा वापर इ. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या अभियान कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तीस राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि ग्राम पंचायत स्तरावरुन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्राम विकास मंत्री श्री.मुश्रीफ यांनी यावेळी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा