डोळ्याादेखत बकऱ्याला बिबटयाने खाल्ले
तळमावले/वार्ताहर
रानात चारण्यासाठी नेलेल्या बकऱ्याला डोळ्यादेखत बिबटयाने खाल्ले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. पाटण तालुक्यातील बादेवाडी (कुठरे) येथे काल सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान जि.प.प्राथ शाळा बादेवाडीच्या पाठीमागील रानामध्ये ही घटना घडली. सदर बकरीचे मालक बाळू चांदू साठे हे ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा विभागात शिपाई म्हणून काम करत आहे. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे लोक प्रचंड संकटात आहेत. त्यात अशा गोष्टीमुळे ज्यांचा उदरनिर्वाह जोड व्यवसाय असलेल्या शेळीपालनावर आहे. त्यांच्यापुढे मोठे संकटच उभे राहिले आहे. जनावरे चारण्यासाठी शुभम साठे, गणेश म्होप्रेकर, शंभूराज साठे हे गेले होते. बकरीवर बिबटयाने हल्ला केल्याची घटना डोळयासमोर पाहिल्याने ही मुले प्रचंड घाबरली होती. मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर सदर बिबटया रानामध्ये पळून गेला.
आतापर्यंत 15 दिवसात घडलेली ही दुसरी घटना आहे. 4 महिन्यात सुमारे 30 ते 40 जनावरांचा खात्मा बिबटयाने केला आहे. त्यामुळे वनाधिकाऱ्यानी, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
बादेवाडी, लोकरेवस्ती, शिंदेवस्ती व आसपासची लोक जनावरे चारण्यासाठी जवळच असलेल्या शिवारात नेत असतात. या शिवारात जात असताना लोकांना वनविभागाच्या हद्दीतून जावे लागते. त्यामुळे लोकांना तांत्रीक गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे.
बिबटयाच्या सततच्या वावरामुळे सदर परिसरात लोकांमध्ये घबराट पसरली आहे. अशाच घटना घडत राहिल्या तर लोकांनी आपली उपजीविका कशावर करायची? असा प्रश्न लोकांच्या समोर उभा राहिला आहे.
आमच्या भागात यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यावर संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासनास आम्ही कळवले नाही.
-बाळू चांदू साठे, बाधित शेळी मालक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा