शुक्रवार, ६ मार्च, २०२०

ढेबेवाडी (ता. पाटण) : ..म्हणून नाना पाटेकरांनी 4 वर्षीय मुलाच्या थोबाडीत मारली!


ढेबेवाडी (ता. पाटण) : वयाच्या चौथ्यावर्षी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. चित्रपटात रडणाऱ्या लहान मुलाचा प्रसंग चित्रित करायचा होता. त्यासाठी बाबांनी (नाना पाटेकर) मला सेटवर नेले; पण मी रडायचे नाव काढत नसल्याने मला त्यांनी थोबाडून रडायला लावले. तेव्हापासून अभिनयापासून मी दूर पळालो, या शब्दांत नाना पाटेकर यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांनी अनुभव कथन केले.

'नाम' संस्थेच्या कामानिमित्त येथे दौऱ्यावर आलेल्या मल्हार यांच्यासमवेत घारेवाडी (ता.कराड) येथील शिवम प्रतिष्ठानच्या केंद्रात मारलेल्या गप्पांत त्यांनी नाना पाटेकरांचे वडील म्हणूनचे पैलू उलघडले. या वेळी 'नाम'चे सचिव अभिनेते मकरंद अनासपुरे, पश्‍चिम महाराष्ट्राचे समन्वयक गणेश थोरात उपस्थित होते.

चित्रपट, अभिनय आणि सामाजिक क्षेत्रातला 'बाप माणूस' उलगडून सांगताना नाना पाटेकर यांचे सुपुत्र मल्हार भरभरून बोलत होते. ते म्हणाले, 'वडील-नट-समाजसेवक यासह सर्वच अंगानी 'बाबा' हे पल्याडचं व्यक्तिमत्त्व आहे. कुठलंही विशेषण त्यांना लागू होत नाही. टंगळमंगळ, गप्पा गोष्टी करत आणि लिंबू पाणी पित चढण्यासारखा हा डोंगर नाही. त्यांचा आवाका खूपच मोठा आहे. विशिष्ट चौकटीत त्यांना बंदिस्त करणे चुकीचे ठरेल. कामाचा व्याप, धावपळीमुळे दररोज आमच्या वाट्याला ते किती येतात? याहीपेक्षा त्यांच्या प्रत्येक कार्याला हातभार लावणे म्हणजेच आमच्यासाठी सतत त्यांच्या सोबत राहण्यासारखे आहे.'

"माझे वडील एक खूप वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्यात मोठी ऊर्जा सामावली आहे. अनेकांची छत्र सावली बनले असताना आम्ही बाबा- बाबा करणे चुकीचे आहे. ते कधी शांत, निवांत बसलेले पाहण्यात नाहीत. घरातही त्यांचे नेहमीच काही काम चालूच असते. त्यांची ऊर्जा, आयुष्य, काम खूप महत्त्वाचे आहे, ते कदापिही वाया जाऊ नये. त्यांच्या कार्यात मला संधी देणे, हे माझे नशीबच समजतो. त्यांचे नियम आणि त्यात जगणे हे आगंतुक येत नाही, त्याची सुरुवात प्रथम त्यांच्या स्वतःपासून आणि घरातून झालेली असते. माझ्या सोबत काही चांगले आलेले असेल, ते सर्व त्यांचे आणि काही वाईट आढळलं तर ते माझे एकट्याच असेल. बाबा कुठेही असले, तरी आमच्यासाठी ते नेहमी सोबतच असल्यासारखे वाटतात. त्यांच्या कार्यात राहणे म्हणजेच त्यांच्या सोबत असल्यासारखे आहे.''चित्रपटात भूमिका करायची झाल्यास छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारण्याचे स्वप्न आहे. ही भूमिका माझ्यासाठी मोठी जबाबदारी असेल, त्यासाठी मला प्रथम माझी पात्रता बनवावी आणि तपासावीही लागेल

नामच्या वाटचालीला पाच वर्षे झाली. कामानिमित्ताने तळापर्यंत जाणं होत असून, नवनवीन गोष्टी शिकता येतात. खूप काही झालं असले तरी अजून खूप काही व्हायचंही आहे. आपण संपलो, तरी काम सुरूच राहिले पाहिजे. "माझ्यासाठी तू वेगळा नाहीस तर त्यातलाच एक आहेस,' असे माझ्या बाबांचे मला सांगणे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण ते मुंबई पायी पदयात्रा : 15 मे रोजी झेंडा चौकातून मनसेचा एल्गार; ‘मोफत वीज आमच्या हक्काची’ - गोरख नारकर*

पाटणच्या स्वाभिमानासाठी लढाई, पक्ष-गट बाजूला ठेवून सामील होण्याचे आवाहन; मागण्यांसाठी मनसे आक्रमक *पाटण/प्रतिनिधी :* पाटण तालुक्...