महााराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना' जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले आणि १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदत पीककर्ज आणि पीक पुनर्गठित कर्ज माफ होणार आहे. लाभार्थ्यांची माहिती भरण्यासाठी १ फेब्रुवारीपासून शासनाने पोर्टल कार्यान्वित केले असून त्यासाठी विविध ६३ बँका निवडण्यात आल्या आहेत.त्यामध्ये राष्ट्रीयीकृत आणि सहकारी मिळून ३० आणि खासगी ३३ बँका आहेत.
कर्जमाफीचे निकष काय ?
- ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 दरम्यान कर्ज घेतलं आहे आणि ते 30 सप्टेंबर 2019पर्यंत थकित आहे, त्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ आहे.
- ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 दरम्यान कर्ज घेऊन त्याचं पुनर्गठन केलं आहे आणि ते 30 सप्टेंबर 2019पर्यंत थकित आहे, त्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ आहे.
- कर्जबाजारी शेतकऱ्याकडे किती जमीन आहे (अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक) याचा विचार केला जाणार नाही.
- कुटुंब नव्हे तर वैयक्तिक शेतकरी हा एकक ग्राह्य धरण्यात आला आहे. प्रति शेतकरी कमाल 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल.
- 30 सप्टेंबर 2019 रोजी शेतकऱ्यावरील कर्जाच्या थकबाकीची रक्कम 2 लाख रुपयांहून अधिक असल्यास त्याचं कर्ज माफ होणार नाही.
- राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना दिलेलं कर्ज माफ होईल.
या योजनेचा पुढील शेतकऱ्यांना लाभ होणार नाही...
- राज्यातील आजी किंवा माजी मंत्री किंवा राज्यमंत्री, लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य, विधानसभा किंवा विधानपरिषद सदस्य
- केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, ज्यांचं मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. यात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं आहे.
- केंद्र आणि राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी (महावितरण, एसटी महामंडळ आदी) ज्यांचं मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
- शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती
- निवृत्त व्यक्ती ज्यांचं मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे
- कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सहकारी दूध संघ यांचे अधिकारी, ज्यांचं मासिक वेतन 25 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा