माणसातला देवमाणूस म्हणजे प्रा. ए. जी.खोत.
प्रा. ए.जी.खोत सर आपल्या प्रदीर्घ सेवेतून आज सोमवार, दिनांक 31 जुलै, 2023 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. प्रा. ए.जी. खोत साधारणपणे चार वर्षांपूर्वी शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे बदलीने हजर झाले. आपण नेहमी बोलतो की सुरुवातीला माणूस जसा वाटतो तसा तो मुळातच नसतो. सरांचे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील आणि यापूर्वी त्यांच्याबरोबर नोकरी करण्याची संधी कधीही मला मिळाली नव्हती तरीपण त्यांच्याबद्दल लिहावे असे मला मनापासून वाटत होते. त्यांना मी मागील महिन्यातच बोललो होतो की सर मी तुमच्याबद्दल तुमच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी काहीतरी लिहिणार आहे.
मला आजही आठवते ज्यावेळी खोत सर कराडमध्ये हजर झाले त्याच दिवशी मी माझी विद्यार्थिनी आणि सध्या समाजशास्त्र विभागात कार्यरत असणारी प्रा. दिपाली वाघमारे यांना मी प्रश्न विचारला की, "दिपाली खोत सर कसे आहेत?" त्यांनी त्यावेळी उत्तर दिले की, "यादव सर, आता माझे खूप अवघड आहे. नवीन आलेले सर अजिबात बोलत नाहीत तसेच ते खूप खूप शांत वाटतात. आता माझे काय खरे नाही". मी दिपाली यांना त्यावेळी बोललो की, दिपाली कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव जाणून घेण्यासाठी थोडा वेळ जावा लागतो. त्याच प्रा. दिपाली यांना मी मुद्दामहून मागील पंधरा दिवसात प्रा.ए.जी. खोत यांच्या बद्दल पुन्हा प्रश्न विचारला, " दिपाली खोत सर कसे आहेत?" दिपाली यांनी एका क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले, "खोत सर एक नंबर माणूस आहे". आपल्या विभाग प्रमुखाबद्दल असे उत्तर आज येणे फारच दुर्मिळात दुर्मिळ गोष्ट आहे. मग एकाच विभागात सलग चार वर्षे कार्य करत असताना दिपाली यांच्या मनात प्रा. खोत सर यांच्या बद्दल विचारात बदल का झाला ?कारण याचे एकच उत्तर आहे की, खोत सर हे माणसातील देव माणूस आहे.
आपणास माहित आहे की सुरुवातीस माणूस जसा वाटतो तसा तो मुळातच नसतो. कोणतीही व्यक्ती सुरुवातीला आश्वासक, आकर्षक आणि आपलेपणाचे वाटते परंतु जसजसा काळ जाईल तसतशी त्या व्यक्तीचे जीवनाचे बरेच नकारात्मक पैलू उघडत जातात आणि ती व्यक्ती आपणास नको वाटते, त्या व्यक्तीचा सहवासपण काटेरी वाटत जातो. सरांच्या बाबतीत मला उलटा अनुभव आला त्यांच्याबद्दल मलाही सुरुवातीला खूप नकारात्मक भावना निर्माण झालेली होती, परंतु त्यांच्यावर झालेल्या योग्य संस्काराने त्यांची व्यक्तिमत्व नकारात्मकतेकडून सकारात्मककडे जे झुकले ती त्यांच्याकडे असलेली फक्त आणि फक्त असलेल्या माणुसकीच्या खाणीमुळेच. त्यांच्याकडील असणारे आदराची भावना, सर्वासी आदबीने, प्रेमाने, आपुलकीने व नम्रतेने वागण्याचा सुस्वभाव आणि लोकसंग्राहक वृती यामुळे त्यांचे लोकप्रियता मध्ये अधिक भर पडते.
माणसाने ज्येष्ठ असावे परंतु श्रेष्ठ कधीच नसावे. सर हे सध्या उपप्राचार्य पदावर कार्यरत होते, परंतु त्यांनी उपप्राचार्य पदाचा कधीही दुरुपयोग केला नाही. या पदावर कार्य करत असताना कधीच त्यांनी आपल्या सहकार्यांना अपमानास्पद वागणूक दिली नाही. पदाचा दुरुपयोग करून त्यांनी कधीही सहकाऱ्यांना तणावात ठेवली नाही. ज्येष्ठतेने कधीकधी अहंकाराची भावना निर्माण होते परंतु त्यांनी त्याला मूठ माती दिली. त्यांचा महाविद्यालयातील उपप्राचार्य म्हणून वावर हा आश्वासक होता. फलभाराने कोणतेही झाडे झुकलेले दिसते परंतु त्याला आलेला फळामुळे ते अधिक अधिक उठून दिसते. तशी समाजातील नम्र माणसे जरी झुकलेली दिसली तरी त्यांच्याकडे असलेल्या नम्रतेने ती अधिक उठून दिसतात. फुलांकडे जशी पाखरे आकर्षित होतात तशी माणसे त्यांच्याकडे आकर्षित होतात. जी माणसे समाजात ताठ असतात, नम्र नसतात ती माणसे कितीही उच्च विद्याविभूषित असली आणि कोणत्याही पदावर कार्यरत असली तरी कालांतराने लोक त्यांना विसरून जातात. माणूस म्हणून प्रत्येकाची काही एक ओळख असते आपल्या सेवाकाळात त्यांनी अनेक माणसे जोडली. व्यक्ती कोणाच्या सानिध्यात सहवासात आहे व त्या सहवासात असणाऱ्या व्यक्तीचे संस्कार काय आहेत, यावर व्यक्तीच्या जीवनाची जडणघडण होत असते.
सर, टी-टाईमला स्टाफरूम मध्ये आल्यानंतर कोणत्याही खुर्चीवर अगदी शांतपणे बसायचे. स्टाफरूम मध्ये त्यांनी कधीही निरर्थक बडबड केली नाही, कोणत्याही सहकाऱ्याची चेष्टा- कुचेष्टा त्यांनी कधीही केली नाही. कोणत्याही सहकाऱ्यांची माघारी चेष्टा-कुचेष्टा करताना मी कधीही ऐकले नाही आणि पाहिलेही नाही. कोणत्याही सहकाऱ्याची प्राचार्याकडे तक्रार घेऊन जाताना मी कधीही पाहिली नाही. सरांचा मला आणखी एक गुण आवडला तो म्हणजे त्यांच्याकडे असलेला दातृत्वपणा. आज समाजात दानशूर व्यक्ती फारच कमी आढळतात, पैसा हा तसा संवेदनशील विषय. परंतु सर आपल्या सहकाऱ्यावर पैसा खर्च करताना कधीही त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. मी खूप वेळा अनुभवलेले आणि ऐकलेले आहे की कोठेही प्राध्यापकांची सहल गेली तर सर त्या सहलीचा सर्व खर्च करतात. मला आठवते मागील वर्षी वरिष्ठ विभागातून टी-क्लब साठी पैसे मिळाले नव्हते त्यावेळी एक महिनाभर सरांनी स्वतः पैसे दिले होते परंतु त्यांनी त्याचा एक शब्दही कोठे उच्चारला नाही. नोकरीत नव्याने रुजू झालेल्या प्राध्यापकांना दररोज सकाळी स्वतःच्या पैशाने नाश्ता देणारे प्रा. ए.जी. खोत एक वेगळेच व्यक्तिमत्व! सरांनी या महिन्यात अलंकार हॉटेलमध्ये सर्व स्टाफ साठी दिलेले स्वादिष्ट आणि रुचकर जेवण आजही आठवते पण त्यापेक्षाही आपल्या समाजशास्त्र विभागात अध्ययन करत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलेले त्यांनी आमंत्रण खूपच मनाला भावते. आज विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद हरवत चालला आहे आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अबोला निर्माण झालेला आहे. परंतु खोत सर हे विद्यार्थी प्रिय व्यक्तिमत्व असल्याचे त्यावेळी निदर्शनास आले.
आणखी एक सरांची गोष्ट मला मनापासून आवडली ती म्हणजे त्यांचे आपल्या समाजशास्त्र विभागातील सहकाऱ्याबद्दल असलेले एक सुंदर नाते. स्त्रियांच्याबद्दल असणारा एक त्यांचा अतिव आदर. आजच्या काळात एकाच विभागात कार्यरत असणारे विभागप्रमुख आणि सहकारी यांच्यात बऱ्याच वेळा कडवट नाते असते. परंतु एक विभागप्रमुख कसा असावा, याचे एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रा. ए. जी. खोत. आपल्या सहकाऱ्या बरोबर कसे वागावे, व्यवहार कसा करावा हे खोत सरांच्या कडून शिकायला खूप मिळते. प्रा. दिपाली यांना स्वतःच्या मुलीप्रमाणे, एका छोट्या बहिणी प्रमाणे त्यांनी जपले. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना कोणत्याही क्षेत्रात काम करताना खूपच असुरक्षित वाटते, परंतु खोत सरांना स्त्रियांच्या बद्दल प्रचंड आदर असल्यामुळे प्रा. दिपाली यांनी तो विभाग सक्षमपणे पुढे नेत आहेत. एकाच विभागात कार्यरत असणाऱ्या एका सहकाऱ्याने आपल्या विभाग प्रमुख निवृत्त होत असताना दुसऱ्या जवळ काढलेले गौरवास्पद उद्गार, "खोत सर एक नंबर माणूस आहे". खोत सर आजपर्यंत सेवा केल्याची हीच तुमची पोचपावती. निवृत्त होत असताना जाता जाता ही पोचपावती मिळवणे आज खूप अवघड गोष्ट होत चालली आहे.
असा हा माणसाचा देव माणूस आज सेवानिवृत्त होत आहे. खोत सर आपणास सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! सेवानिवृत्तीनंतरचे तुमचे आयुष्य निरोगीमय आणि शतायुष्य होवो ईश्वरचरणी प्रार्थना!
"अशी पाखरे येती
स्मृती ठेवूनी जाती,
हेचि दान देगा देवा
प्रा. खोत सरांचा विसर न व्हावा"
प्रा. सुरेश यादव.
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड.