लोकांच्या मनातली भिती कमी करणारा लेख आवश्य वाचावा असा.. !!
राज्याचे सर्वेक्षण अधिकारी, साथ रोग या विषयातील अभ्यासक डॉ.प्रदीप आवटे यांचा अतिशय अभ्यासपूर्ण आणि मनाला उभारी देणारा लेख
---------------------------------------
करोनाचे शेपूट नजरेच्या टप्प्यात ?
• डॉ प्रदीप आवटे
---------------------------------------
रुग्ण वाढीचा दर, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अशा निर्देशांकाच्या भाषेत बोलायचे तर सध्या महाराष्ट्रात कोविड आजाराच्या प्रसाराचा वेग दिवसेंदिवस कमी होत चाललेला असला आणि त्याचा मृत्यू दरही दिवसागणिक घटत चाललेला असला तरीही निव्वळ आकडयांकडे पाहिले तर त्यामध्ये रोज मोठया प्रमाणावर वाढ होताना दिसते आहे. अशावेळी हा आजार नेमका केव्हा आटोक्यात येणार याबाबत निश्चित विधान करणे कठीण आहे. तथापि या आजाराच्या अनुषंगाने जगभरात जे विविध प्रकारचे संशोधन सुरू आहे,त्यातील काही संशोधने आणि त्यातून समोर आलेले निष्कर्ष हे आशादायी आणि या आजाराचा शेवट जवळ आल्याची भविष्यवाणी करणारे आहेत.
टी सेल इम्युनिटी –
सेंटर फॉर इन्फेक्शियस मेडिसिन, स्टॉकहोम, स्वीडन येथील शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कोविड१९ आजाराच्या संदर्भातील एक अनुभव असा आहे की ज्या व्यक्तींना हा आजार झाला आहे परंतु ज्यांची लक्षणे सौम्य स्वरूपाची होती किंवा नव्हतीच अशा लक्षणे विरहित किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या कोविड रुग्णांमध्ये प्रतिपिंडे म्हणजेच अँटीबॉडीज विकसित होताना दिसत नाहीत. त्यामुळे या स्वरूपाचा सौम्य संसर्ग असणाऱ्या लोकांना या आजारापासून ॲन्टीबॉडी स्वरुपातील प्रतिकारशक्तीच न मिळाल्याने पुन्हा संसर्ग झाला तर त्यांना संरक्षण मिळू शकत नाही, असा काही जणांचा समज होता.
स्वीडनमधील या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात दोन महत्त्वपूर्ण गोष्टी समोर आल्या आहेत.ज्या व्यक्तींना मध्यम ते तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळून येतात त्यांच्यामध्ये आणि ज्या व्यक्ती लक्षण विरहित असतात किंवा सौम्य स्वरूपाची लक्षणे दाखवितात या दोन्ही व्यक्तींमध्ये प्रतिकार शक्ती अर्थात इम्युनिटी विकसित होण्याचे दोन वेगवेगळे मार्ग आहेत, हे या संशोधनाने पुढे आले आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर इम्युनिटी व्यवस्थेत बी आणि टी अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. मध्यम ते तीव्र लक्षणे असणाऱ्या व्यक्तींमध्ये इम्युनिटी संस्थेतील बी सेल क्रियाशील होऊन अँटीबॉडीची निर्मिती होते मात्र ज्या व्यक्तींमध्ये कोविड आजाराची लक्षणे अजिबात नसतात किंवा सौम्य असतात अशा व्यक्तींमध्ये टी सेल क्रियाशील होऊन सायटोटॉक्सिक म्हणजे पेशी नष्ट करणाऱ्या टी प्रकारच्या पेशी कार्यरत होतात. ज्या पेशींना विषाणूंची बाधा झाली आहे त्यांना एका विशिष्ट पद्धतीने नष्ट करण्याचे काम या टी सेल करतात. यालाच Programmed Cell Death म्हणजे नियोजपूर्वक पेशीनाश असे म्हणतात. यामध्ये विशिष्ट विकर (इंझाईम) सायटोटॉक्सिक सेलमधून बाहेर पडतात आणि ते संसर्गग्रस्त पेशीमध्ये जाऊन त्या पेशीला छिद्रे पाडतात आणि इतर रसायनांच्या मदतीने त्या पेशीचा मृत्यू घडवून आणतात.यामुळे ज्या पेशींना बाधा झाली आहे त्या पेशीच विषाणूसह नष्ट झाल्यामुळे शरीरामध्ये विषाणूंचा फैलाव रोखला जातो आणि त्या व्यक्तीमध्ये कोविड आजाराची फारशी लक्षणे दिसून येत नाहीत. या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष रोगाची तीव्रता अत्यंत कमी होत असली तरी प्रतिपिंडे म्हणजे अँटीबॉडीज मात्र तयार होत नाहीत. त्यामुळे आपल्याला अशा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीज आढळून येत नाहीत तथापि या टी सेल नंतर मेमरी सेल कार्यान्वित करतात. यांना आपण स्मरण पेशी असे देखील म्हणू शकतो. या मेमरी सेल या प्रतिकारशक्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या व्यक्तींमध्ये जेव्हा हाच विषाणू दुसऱ्यांदा प्रवेश करतो तेव्हा संपूर्ण इम्युनिटी व्यवस्था क्रियाशील होते आणि त्या विषाणूचा मुकाबला करते. त्यामुळे विषाणूचा पुन्हा होणारा संसर्ग टाळला जातो याचा अर्थ आज ज्या करोना बाधित रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत किंवा लक्षणे नाहीत त्यांच्या रक्तामध्ये जरी या आजाराच्या अँटीबॉडीज आढळत नसल्या तरी त्यांच्या शरीरात मेमरी सेलच्या रुपाने एक वेगळ्या प्रकारची प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि ही प्रतिकारशक्ती रिइन्फेक्शन किंवा पुन्हा होऊ शकणाऱ्या संसर्गाला तोंड देण्यासाठी पुरेशी समर्थ असते. स्वीडनमधील या अभ्यासातून पुढे आलेले हे निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत.आज आपल्याला जे करोना बाधित रुग्ण आढळत आहेत त्यातील ७० टक्के हूनही अधिक रुग्णांना लक्षणे नाहीत किंवा लक्षणे असतीलच तर ती अत्यंत सौम्य स्वरूपाची आहेत. याचा अर्थ अशा सर्व रुग्णांमध्ये सायटोटॉक्सिक टी सेलच्या मार्गाने प्रतिकारशक्तीची निर्मिती झाली असून त्यांच्या शरीरात मेमरी सेल तयार झाल्या आहेत. हे सर्व रुग्ण करोना आजाराचा पुन्हा होणारा संसर्ग टाळू शकतात. दुसऱ्या भाषेत सांगावयाचे म्हणजे ज्या व्यक्तींना तीव्र किंवा गंभीर स्वरूपाचा कोविड आजार होतो त्यांच्यापेक्षा ज्यांच्या मध्ये हा आजार सौम्य स्वरूपाचा किंवा लक्षणे विरहीत असा असतो त्यांच्यामध्ये निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही अधिक प्रभावी असते असे म्हणता येईल. आणि एकूण बाधित रुग्णसंख्येत सौम्य लक्षणे असणा-या रुग्णांचे प्रमाण अधिक असते, हे महत्वाचे !
कोविड विरुध्दची इम्युनिटी किती काळ टिकेल ?
करोना आजाराच्या नंतर निर्माण होणाऱ्या इम्युनिटी बाबत आणखीन एक संशोधन वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनच्या इम्यूनॉलॉजी विभागाने केले आहे. ज्या प्रकारे सार्स या करोना विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराची प्रतिकारशक्ती ही सुमारे तीन वर्षापर्यंत टिकते. त्याच प्रकारे कोविड आजारामुळे मिळणारी प्रतिकारशक्ती देखील तितक्याच दीर्घकाळ टिकणारी असू शकते, अशी मांडणी या शास्त्रज्ञांनी केली आहे. आणि जर ही प्रतिकारशक्ती दोन ते तीन वर्ष इतक्या काळ टिकणारी असेल तर त्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या हर्ड इम्यूनिटीचा अर्थात समूह प्रतिकार शक्तीचा लाभ कोविड आजाराच्या प्रसाराचा वेग कमी होण्यासाठी होऊ शकतो. एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती कोविड बाधित झाली तरी कुटुंबातील ८० ते ९० टक्के व्यक्तींना या आजाराचा संसर्ग होत नाही, असा निष्कर्ष जगभरातील विविध संशोधनाचा अभ्यास करुन डॉ. दिलीप मावळणकर, संचालक, इंडियन इंस्टिट्युट ऑफ पब्लिक हेल्थ, गांधीनगर यांच्या चमूने काढला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या क्वार्टरली रिव्ह्यू ऑफ मेडिसिनमध्ये हे संशोधन प्रसिध्द झाले आहे.
इम्युनॉलॉजीकल डार्क मॅटर –
हे सारे संशोधन समोर येत असतानाच युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथील न्यूरो सायंटिस्ट कार्ल फ्रिस्टन यांनी प्रतिकार शक्तीतील ‘डार्क मॅटर’ ही एक नवीन संकल्पना मांडली आहे. इम्युनिटी मधील डार्क मॅटर म्हणजे प्रतिकार शक्तीतील असे घटक की जे आपण मोजू शकत नाही. कार्ल फ्रीस्टन यांच्यामते कोणत्याही देशातील सर्वच लोकांना करोना सारखा नवीन आजार होऊ शकतो,असे गृहीत धरून आपण रुग्ण संख्येचे अंदाज मांडत असतो. परंतु वास्तव याहून वेगळे असते. सर्वच लोक एखादा नवा आजार त्यांना व्हावा इतके दुबळे (suspectible) नसतात. दोन मुख्य कारणामुळे एखादा आजार काही व्यक्तींना होण्याची संभावना कमी असते, एक म्हणजे करोना सारख्या इतर विषाणूजन्य आजारामुळे किंवा इतर करोना आजार पूर्वी झाल्यामुळे ज्यांना काही प्रतिकारशक्ती मिळालेली आहे अशा लोकांना हा आजार होण्याची शक्यता कमी असते. करोनासारख्या आजाराचा प्रसार लक्षात घेताना आपण जणू काही समाजातील प्रत्येक जण प्रत्येकाला भेटणार आहे अशा पद्धतीने विचार करत असतो.परंतु समाज हा अनेकदा रेल्वेच्या डब्याप्रमाणे वेगवेगळ्या कंपार्टमेंट मध्ये विभागलेला असतो. एका अर्थाने तो परस्परांपासून विलग असतो. भौगोलिक परिस्थिती, जात, वर्ग, लिंग वय अशा अनेक कारणांमुळे समाजामध्ये हे विलगीकरण होत असते.कार्ल फ्रिस्टनच्यामते समाजातील २५ % व्यक्तींना नवीन आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती असू शकते तर सुमारे ५० % लोकसंख्या ही वेगवेगळया कारणांमुळे सामाजिक अलगीकरणामध्ये असते.त्यामुळे प्रत्यक्ष आजार होण्याची शक्यता समाजातील २५ टक्के लोकांनाच असते. देश - काल परिस्थिती नुसार प्रत्येक समाजातील इम्युनॉलॉजीकल डार्क मॅटरचे हे प्रमाण अर्थातच वेगवेगळे असू शकते. करोनाच्याविरुद्ध एखाद्या समाजात हार्ड इम्युनिटी म्हणजेच सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याकरता त्या समाजातील किमान ६० ते ७० टक्के लोकांना या आजाराविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होणे आवश्यक आहे असे साथरोग शास्त्रज्ञ मानतात तथापि कार्ल फ्रिस्टन यांची ही डार्क मॅटर थेरी लक्षात घेतली तर प्रत्यक्षात आजाराची लागण होण्याची शक्यताच पंचवीस ते तीस टक्के लोकांना असल्यामुळे खूप कमी प्रमाणात लोकांना लागण होऊनही त्या समाजामध्ये हर्ड इम्युनिटीचे परिणाम दिसू लागतात. आपल्याकडे अहमदाबाद, दिल्ली,मुंबई या ठिकाणी करोना आजाराच्या प्रसाराचा वेग मंदावला आहे हे याचेच निदर्शक आहे. अगदी स्वीडनमध्येही एंटीबॉडी निर्माण झालेल्या लोकसंख्येचे प्रमाण ११ टक्के असूनही तेथील करोना उद्रेक शांत झाला आहे,हॉस्पिटलमधील बेडस् रिकामे आहेत, असे चित्र आहे. या सगळ्या संशोधनाचा आणि संकल्पनात्मक मांडणीचा अर्थ एवढाच आहे की कोविड १९ चा शेवट किंवा शेपूट आता नजरेच्या टप्प्यात आहे. याचा अर्थ लगेच काही महिन्यात या आजाराच्या केसेस शून्यावर येतील असे नाही. शेपूट बराच काळ वळवळत राहील तथापि आजाराचे प्रमाण बरेच कमी होईल, असे दिसते.अर्थात हे सारे जरी असले तरी याचा अर्थ करोना टाळण्यासाठी जी खबरदारी आपल्याला घ्यावयाची आहे तिचा विसर पडू देणे योग्य नव्हे. बोगद्याच्या दुसऱ्या टोकाशी उजेड दिसू लागला आहे, हे नक्की पण तरीही आपण जबाबदारीने आणि काळजीपूर्वकच पुढील प्रत्येक पाऊल टाकावयाचे आहे, हे विसरता कामा नये !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा