गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

काळगांव परिसरात पावसाची दमदार हजेरी

काळगांव परिसरात पावसाची दमदार हजेरी
पावसामुळे रस्त्यावर पडलेली झाडे
तळमावले/वार्ताहर
गेले 3 दिवसापासून काळगांव परिसरात दमदार पावसाची संततदार अनुभवायला मिळत आहे. जोराचा वारा आणि पाऊस यामुळे भात, भुईमुग व अन्य पिकांना संजीवनी मिळाली आहे. तर मका मात्र जोराच्या वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे. तर पावसाच्या संततधारीमुळे झाडे, घरांच्या भिंती पडण्याच्या घटनादेखील
घडल्या आहेत. सातत्यपूर्ण पावसामुळे हवेमध्ये प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.
पावसाळा सुरु झाल्यापासून ओढे, नाले  पाण्याने भरुन वाहतील इतका मोठा पाऊस काळगांव परिसरात झाला नव्हता. परंतू पिकाला, पेरणीला आवश्यक असलेला पाऊस पडल्यामुळे बळीराजा खुष होता. पीके देखील चांगल्या पध्दतीची आली होती. परंतू मध्यंतरीच्या काही काळामध्ये पावसाने अचानकच दांडी मारल्याने शेतकरी वर्ग काही अंशी चिंतीत होता. पोटामध्ये कालवाकालव सुरु होती. मनात चिंतेचे ढग निर्माण झाले होते. परंतू गेले तीन दिवसापासून पावसाने ‘पुनश्च हरी ओम’ करत दमदार एन्ट्री मारल्यामुळे श्ेातकरी वर्गामध्ये ‘खुशी का माहौल’ निर्माण झाला आहे.
काळगांव परिसरात भात हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. त्यातही भात लावणीची पारंपारिक पध्दत वापरली जाते. या पध्दतीत चिखल करण्यासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. भात लावणीनंतरही काही दिवस तरी या शेताला पाण्याची आवश्यकता असते. त्याचवेळी ते लावलेले रोप जगते. या हंगाामात भात लावणीला पुरेशा पाऊस होता. त्या ठिकाणी पाऊस नव्हता. त्या ठिकाणी नाले-ओढयाचे पाणी पाटाने आणून लागण करुन घेतली गेली. त्यांनंतर रिमझिम पावसाने या पिकांना जगवले. परंत नंतर मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी वर्ग काहीसा चिंतीत झाला. रोप लावलेली शेते पाणी नसल्यामुळे भेगाळली होती. भुईमुगाच्या शेंगासाठी असलेल्या आरादेखील टणक वावरामुळे खाली जात नव्हत्या. परंतू गेले तीन दिवस पावसाने शेतकऱ्याला चांगली साथ दिली असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.
दमदार पावसाबरोबर प्रचंड वारे देखील वाहत आहेत. त्यामुळे पिकांच्या बाबतीत चांगली वाढलेली मका देखील उन्मळून पडली आहे. तसेच झाडांच्या फांद्या देखील पडल्या आहेत. हवेमध्ये चांगलाच गारठा जाणवत आहे. ओढे नाले खळखळून वाहू लागले आहेत. या पूर्वीच्या पावसाने ओढे भरुन वाहले नव्हते. तसेच छोटे छोटे बंधारे पाण्याने भरुन वाहू लागले आहेत.
सततच्या पावसामुळे डाकेवाडी तील दोन घरांच्या भिंती पडल्या आहेत. यामध्ये लक्ष्मण डाकवे यांच्या घराची भिंत हौसाबाई आस्कट यांच्या घरावर पडल्यामुळे दोन्ही घरात पावसाचे पाणी शिरले आहे. सर्व भांडी कुंडी व इतर साहित्य उघडयावर पडले आहे. तसेच लिलाबाई डाकवे यांच्या ही घरांची भिंत पडल्यामुळे त्यांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने या दोन्ही घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
किरकोळ पडझड व इतर गोष्टी वगळता पावसामुळे लोकांच्यात चैतन्य निर्माण झाले आहे.

फोटो:
श्री.लक्ष्मण डाकवे यांच्या घराची भिंत पडून संसार उघडयावर पडला आहे
जोराचा पडत असलेला पाऊस
वाऱ्यामुळे कोलमडलेली मका




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च.

ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा व सुव्यवस...