कुंभारगाव (ता.पाटण) गेल्या काही दिवसापासून कुंभारगाव परिसरात वानरांनी हैदोस घातला आहे. ही वानरे पिकांचे व अन्य साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत, मात्र या वानरांची तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. समृद्ध वनसंपदा लाभलेल्या पाटण तालुक्यात या परिसरात आता वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागला आहे. गेल्या 10-12 वर्षांपासून परिसरात रानडुकरे, रानगवे, माकडे व वानरांनी रानात, शेतीत धुमाकूळ घालत लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. पूर्वी साधारणपणे माकड, वानर या जाती सर्रास जंगलात आढळत असत, मात्र गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात वानरांनी हैदोस घातला आहे.
कुंभारगाव,मान्याचीवाडी,बोरगेवाडी,चाळकेवाडी,जांभूळवाडी,चिखलेवाडी,मोरेवाडी,शेंडेवाडी आणि गलमेवाडी या परिसरातील शेतीमधील खास करून भुईमूग पिकाचे नुकसान ही वानरे करीत आहेत. मात्र या वानरांची तक्रार वनविभागाकडे करायची की ग्रामपंचायतीकडे? ही समस्या निर्माण झाली आहे. वानरांचा उपद्रव रोखण्यासाठी वन खात्याने काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे. वनखात्याने एकतर वानर पकड मोहीम राबवावी किंवा वानरना जंगलात परतवण्यासाठी उपाय योजावेत, अशी मागणी विभागातील शेतकऱ्याकडून होऊ लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा