सांगली : प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या नावे गंडा घालणाऱ्या दिल्लीस्थित एका कंपनीने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. हजारो लोकांना एसएमएसद्वारे संदेश पाठवून त्यांना दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे.
त्यासाठी दोन हजार सहाशे रुपयांचे करार शुल्क तातडीने भरा आणि अर्धा तासात तुमच्या बॅंक खात्यावर दहा लाख रुपये जमा केले जातील, असा "हनी ट्रॅप' त्यांनी लावण्यास सुरवात केली आहे. अद्याप या जाळ्यात किती लोक अडकले, याची माहिती समोर आली नसली तरी काही मंडळींनी याबाबत इतरांना सावध केले आहे.
मुद्रा योजनेचे कर्ज योग्य मार्गाने मिळवायचे तर किती घाम गाळावा लागतो, याची साऱ्यांनाच कल्पना आहे.एक तर तुमचा उद्योगाचा प्रस्ताव लवकर तयार होत नाही, झाला तर मंजुरीला खेटे घालावे लागतात, बॅंका दारात उभ्या करून घेत नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे मुद्रा लोनला फारसा प्रतिसाद नसल्याचे सातत्याने समोर आले आहे.
अशावेळी याच योजनेचे नाव वापरून एका दिल्लीस्थित कंपनीने धुमाकूळ घातला आहे. या कंपनीकडून "मुद्रा लोन'बाबत संदेश आले आहेत. सोबत मोबाईल नंबर, ऑनलाईन रजिस्टर करण्याची लिंक दिली आहे. त्यावर तुमची नोंदणी केल्यानंतर तातडीने तुमची कागदपत्रे मागवून घेतली जातात. त्याआधारे कर्जाचा प्रस्ताव तयार होता आणि तासाभरात तुमचे कर्ज मंजूर झाल्याचे पत्र वॉटस्ऍपवर पाठवले जाते. वार्षिक दोन टक्के व्याज, सुमारे सातएक वर्षांची मुदत, कर्ज फेडीचा हप्ता, असे सारे अगदी खरे भासवले जाते. त्यानंतर सुरू होतो गंडा घालण्याचा धंदा.
कर्ज तर मंजूर झाले, पण पैसे कधी मिळणार? तर ते मिळवण्यासाठी एक कायदेशीर करार करणे आवश्यक असते. त्याचा शुल्क 5 हजार 200 रुपये. त्यातील निम्मे म्हणजे 2 हजार 600 रुपये ऑनलाईन बॅंक खात्यात भरायचे. त्यानंतर ही कंपनी तुमच्या शहरातील त्यांच्या कायदेशीर सल्लागाराचा संपर्क करून देणार आणि तुमचा करार होताच अर्धा तासात तुमच्या खात्यावर दहा लाख रुपये जमा होणार, अशी स्वप्ने दाखवली जात आहेत. या जाळ्यात काही लोक फसले आहेत. काहींनी सावधपणे त्याला टोलवून लावले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा