पाटण ताळमावले प्रतिनिधी :- अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला होता. पिके कुजली शेतकर्यांच्या हाती काही लागले नाही, खरीपाची पिके गेली मात्र रब्बी हंगामातील पिके चांगली आली आहेत मात्र या पिकांवर वानरांनी डल्ला मारायला सुरुवात केली आहे.त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.वानरांचा कळप पिकात शिरल्यानंतर उभी पिके फस्त करीत आहेत. ही पिके वानरांच्या तावडीतून वाचणार नसल्याने पाटण तालुक्यातील खळे गावातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. गावामध्ये वानराचे दहा ते बारा कळप आहेत. हे कळप प्रत्येक शिवारामध्ये पिकांचे नुकसान करीत आहेत तसेच हेच कळप गावामध्ये आल्यानंतर घरावरील पत्र्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.
काही नागरिकांचे घरावरील नवीन बसवलेले पत्रे देखील तुटले आहेत. त्यामुळे त्या संबंधितांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतामध्ये पिकांचे नुकसान व घरी पत्र्याचे नुकसान त्यामुळे खळे गावातील नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. तरी वनविभागाने या वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
आधीच शेतकर्यांना यंदा पिके हातात न आल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहेत. त्यातच वानरांनी घातलेला धुमाकुळ शेतकर्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच रानडुकरेही पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकर्यांना दिवसरात्र पिकांचे रक्षण करावे लागत आहे.
काबाडकष्ट करून आणलेली पिके वानरांच्या कळपामुळे क्षणार्धात नष्ट होत आहेत. काही वेळेस एकटा शेतकरी असल्यास वानरांची टोळी हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा घटना पूर्वी घडल्या आहेत त्यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शेतकरी एकटे शेतात जाण्यास घाबरत आहेत. खळे, काजारवाडी, डुबलवाडी, शिद्रुकवाडी, गुढेकरवाडी, बागलवाडी, तुपेवाडी परिसरामध्ये सर्वात जास्त नुकसान वानरांनी केले आहे. यामध्ये ज्वारी, हरभरा, कडधान्ये, कांदा, लसूण, ऊस तसेच पालेभाज्या या पिकांचे नुकसान झाले आहे शेतकर्यांना हातातील सर्व कामे सोडून शेतामध्ये राखण करण्यासाठी जावे लागत या वानरांच्या कळपामुळे शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत तरी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
तरी वनविभागाने लक्ष देणे आवश्यक आहे. वानरांनी धुमाकूळ घातला असताना अधुनमधून शेतावर रानडुकरांचा हल्ला होत असतो. रानडुकरांनी देखील बर्याच शेतकर्यांचे नुकसान केले आहे तसेच बिबट्याचे देखील दर्शन होत असते त्यामुळे शेतकर्यांना आस्मानी संकटाबरोबर वन्यप्राण्यांच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तरी वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा