विकासाकडे वाटचाल
आठ हजार लोकसंख्येच्या वनकुटे गावात सुमारे चाळीस टक्के कुटुंबे आदिवासी आहेत. गावविकासाच्या आराखड्यासह सर्व निर्णय ग्रामसभेत घेतले जातात. गावात सरपंच वृक्ष दत्तक योजना राबवली जाते. गावपरिसरात खडकाळ भाग अधिक आहे. त्यामुळे खडक फोडून वड, पिंपळ, चिंच झाडे लावावी लागतात. प्रति झाड साधारण पाच हजार रुपये खर्च येतो. गावात वाढदिवस, पुण्यस्मरण, दशक्रिया विधी, लग्न यासह विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने एक झाडाच्या लागवडीसाठी अकराशे रुपये लोकसहभाग दिला जातो. उर्वरित रक्कम ग्रामपंचायत खर्च करते.
या उपक्रमातील ठळक बाबी
- सुमारे पाच लाख रुपये खर्च करून सुमारे शंभर झाडांची लागवड व जोपासना
- खडकावर दोनशे झाडे लावण्याचा गावकऱ्यांचा संकल्प
- गावशिवारात वनविभागाचे सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र. त्यावरही लोकसहभाग, वनविभागाच्या मदतीने चाळीस ते पन्नास हजार झाडांची दहा वर्षांत लागवड
- या खर्चासाठी सरपंचांकडून आपल्या मानधनाचा वापर. उपसरपंच अर्जुन कुलकर्णी यांचीही कामांना साथ
माजी विद्यार्थ्यांचे कार्य
विविध कारणांनी बाहेरगावी असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचा 'व्हॉटसॲप ग्रुप' बनवला. त्यानुसार चार लाख रुपये जमा झाले. त्यातून शाळेत रंगरंगोटी, मुलांना बाके, बॅगांचे वाटप व अन्य कामे केली. राज्यभर ओळख असलेले नाना महाराज वनकुटे महाराज यांचे समाधीस्थळ गावात आहे. त्यांच्या समाधी मंदिराची उभारणीही लोकसहभागातून ७० लाख रुपये उभारून झाली.
राज्यातील पहिली बाल ग्रामसभा
गावाला जोडून चार वाड्या-वस्त्या आहेत. सात जिल्हा परिषदेच्या सात शाळा असून त्यात चारशेहून अधिक मुले शिकतात. या मुलांच्या समस्या अडचणी समजून घेण्यासाठी सरपंच ॲड. राहुल झावरे यांच्या संकल्पनेतून दोन महिन्यांपूर्वी शाळकरी मुलांची ग्रामसभा घेतली. खेळाचे साहित्य, लेझीमच्या वस्तू, सायकली, संगणक, संरक्षण भिंत, पेव्हिंग ब्लॉक्स, डिजिटल शाळा या बाबींची गरज त्यातून लक्षात आली. गावाने राज्यात पहिल्यांदाच बाल ग्रामसभा ही संकल्पना राबवली. लोकसहभाग, 'सीएसआर' निधी, ग्रामपंचायतीचा १४ वित्त आयोग व अन्य निधीतून शाळेची कामे करण्याचे नियोजन आहे.
अन् डीजे बंदी झाली
गावात आणि वाड्यावस्त्यांवर लग्नासह अन्य कार्यक्रमांत डीजे वाजवण्याची प्रथाच होती.
त्याचा त्रास करण्यासाठी तीन वर्षांपासून 'डीजे बंदी करण्याचा ग्रामसभेत ठराव झाला.
काहींनी विरोध केला. सुरुवातीच्या काळात त्याची अंमलबजावणी करताना अडचणी आल्या. परंतु आता गावातील कोणत्याही कार्यक्रमात डीजे वाजवला जात नाही. गावांत गणेश उत्सवाच्या काळात १२ मंडळे असत. मात्र खर्चाला फाटा देत दोन वर्षापासून एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जात आहे.
गावातील महत्त्वाचे उपक्रम
- ओढ्यावर जलयुक्त शिवार अभियानातून ७० लाख रुपये खर्च करून दोन बंधाऱ्यांची उभारणी
- जुन्या काळातील गाव तलावांची दुरुस्ती केली. त्याचा ३०० हेक्टर क्षेत्राला फायदा
- पाणी उपलब्ध झाल्याने पीक पद्धतीत काहीसा बदल. फळपिकांकडे शेतकऱ्यांचा कल
- सिंचन कामांसाठी बाळासाहेब खामकर यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त व्यवस्थापन समिती कार्यरत
- स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी बॅंकेच्या मदतीने पाणी शुद्धीकरण प्रकल्प. 'एटीएम'द्वारे पाणी देण्याची सोय होणार.
- वनकुटे हे पारनेर तालुक्यातील टोकाचे गाव. येथे पारनेर व संगमनेर येथून मुक्कामी एसटी बसेस येतात. ही बाब लक्षात घेऊन चालक-वाहकांसाठी गावात खोली बांधून मुक्कामाची सोय
गावाची वैशिष्ट्ये
- सहाशे मीटर अंतरावर बंदिस्त गटारी, रस्त्याचे कॉंक्रीटीकरण. त्यामुळे आरोग्य अबाधित राहण्यास मदत
- सुमारे अकराशे आदिवासींना ग्रामपंचायतीमार्फत जातीचे दाखले
- गावांत रस्त्यावर अतिक्रमणे झाल्याने अडचणी वाढल्या होत्या. लोकांच्या समाझोत्यानेच सर्व अतिक्रमणे काढली.
- शंभर टक्के हागणदारीमुक्त. पाहुण्यासह गावात येणाऱ्यासाठी एक सार्वजनिक शौचालय.
- लोकसहभाग आणि सरकारी निधीतून स्मशानभूमीचे सुशोभीकरण.
- गावांतील प्रमुख चौकात 'सीसीटीव्ही'चा वॉच.
- तांडा वस्ती सुधार योजनेतून दलित वस्तीत रस्त्याचे सुशोभीकरण.
- गावांतील तरुणांसाठी व्यायामशाळेची उभारणी.
- गावातील वाद सामोपचाराने मिटवणाऱ्यावर भर. दोन वर्षात एकही गुन्हा दाखल नाही.
- गावांत १८ महिला बचत गट असून त्या माध्यमातूनही महिलांनी सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.
५७० कुटुंबांनी बांधली शौचालये
आदिवासी आणि आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना वैयक्तिक शौचालये बांधणे शक्य नव्हते. मात्र गावकरी आणि ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून प्रत्येकी बारा हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध झाले. त्यातून ५७० कुटुंबांकडे आज शौचालये बांधण्यात आली आहेत. पाचही वाड्या-वस्त्या शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्या आहेत.
एका रस्त्याने जोडले दोन तालुके
गावाच्या हद्दीत तासगावाच्या पलीकडे राहुरी तालुक्यातील म्हैसगावसह पंचवीस गावे येतात. मुळा नदी येथून वाहते. धरणाचा फुगवटा असल्याने पारनेर आणि राहुरी तालुक्यातील गावांच्या रस्त्याच्या प्रश्न होता. तास गावात चौथीपर्यतच शाळा. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी नदीपलीकडील म्हैसगाव येथे मुले जीव धोक्यात घालून बोटीने शाळेत जात. पारनेरमधील लोकांनाही राहुरीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने पन्नास किलोमीटर दुरवरुन जावे लागे. वनकुटे ग्रामस्थांच्या पुढाकाराने तास-वनकुटे हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सहा कोटी रुपये खर्चून रस्ता झाला. तास- म्हैसगावला जोडणारा मुळा नदीवर पूल बांधण्यात आला. त्यामुळे पारनेर-राहुरी तालुके एकमेकांना जोडले गेले. सर्वांचे प्रश्न सुटले.
प्रतिक्रिया
आमच्या गावाची 'स्मार्ट ग्राम' म्हणून ओळख होऊ लागली आहे. आमदार नीलेश लंके यांचे त्यासाठी चांगले सहकार्य आहे.''
ॲड. राहुल झावरे, सरपंच, वनकुटे
९०११४५११६३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा