ब्रिटिश काळातील ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या घणसोली गावात आठवडे बाजारामुळे चोऱ्या माऱ्यांच्या प्रकार वाढले आहेत. वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. त्याचा फटका गावातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर अनधिकृतपणे चालणारा घणसोलीतील संडे बाजार बंद करावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात येथील रहिवाशांनी महापालिका आयुक्तांना अलीकडेच एक निवेदन दिले आहे.
घणसोली सद्गुरू रुग्णालय, सरपंच दगडू चाहू पाटील चौक, गावदेवी मंदिर परिसर, साई सदानंदनगर ते डी-मार्ट मॉल परिसर, गावदेवीवाडी रोड ते स्वातंत्र्यसंग्राम चौकपर्यंत दर रविवारी आठवडे बाजार भरविला जातो.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात याच आठवडे बाजारावर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरिश पटनिगिरे यांनी तीन वेळा कारवाई केली होती. घणसोलीतील अतिक्रमण विभागातील काही अधिकाऱ्यांचे या फेरीवाल्यांशी लागेबांधे असल्यामुळे त्यानंतर आजपर्यंत या आठवडे बाजारावर कारवाई करण्यात आली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
घणसोलीतील सरपंच दगडू चाहू पाटील चौकाला या फेरीवाल्यांनी अक्षरश: विळखा घातला आहे. दर रविवारी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत रस्त्यावरून चालताही येत नाही. एखाद्या वेळी गावात काही दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाची गाडी किवा पोलिसांच्या वाहनांनाही गर्दीतून वाट काढणे अवघड होणार आहे. संडे बाजारामुळे घरातून बाहेर जाणेही कठीण झाले आहे.
फेसबुक आणि व्हॉट्स अॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि पालिकेच्या पोर्टलवर आठवडे बाजार कायमचा बंद करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी आता गावातील तरुणपिढी पुढे सरसावली आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रत्यक्षात पाहणी करून बाजार त्वरित बंद करावा, किंवा वाहतूककोंडी होणार नाही, याची दक्षता घेऊन हा बाजार अन्यत्र हलविण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंकुश पांडुरंग नाईक यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा