सोमवार, २६ मे, २०२५

साताऱ्याला 'रेड अलर्ट', घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज .

 

  

जिल्ह्यातील कायम दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण, फलटण तालुक्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. एरवी कोरड्या दिसणाऱ्या माणगंगा आणि बाणगंगा नदीला पूर आला असून मोरी, पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या दोन्ही तालुक्यात पावसामुळं काही ठिकाणी मोठी पडझड झाली आहे. तर, शेतांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. या संपूर्ण परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे.

बाणगंगा नदीला पूर : सातारा जिल्ह्यात सर्वाधिक १६३.५ मिलीमीटर पावसाची नोंद फलटण तालुक्यात झाली आहे. मुसळधार पाऊस झाल्यानं बाणगंगा नदीला पूर आलाय. तालुक्यातील छोटे-मोठे बंधारे ओसंडून वाहत आहेत. अनेक रस्ते आणि रस्त्यांवरील साकव पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक मार्गावरील वाहतूक २० ते २२ तासांपासून बंद आहे. बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळं १६ गावांचा संपर्क तुटला आहे. तर, १२३ कुटुंबांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर केलं आहे. बाणगंगा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. रस्त्यावरील पाण्यात वाहने न घालण्याचं आवाहनही प्रशासनानं केलं आहे.

माण तालुक्याला पावसानं झोडपलं : माण तालुक्याला पावसानं अक्षरशः झोपडून काढलं आहे. त्यामुळं माणगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. बंधारे ओव्हरफ्लो झाले असून शेती खरवडून गेली आहे. माण तालुक्यात उन्हाळ्यात एखाद्या वर्षी वळीव पावसाचं तांडव पाहायला मिळायचं. मात्र, असा पाऊस हा पहिल्यांदाच बघत असल्याचं ज्येष्ठ नागरिक सांगत आहेत. माणगंगा नदीला आलेल्या पुरामुळं प्रशासनानं दवंडी पिटून नागरिकांना दक्षता घेण्याचं आवाहन केलय. माण तालुक्यातील खडकी (तुपेवाडी) येथील पाझर तलाव, आंधळी धरण ओसंडून वाहत असून तहसीलदारांनी परिस्थितीची पाहणी केली.

प्रसिध्द धबधबे झाले प्रवाहीत : मान्सून पूर्व पावसानं सातारा जिल्ह्यातील प्रसिध्द धबधबे प्रवाहीत झाले आहेत. महाबळेश्वरमधील लिंगमळा, पाटण तालुक्यातील नवजाचा ओझर्डे धबधबा फेसाळत कोसळू लागला आहे. त्यामुळं पर्यटकांची पावले आता धबधब्यांकडं वळू लागली आहेत. सुट्टीच्या दिवसात याठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत असून पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

साताऱ्याला 'रेड अलर्ट' : सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळं सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळं सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. मुसळधार पावसाच्या अंदाजामुळं घाट मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका देखील वाढला आहे.

सातारा जिल्ह्यात पडझडीचं सत्र : मुसळधार पावसामुळं जिह्यात घरांच्या पडझडीचं सत्र सुरू आहे. रविवारच्या दिवसभरातील आकडेवारीनुसार ११ घरांची अंशतः पडझड झाली असून दोन विहिरी खचल्या आहेत. पाच रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद झाली आहे. महाबळेश्वर, वाई, जावली, पाटण तालुक्यातही पावसाचा जोर आहे. त्यामुळं कच्च्या घरांची पडझड झाली आहे. प्रशासन अलर्ट मोडवर असून नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम सुरू आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...