माथाडी कामगारांचे आमरण व साखळी उपोषण आंदोलन आझाद मैदान येथे चौथ्या दिवशीही सुरूच राहणार
मुंबई दि. २८ - माथाडी कायदा मोडीत काढणारे सुधारणा विधेयक क्रमांक ३४/२०२३ आणि सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ रद्द करावे व माथाडी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्याकरीता उपाययोजना कराव्यात तसेच माथाडी कामगारांच्या इतर प्रलंबित प्रश्नांची शासनाकडून तातडीने सोडवणूक व्हावी याकरीता माथाडी कायदा बचाव कृती समितीच्यावतीने दि. २६ फेब्रुवारी पासून आझाद मैदान येथे आमरण व साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे.
जो पर्यंत शासन या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री सर्व संबंधितांची बैठक घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करत नाहीत तोपर्यंत माथाडी कायदा बचाव कृती समितीचे आमरण व साखळी उपोषण आंदोलन चालूच राहील, असे माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी निक्षून सांगितले. तर ९४ वर्षाचे बाबा आढाव यांनीही सरकारला निर्वाणीचा इशारा दिला की, याबाबत वेळोवेळी सरकारला आम्ही पत्रव्यवहार आणि समक्ष भेटून माथाडी कामगार कायद्यात बदल करण्याच्या व सरकारच्या विधेयकांमुळे माथाडी कामगार कसा उध्वस्त होणार आहे. हे समजावून सांगितले, पण सरकार योग्य संवाद साधण्यसाठी तयारच नाही म्हणूनच आमचं हे आंदोलन सरकार विधेयके मागे घेत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे.
माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या आजच्या तिसऱ्या दिवशीच्या आझाद मैदान येथील आमरण व साखळी उपोषण आंदोलनाला विविध लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी आपला पांठीबा व्यक्त करण्यासाठी आंदोलन स्थळी भेट दिली.
आझाद मैदान पोलीस स्टेशन परिमंडळ-१ चे उपायुक्त यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयातून उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाला दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांची विधानभवनामध्ये भेट करून देण्यात आली व मा.मंत्री महोदयांद्वारे दि. २८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कायदा बचाव कृती समितीबरोबर संबंधितांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतू त्याप्रमाणे कोणतीही बैठक आयोजित न झाल्यामुळे हे उपोषण आंदोलन दि. २९ फेब्रुवारी रोजी देखील सुरू ठेवण्याचा निर्णय माथाडी कायदा बचाव कृती समितीच्यावतीने माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी व्यासपीठावर जाहीर केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा