विठू माऊलींच्या गजरात ‘शिवसमर्थ’ची आषाढी वारी उत्साहात
तळमावले/वार्ताहर
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात विठू माऊलींच्या गजरात वारीचे औचित्य साधून तळमावले येथे शिवसमर्थ चे कुटूंबप्रमुख अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.आॅप.क्रे.सोसा.लि; तळमावले च्या मुख्य कार्यालयात विठूरायाची विधीवत पुजा करण्यात आली. यावेळी कार्यालयामध्ये असलेल्या विठठल रखुमाई यांच्या मुर्तीसभोवताली नैसर्गिक फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. तसेच सुश्राव्य भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मुख्य कार्यालयाच्या शुभारंभावेळी श्री विठ्ठल रखुमाई यांची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक एकादशीला कार्यालयामध्ये भजनाचे आयोजन केले जाते. तसेच घाडगेनाथ मंदीर कोळे येथे प्रसादाचे वाटप केले जाते. "सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे परंतू तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे" संस्थेच्या या ब्रीद वाक्यानुसार संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला अध्यात्माची जोडी लावण्याचे काम केले जाते आहे. पंढरपूर वारीला जाणाऱ्या काही दिंडींचे स्वागत संस्थेच्या माध्यमातून केले जाते. विभागातील पारायण मंडळे, सप्ताह यामध्ये योगदान देण्याचा संस्था व परिवाराचा नेहमी प्रयत्न असतो.
याशिवाय गेले काही वर्षापासून वाखरी ता.पंढरपूर येथे माउलींच्या तिसऱ्या उभ्या रिंगणाच्या वेळी संस्थेतील काही कर्मचारी, अधिकारी उपस्थित राहतात. संस्थेच्या वतीने पंढरपूर वारी विषेशांक केला जातो त्याचे प्रकाशन आणि वितरण या ठिकाणी केले जाते.
दरम्यान, सौ.व श्री.दिलीप बोत्रे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे, देवबा वायचळ, शिवाजी सुर्वे, उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे, नितीन पाटील, रविंद्र पाटील, विलास घारे व मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
अभिषेक झाल्यानंतर महाआरती करण्यात आली त्यानंतर सर्व उपस्थितांना डिंकांच्या लाडूंचे वाटप करण्यात आले. तसेच सायंकाळच्या वेळेला सुश्राव्य भजन करण्यात आले. त्यामुळे संस्थेतील व परिसरातील वातावरण भक्तीमय स्वरुपाचे झाले होते