बुधवार, २८ जून, २०२३

एक रुपयात शेतकऱ्यांना पीक हमी देणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत

 

एक रुपयात शेतकऱ्यांना पीक हमी देणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना

सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत 


 

 

            सातारा दि. 28,- नैसर्गिक आपत्ती व अनिश्चित हवामानामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. अशा कठिण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधित राखण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना मदतीस येते. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे व त्यांच्या पिकाला हमी देण्याच्या  उद्देशाने ही पीक विमा योजना राबवण्यात येते. सहसा या पीक विमा योजनेचा हप्ता दर हा 2 टक्के असतो. पण, शासनाने आता फक्त 1 रुपया भरून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होण्याची संधी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडणार नाही. या पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम दिनांक 31 जुलै 2023 अशी आहे. 

 

            जिल्ह्यातील तालुकानिहाय, महसूल मंडलनिहाय पीक क्षेत्र अधिसूचित केले असून त्याप्रमाणे भात, खरिप ज्वारी, बाजरी, नाचणी, भूईमूग, सोयाबीन, मूग, उडिद व खरिप कांदा या 9 पिकांसाठी जिल्ह्यात ही योजना लागू आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया भरावयाचा आहे. उर्वरीत विमा हप्ता शासन भरणार आहे.

            या योजनेमध्ये कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही सहभागी होता येणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक असल्याने त्यांना ज्या शेतातील अधिसूचित पिकाचा विमा उतरावयाचा आहे, त्या शेताचा 7/12 उतारा, खाते उतारा (8 अ) घेऊन ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे त्या ठिकाणी आपला विमा हप्ता भरायचा आहे. तसेच सार्वजनिक सुविधा केंद्र, पोस्ट कार्यालय, विमा कंपनीच्या संकेतस्थळावरूनही विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 7/12 उतारा प्राप्त होत नसल्यास सदर शेतात अधिसूचित पीक असल्याचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. 

 

या योजनेंतर्गत गारपीट, भूस्खलन, वीमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, ढगफुटी, चक्रीवादळ, वीज कोसळ्याने नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर निश्चित करण्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे योजनेत सहभागी शेतकऱ्यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी वित्तीय संस्थेस (बँकेस) अथवा विमा कंपनीस नुकसान झाल्यापासून 72 तासांच्या आत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. 

 

या योजनेतील संरक्षित बाबी पुढीलप्रमाणे आहेत. पीक पेरणी पुर्वी / लावणी पूर्वी नुकसान भरपाई, हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट (उभे पीक), स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, काढणी पश्चात नैसर्गिक कारणांमुळे होणारे नुकसान.

बिगर कर्जदार शेतकरी वैयक्तिकरित्या आपले अर्ज विमा कंपनीस सादर करून अथवा विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारेही या योजनेत सहभागी होऊ शकतात. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास त्यांनी विमा हप्ता कर्ज रकमेतून वजावट करुन विमा कंपनीकडे वर्ग न करण्याची सूचना बँकेस द्यावी लागेल. 

 

योजनेत सहभागी होण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतकऱ्यांनी ज्या बँकेत खाते आहे तेथे अथवा विमा कंपनीच्या कार्यालयात, सार्वजनिक सुविधा केंद्र, विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे हप्ता भरावा. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, मंडळ  कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...