शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या अनुषंगाने कलम 36 लागू

 

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या  अनुषंगाने कलम 36 लागू

 


सातारा,दि. 28 (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक सन 2022-23 सन 2027-28 प्रक्रियेबाबत प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेला असून या कार्यक्रमानुसार मेढा/जावळी कृषी उत्पन्न बाजार समितीची दि. 29 एप्रिल 2023 रोजी  मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

सातारा, कराड, पाटण, कोरेगाव, वडूज, फलटण, लोणंद व वाई या कृषी उत्पन्न बाजार दि. 30 एप्रिल 2023 रोजी मतदान प्रक्रिया व दि. 1 मे 2023 रोजी  मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

 

या  निडणूक प्रक्रिया कालावधी दरम्यान आयोजीत केले जाणारे विविध कार्यक्रम, मिरवणूक  या संबंधाने वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करणे. तसेच मिरवणुकींच्या मार्गासंबंधाने व मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे आणि ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाचे पालन व्हावे व लाऊडस्पीकरचा वापर योग्य प्रकारे व्हावा  यासाठी समीर शेख  पोलीस अधिक्षक सातारा यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार, कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्त कामी नेमलेल्या सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक यांच्यासह बंदोबस्तावरील अन्य सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना जावळी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक संबंधाने मतदान दिवशी व मतमाजणी दिवशी तसेच उर्वरित सातारा, कराड, पाटण, कोरेगाव, वडूज, फलटण, लोणंद व वाई या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दि. 30 एप्रिल 2023 रोजीची मतदान प्रक्रिया व दि. 1 मे 2023 रोजीची मतमोजणी प्रक्रिया कालावधीकरिता त्या-त्या पोलीस ठाणे हद्दितील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी म्हणून व मा.सर्वोच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या निर्बंधाचे यथोचित पालन व्हावे यादृष्टीने आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.

सातारा - कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 6 मे पर्यंत शस्त्र व जमावबंदी

 

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 6 मे पर्यंत शस्त्र व जमावबंदी

 


 

सातारा , दि. 28 : सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम चे कलम  37 (1) (3) अन्वये दि. 21 एप्रिल 2023  रोजीच्या मध्यरात्री 0.00 पासून  ते दि. 6 मे 2023 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जारी केला आहे.

 

 

       या आदेशानुसार नागरिकांना शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुऱ्या, काठ्या- लाठ्या किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा अस्त्र, सोडावयाची अस्त्रे, फेकावयाची हत्यारे किंवा साधणे बरोबर घेणे, जमा किंवा तयार करणे, व्यक्तीची     अगर प्रेते किंवा त्याच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे, सभ्यता अगर नितीविरुद्ध याविरुध्दअसतील अशी किंवाराज्याची   असतील अशी किंवा  राज्याची शांतता धोक्यात येईल शी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे अशी चित्रे - चिन्हे, फलक अग इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा त्यांचा लोकांत प्रसार करणे अशा मनाईचे उल्लंघन करुन जर कोणत्याही इसम अशी कोणतीही वस्तु बरोबर घेवून जाईल किंवा कोणताही जिन्नस दाहक पदार्थ किंवा अस्त्र जवळ बाळगतील तर तो कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांकडून निशस्त्र केले जाण्यास  किंवा दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ क्षेपणास्त्र त्यांच्याकडून जप्त केले जाण्यास पात्र असेल आणि अशा तऱ्हेने जप्त केलेल्या वस्तू दाहक पदार्थ, स्फोटक पदार्थ, क्षेपणास्त्र हे सरकार जमा होईल. पोटकलम (3) अन्वये असलेल्या अधिकारान्वये सार्वजनिक सुव्यवस्था रोखण्यासाठी जमावास मिरवणूकीस वरील कालावधीत व कार्यक्षेत्रात या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. 

 

         शासनाची सेवा करणारे किंवा नोकरी करण्याच्या कामी ज्यांच्या वरीष्ठांनी निर्दीष्ट केल्यावरुन अगर त्यांना कर्तव्याच्या स्वरपामुळे अशी खंड 1 मध्ये उल्लेखलेल्या पैकी वस्तु धारण करणे किंवा देणे आवश्‌यक आहे. ज्यांना शारिरीक दुर्बलतेच्या कारणावरुन जिल्हादंडाधिकरी अगर त्यांना प्राधिकृत केलेले अधिकाऱ्यांना लाठी किंवा काठी वापरण्यास परवानगी दिली असेल अशी व्यक्ती.    सदरचा आदेश यात्रा, धार्मिक कार्य, लग्न विधी कार्य, अंत्यविधी कार्यास लागू होणार नाही.

 ज्या लोकांना शांततेच्या मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करावयाचा असेल त्याचवेळी पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच संबंधित  पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही, असे आदेशात नमूद आहे.

गुरुवार, २७ एप्रिल, २०२३

डाॅ.संदीप डाकवे यांना पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

 डाॅ.संदीप डाकवे यांना पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

तळमावले/वार्ताहर
ठाणे येथील पश्चिम महाराष्ट्र रहिवासी विकास संस्था यांच्या वतीने दिला जाणारा पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्कार पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील युवा पत्रकार व चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दि.30 एप्रिल, 2023 रोजी सांस्कृतिक रंगमंच, निलांबरी सोसायटी समोर, विटावा नाका, ठाणे येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्य शुल्क उत्पादन मंत्री तथा पालकमंत्री ठाणे व सातारा ना.शंभूराज देसाई, खा.डाॅ.श्रीकांत शिंदे, आ.जीतेंद्र आव्हाड व अन्य मान्यवर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नवनीत सिनलकर व सचिव विजय पवार यांनी दिली आहे.
यापूर्वी डाॅ.संदीप डाकवे यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून 4 वेळा पुरस्कार देवून गौरवले आहे. आतापर्यंत त्यांची 9 पुस्तके, 13 हस्तलिखिते प्रकाशित झाली आहेत. त्यांनी वृत्तपत्र कात्रण प्रदर्शने भरवली आहेत. तसेच विविध विषयांवर लेखन केले आहे. इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड, हायरेेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड आणि वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड, द ग्रेटेस्ट इंडियन या पुस्तकात त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. प्रिंट मिडीयासह टीव्ही 9 मराठी, झी 24 तास, साम टीव्ही, एबीपी माझा, आयबीएन लोकमत, जय महाराष्ट्र, लोकशाही न्यूज या आघाडीच्या इलेक्ट्राॅनिक मिडीयाने त्यांची दखल घेतली आहे. दूरदर्शनच्या ‘विचारांच्या पलीकडले’ या कार्यक्रमात त्यांची अर्ध्या तासाची मुलाखत प्रसिध्द झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध स्तरांतून डाॅ.संदीप डाकवे यांचे अभिनंदन होत आहे.


गुरुवार, २० एप्रिल, २०२३

पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्यास शासनाची प्राथमिकता – सहकार मंत्री अतुल सावे

 

पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्यास शासनाची प्राथमिकता – सहकार मंत्री अतुल सावे

 
 

मुंबई, दि. २० : “राज्यातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी पतसंस्थामधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि ठेवीदारांची विश्वासार्हता वृद्धिंगत करण्यास शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजना राज्य शासनाने प्रस्तावित केली आहे,” अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.

मंत्रालयात नुकतीच याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रस्तावित स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजनेसंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश अबीटकर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय परमाने, सहकार आघाडीचे दीपक पटवर्धन, पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सहकार मंत्री श्री.सावे म्हणाले की, राज्यातील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधीमुळे हे शक्य होणार आहे. डीआयसीजीसीच्या धर्तीवर नागरी सहकारी बँकांतील ठेवींना ज्याप्रमाणे संरक्षण आहे त्याच पध्दतीने राज्यातील पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण शक्य होईल. पतसंस्थांच्या बाबतचा विश्वास वाढेल आणि सहकारातुन समृध्दी हे ध्येय गाठता येईल.

या बैठकीत पतसंस्थांच्या प्रतिनिधीनी मांडलेल्या सूचना व हरकती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या सूचनांचा सकारात्मक विचार करून सर्वसमावेशक योजना तयार करण्यात येईल, असे सांगून  आणखी काही सूचना असतील तर लेखी कळवावे, असे आवाहनही सहकार मंत्री श्री. सावे यांनी यावेळी केले.

बुधवार, १९ एप्रिल, २०२३

खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

 

खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात २५ समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

 मुंबई, दि. 19 :- देशासह महाराष्ट्रातही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे 25 समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी आज संवाद साधला. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह अधिष्ठाता आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविडबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क लावावा, तसेच वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सर्वांनी मास्क लावून काम करावे असे निर्देशही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, सद्यस्थितीत वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत 5 हजारांहून अधिक कोविड खाटा आहेत. तर 2 हजारांहून अधिक व्हेंटिलेटर व आवश्यकता पडल्यास ऑक्सिजन करिता ६२ एलएमओ टँक्स, ३७ पीएसए प्लांट कार्यरत आहे. त्याच प्रकारे 2 हजार जम्बो आणि 6 हजार लहान सिलेंडर तयार आहेत.

प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात कोविड तपासणी सुविधा उपलब्ध असून एका दिवसात वैद्यकीय महाविद्यालयात 30 हजारांहून अधिक कोविड चाचण्या होऊ शकतात. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक 10 व 11 एप्रिल रोजी प्रत्येक महाविद्यालयात कोविड मॉक ड्रिल घेण्यात आली आहे.

कोविड प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरिता मास्कचा वापर हे प्रभावी साधन आहे. मास्कमुळे कोविडची लागण होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे अधिष्ठाता यांनी आपल्या महाविद्यालयात आणि रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ यांना मास्क लावून काम करण्यास सांगावे. याशिवाय ज्येष्ठ व्यक्तींचे लसीकरण करण्यावर भर द्यावा. येणाऱ्या काळात सर्व अधिष्ठाता यांनी सर्व महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्सची संख्या यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे. रुग्णालयात प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साधने उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचनाही मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.

शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, रेमीडिसीव्हीरची उपलब्धता, रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, गरज पडल्यास अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला.

सधन कुक्कुट विकास गट स्थापनेसाठी फक्त कराड तालुक्यातील इच्छुक लाभार्थींनी दि. 27 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.

 

सधन कुक्कुट विकास गट स्थापनेसाठी फक्त कराड तालुक्यातील 

इच्छुक लाभार्थींनी  दि. 27 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.




            सातारा दि. 19 : परसातील कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे ही योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सन 2022-23 मध्ये फक्त कराड तालुक्यातील इच्छुक लाभार्थींनी  दि. 27 एप्रिल 2023 पर्यंत पशुसंवर्धन  विभाग पंचायत समिती कराड येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.

            या योजने अंतर्गत एकूण प्रकल्प किंमत रु. 10 लाख 27 हजार 500 असून सर्व प्रवर्गातील लाभार्थींना शासनाचे 50 टक्के अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रु. देय असून उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थींने स्वत:चा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभारावयाचा आहे. योजनेच्या लाभासाठी लाभार्थी यांची वयोमार्यादा 18 ते 60 वर्ष राहील.

            या योजनेसाठी करावयाचा अर्ज नमूना, जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे व योजनेच्या सविस्तर माहितीसाठी पंचायत समिती कार्यालयातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही डॉ. परिहार यांनी केले आहे.

मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

सातारा : खाजगी प्रवासी बसेसची विशेष रात्रतपासणी मोहिम 4 लाख 60 हजार दंड वसूल

सातारा  : खाजगी प्रवासी बसेसची विशेष रात्रतपासणी मोहिम 4 लाख 60 हजार दंड वसूल


 
सातारा दि. 18 : सातारा उप प्रादेशिक पारिवहन कार्यालयामार्फत विशेष रात्र बस तपासणी मोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये विविध गुन्ह्याखाली मोटार वाहन कायद्यांतर्गत खाजगी बसेसवर कारवाई करण्यात येऊन विना परवाना व थकित कर असणारी वाहने, बसेस् मधून मालवाहतूक करणारी वाहने व जादा भाडे आकारणी करणारी वाहने यावर विशेषत्वाने मोटार वाहन कायद्यांर्गत दोषी आढळून आलेल्या 181 खाजगी बसेसवर 4 लाख 60 हजार 608 इतका दंड आकारण्यात आला.

 

अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने या कार्यालयामार्फत दिनांक 01 ते 17 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षेच्या दृष्टिने राष्ट्रीय महामार्ग व इतर महामार्गावर तपासणी मोहिम राबिवण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमेमध्ये 1913 दोषी वाहनांवर  कारवाई करुन 20 लाख 30 हजार 242 इतकी प्रत्यक्ष दंड व कर वसुली करण्यात आली.

 

        अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये तालुकानिहाय नेमलेल्या विशेष पथक व दोन नियमित पथकामार्फत ज्या ठिकाणी अपघाताची तीव्रता जास्त आहे अशा ठिकाणी विशेषत: हेल्मेट, सिटबेल्ट, अतिवेग, रॅश ड्रायव्हिंग, इ. गुन्ह्यांसाठी वाहन तपासणी करुन दोषी वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे.

 

        खंडाळा येथे नेमलेल्या स्थायी पथकामार्फत खाजगी व इतर बसेस तसेच प्रवाशी वाहने राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशिरपणे थांबा घेऊन प्रवाशी चढ उतार करतात त्यामुळे इतर रस्ता वापर करणारे घटक यांना धोका उत्पन्न होतो त्यावर विशेषत्वाने कारवाई करण्यात आली.

 

        आनेवाडी टोल नाका स्थायी पथकामार्फत रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट, सिटबेल्ट, अतिवेग, मोबाईल, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

            राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्या समवेत राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनांवर तसेच राष्ट्रीय महामार्गावर चुकीच्या मार्गिकेमधून चालणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत फिरत्या पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे.

 

याशिवाय दोन फिरते पथकामार्फत जिल्ह्यात होणाऱ्या अपघातस्थळी तातडीने भेट देण्यासाठी व अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी पुन्हा अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत संबंधित विभागांना अवगत करण्यात आले आहे. अंमलबजावणी दरम्यान वाहनचालक यांच्याकडून तशाच प्रकारची चुक टाळण्यासाठी आवश्यक ते समुपदेशन सुद्धा पथकातील अधिकारी यांचेकडून करण्यात येत आहे.

 

अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी  दुचाकी, चारचाकी व पादचाऱ्यांना वाहतुकीच्या नियमांचे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिने पालन करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.

 

कृष्णा, पंचगंगेचे पूर नियंत्रण, प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

कोल्हापुरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी, उच्च न्यायालयाच्या सर्किट  बेंचसाठी पाठपुरावा

कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिकेशी निगडीत विविध योजनांबाबत कार्यवाहीचे निर्देश

मुंबई, दि. १७ :- कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी जलसंपदा विभागाने कृष्णा, पंचगंगा नदी पात्रांतील गाळ काढण्यासाठी तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया व अन्य उपाययोजनांबाबत तातडीने पावले उचलावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामांसाठीचा नगरोत्थान योजनेतील १०० कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. यासह इचलकरंजी महापालिकेच्या नवीन सभागृहासाठी आणि महापालिकेसाठी अंशदान तरतुदीबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा, योजना आणि प्रश्नांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार धैर्यशील माने, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार चंद्रदिप नरके, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, सहकार व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भागे, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे, इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह इचलकरंजी, हुपरी परिसरातील शिष्टमंडळातील सदस्य, वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडीत उद्योजक आदी उपस्थित होते.

खासदार श्री. माने यांनी हातकणंगले तसेच खासदार प्रा. मंडलिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांची मांडणी केली. मतदार संघ परिसरात आवश्यक विविध योजना तसेच त्या करिता आवश्यक निधी व करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली. सुरवातीलाच खासदार श्री. माने यांनी वाळवा तालुक्यातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आभार मानले.

त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले की, पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत विभागाने समन्वय राखावा. कोणत्याही परिस्थितीत नदीचे प्रदूषण होऊ नये यासाठी प्रक्रिया प्रकल्प तसेच अन्य अनुषांगिक पर्यायांचा विचार करावा. इचलकरंजी महापालिकेने सांडपाणी प्रक्रियेकरिता वाढीव क्षमतेच्या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करावा.विशेषतः पाणी पुनर्वापराच्या प्रकल्पाबाबतही विचार करावा. बायो टॉयलेटसारख्या अभिनव पर्यायांचाही शक्य तिथे अवलंब करावा. विशेषतः ज्या गावांमध्ये प्रक्रिया प्रकल्प शक्य नसेल, अशा गावांचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा.

दर पावसाळ्यात पंचगंगा आणि कृष्णा नदीमुळे पूर परिस्थिती निर्माण होते. त्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले की, नदी पात्रातील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाने एक धोरण निश्चित करावे. यातून नदी पात्राचे खोलीकरण, रुंदीकरण होईल तसेच प्रवाहाचा मार्गही मोकळा होईल. यासाठी जलसंपदा विभागाचा यांत्रिकी विभाग आणि जोडीला स्वयंस्फूर्तीने सहभाग देऊ इच्छिणाऱ्या खासगी यंत्र धारकांचाही सहभाग घ्यावा. त्यासाठी डिझेलची उपलब्धता आणि देखभाल, दुरूस्ती आदी निधीबाबतही कार्यपद्धती निश्चित करावी. त्यासाठी जलयुक्त शिवारच्या लोकसहभागाच्या तत्वाचाही अवलंब करता येईल. कोल्हापूर महापालिकेचा पूर नियंत्रणाच्या उपाययोजनांच्या निधीबाबतही प्रस्ताव सादर करावा. दरडी कोसळणे, भूस्खलन याबाबत तज्ज्ञांच्या मदतीने अशा जोखमींच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात यावे.

कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकेच्या महापुरामुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या मागणीवरही नगरविकास विभागाने तत्काळ कार्यवाही करावी. नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठीच्या १०० कोटी रुपयांचा प्रस्तावाला मंजुरी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

इचलकरंजी महापालिकेच्या विविध मागण्यांबाबतही यावेळी चर्चा झाली. इचलकरंजीतील पाणीपुरवठा योजनांसाठी अमृत २ योजनेतून ६० कोटींचा निधी दिला गेला आहे. याशिवाय नगरोत्थान मधूनही २१ व १६ कोटींचे दोन प्रस्ताव आणि शहरातील सीसीटीव्हीचा २२ कोटींचा प्रोजेक्टही मंजूर करण्यात आल्याची माहिती नगरविकास विभागाने दिली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले की, इचलकरंजी महापालिकेला ठोक अंशदान मिळावे यासाठी फेरप्रस्ताव सादर करण्यात यावा. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वाढीव क्षमतेच्या प्रकल्पाबाबत प्रस्ताव देण्यात यावा. इचलकरंजीतील महापालिका सभागृहासाठी जागा व निधीबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा. इचलकरंजीतील न्यायालयाच्या इमारतीच्या भूखंडासाठी महापालिकेने ना-हरकत दिली आहे. त्यावरील उर्वरित कार्यवाही लवकरात पूर्ण करण्यात यावी.

कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय संकुलासाठी शेंडा पार्क येथील आरोग्य व कृषि विभागाची जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बैठकीत दिले. कोल्हापूर शहरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील परीख पूल येथील राजारामपुरी आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसर यांना जोडणाऱ्या उड्डाण पुलाबाबतही महापालिकेने व्यवहार्यता व विविध पर्याय तपासून प्रकल्प आराखडा सादर करावा. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरात सर्किट  बेंच सुरु करण्याच्या मागणीबाबतही पाठपुरावा सुरु आहे. त्याबाबतही लवकरच सकारात्मक पाऊल पडेल,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

माणगांव (ता. हातकणंगले) येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढाकाराने आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या माणगाव अस्पृश्य परिषदेच्या आयोजनाचा शतकोत्सव साजरा करण्यासाठी सुनियोजन करण्याचे तसेच नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाबाबतही संबंधित विभागांनी समन्वयाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

कोल्हापूर व सांगली जिल्हयातील औद्योगिक विषयांवर स्वतंत्र बैठक बोलावण्यात येईल, असे उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत मंत्री सर्वश्री केसरकर, पाटील, चव्हाण यांनीही सहभाग घेतला व सूचना केल्या.

महाराष्ट्रातील ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान

 

 प्रथम क्रमांकाचे तीन तर द्वितीय व तृतीय क्रमांकाचा प्रत्येकी एक पुरस्कार

नवी दिल्ली, दि. १७ : सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ५ ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी,  कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा  पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाच्या  आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्यावतीने 17 ते 21 एप्रिलपर्यंत ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आज राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, विभागाचे सचिव सुनील कुमार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी काही प्रमुख पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तर, काही पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

संयुक्त राष्ट्राने ठरविलेल्या विविध ९ श्रेणीतील सतत विकासाच्या मानकांनुसार द्रारिद्र्यमुक्त आणि सुधारित उपजिवीका श्रेणीत सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील खंडोबाचीवाडी आणि स्वच्छ आणि हरित पंचायत म्हणून कुंडल या ग्रामपंचायतींना राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह दोन्ही ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात प्रत्येकी एक कोटी रूपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली. खंडोबाचीवाडीचे  सरपंच धंनजय गायकवाड, उपसरपंच उत्तम जाधव, ग्रामसेवक स्वप्नगंधा बाबर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या छोट्याशा गावाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी २८ बचत गटांची निर्मित केली. या माध्यमातून गावातील महिलांना २८ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. या रक्कमेतून महिलांनी कापड दुकान, शिलाई व्यवसाय, किराणा व्यवसाय, मिरची कांडप, ब्युटी पार्लर, कुक्कुटपालन, पशुपालन व दुग्धव्यवसाय, शेळीपालन असे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १४ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत गावातील ३४९ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेंतर्गत गावातील २२ दिव्यांग व महिलांना संजय गांधी निराधार निवृत्तीवेतन योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ दिला जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अन्नसुरक्षा योजनेचा ३६७ लाभार्थींना लाभ दिला जात आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत ४०३ लाभार्थींचे खाती उघडण्यात आली  असून  विविध शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून दिल्याबद्दल ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी देशात अव्वल ठरली आहे.

स्वच्छ आणि हरित पंचायत या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कुंडल ग्राम पंचायतीला गौरविण्यात आले. पुरस्कार सरपंच दगडू खाडे, गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, ग्रामसेवक महादेव यल्लाटे यांनी स्वीकारला. गावामध्ये ५ लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लॅन्ट) आहे. ३५ सौर पथदिवे (सोलर स्ट्रिटलाईट) आहेत व सर्व रस्त्यांवर आणि संपूर्ण गावातील घरांमध्ये एलईडी बल्ब आहेत. गाव संपूर्णपणे हागणदारीमुक्त आहे. पर्यावरणपूरक घनकचरा व सांडपाणी प्रकल्प गावामध्ये उभारण्यात आला आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळ्या २०० कचरापेटीद्वारे गोळा केला जातो. गावात १५०० एकर जैविक पद्धतीने शेती करण्यात येते. त्यांच्या या कार्याची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतीला ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार आज राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार सरपंच संतोष टिकेकर, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, ग्रामसेवक अस्लम हूसेन शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या ग्राम पंचायतीने सोलर पॅनल, पवनचक्की, बॉयोगॅसच्या माध्यमातून 15 हजार वॅट विद्युत निर्मित केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी आज ग्रामपंचायतीचा गौरव झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला कार्बन न्युट्रल विशेष पंचायतीचा  व्द‍ितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सरपंच  जयश्री दिवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्र,   ग्रामसेवक पुंडलिक पाटील यांनी स्वीकारला. कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी या ग्रामपंचायतीने नावीण्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. या गावाने रस्त्यांच्या दोन्ही कडेला फळ भाज्यांची झाडे लावली आहेत. प्रदूषण मुक्त गाव होण्याचा मान या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे. व्यासपीठावरून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री श्री. पाटील यांनी या गावाच्या कामाचा उल्लेख आपल्या भाषणात केला.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील आलाबाद या ग्रामपंचायतीला महिला अनुकूल पंचायत या श्रेणीतील तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने  गौरविण्यात आले. पुरस्कार सरपंच लता कांबळे, ग्रामसेवक अनिकेष पाटील यांनी स्वीकारला. आलाबादची लोकसंख्या १८८३ असून महिलांची संख्या ८४८ असून ती ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ग्रामपंचायत आलाबादने  महिला सक्षमीकरण आणि बाल विकासावर काम केले. शाळाबाह्य मुली, कमी वजनाच्या मुली आणि अशक्त मुली आणि महिला यावर ग्रामपंचायतने विशेष भर दिला. महिला सभेच्यावेळी ग्रामपंचायत महिलांना एकत्र करण्यासाठी छोट्या कार्यक्रमांचे आयोजन करीत असते.  ग्रामपंचायतींमध्ये लसीकरण मोहिमेसाठी किंवा आरोग्य तपासणीसाठी महिलांना एकत्र करणे अवघड होते. अशावेळी आशा सेविका, एएनएम, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने महिलांना त्यांच्या घरी लसीकरण करून त्यांना योग्य उपचार दिले जाते. किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षण दिले जाते आणि त्यांच्या शिक्षकांच्या मदतीने प्राथमिक शाळा आणि विद्यालयामध्ये जनजागृती केली जाते.

ग्रामपंचायत आलाबाद, गावाला महिला स्नेही ग्रामपंचायत बनवणे. यासाठी महिला आणि मुलींच्या प्रत्येक कामाची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायतीने समित्या स्थापन केल्या आहेत. आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि प्रेरिका ताई नोंदी घेत असतात आणि गरोदर/स्तनपान करणाऱ्या, मुली आणि सर्व महिलांच्या समस्या सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर आज आलाबाद ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले.

सोमवार, १७ एप्रिल, २०२३

सातारा : नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन

 नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन


 



सातारा दि. 17 : राज्यात वाढत असलेल्या Seasonal Influenza आजार आणि कोविड-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

कोविड-19 व Influenza ची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडीत असून त्यामध्ये खोकला, श्वास घेणेस त्रास, निमोनिया, ताप इत्यादी प्राथमिक लक्षणे आहेत. कोविड-19  विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने हवेवाटे त्याचप्रमाणे शिंकणे, खेाकणे हस्तांदोलन इत्यादी कारणांमुळे होतो. या आजाराचे अनुषंगाने 50 वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर व किडनीचे आजार असलेले तसेच, ज्या नागरिकांना यापूर्वी कोविड-19 ची लागण होऊन गेलेली आहे (Post covid) अशा नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी वेळोवळी व जेवणांपूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, शिंकताना, खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, हस्तांदोलन टाळावे, चेहरा, नाक व डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करु नये आणि विशेष म्हणजे गरज नसतांना गर्दीचे व बंदिस्त ठिकाणी जाणे टाळावे.

शासनाच्या निर्देशानुसार या आजाराची व्याप्ती वाढू नये, यासाठी जिल्हयात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व प्रकारची शासकीय/निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविदयालये तसेच गर्दीच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी (आठवडे बाजार, एसटी स्टँण्ड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठया प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे) सर्व नागरिकांनी आणि सर्व शासकीय विभागातील अधिकारी /कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वयंस्फूर्तीने दैनंदिन मास्कचा वापर करावा असे आवाहनही श्री. जयवंशी यांनी केले आहे.

ह. भ. प. राजाराम चिखले यांचे निधन

 ह. भ. प. राजाराम चिखले यांचे निधन



 पाटण : चिखलेवाडी (कुंभारगाव) ता. पाटण येथील ह. भ.प. कै. राजाराम विष्णू चिखले यांचे शुक्रवार दिनांक 14 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
 कै. राजाराम चिखले मुंबई येथे एसटी सेवेमध्ये कार्यरत होते. ते सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांमध्ये कार्यरत होते. चिखलेवाडी ग्रामपंचायत मध्ये ते तंटामुक्त अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. भागामध्ये राजाभाऊ म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, जावई ,नातू असा परिवार आहे. त्यांचे जेष्ठ चिरंजीव श्री. संदीप चिखले हे सध्या भारतीय लष्कर सेवेमध्ये कार्यरत आहेत तर कनिष्ठ चिरंजीव श्री. विश्वनाथ चिखले पुणे येथील कंपनी मध्ये उच्च पदावर सेवा बजावत आहेत त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


आ.बाळासाहेब पाटील यांचेकडून डाॅ.संदीप डाकवेंच्या कार्याची दखल

 

 



तळमावले/वार्ताहर

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणारे व आपल्या अंगभूत कला, लेखणीतून आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवलेले पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यसनमुक्तीचा ध्यास घेवून जनजागृतीसाठी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या या लिखाणाची दखल ‘वर्ल्ड गेटेस्ट बुक ऑफ रेकाॅर्ड’ ने घेतली आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव माजी सहकार व पणन मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा व विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांना पत्र पाठवून केला आहे.


अनेक जण व्यसनांच्या आहारी जात आहेत. व्यसनमुक्तीचे ध्येय घेवून डाकवे समाजात जनजागृती चे काम करीत आहेत. विविध लेख व समाजमाध्यमांवर ते लिखाण करुन जनजागृती करीत आहे. ‘निर्धार व्यसनमुक्तीचा’ या शीर्षकांतर्गत व्यसनमुक्ती या विषयावर त्यांनी लेख, बातम्या, फोटो फिचर, यशोगाथा इ. लिहून त्या प्रसिध्द केल्या आहेत. याबरोबर या बातम्यांचे हस्तलिखित, बातम्यांच्या कात्रणांचे प्रदर्शन, व्यंगचित्रे, पोस्टर प्रकाशन आदी नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
डाॅ.संदीप डाकवे यांच्या या कार्याची दखल माजी सहकारमंत्री आ.बाळासाहेब पाटील यांनी घेतली आहे.


 

 


मंगळवार, ११ एप्रिल, २०२३

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

 सातारा दि. 11 : निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्त झालेल्या तसेच सन 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 42 दि. 26 ऑगस्ट 2022  च्या कलम 7 नुसार एकूण 188  ग्रामपंचायत मधील 279 सदस्य व थेट सरपंचाच्या 12 रिक्त जागांच्या पोट निवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी महसूल प्रशांत आवटे यांनी कळविले.

            


पोट निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती / घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

            तालुकानिहाय रिक्त पदांच्या पोट निवडणूकांसाठी पात्र असणाऱ्या ग्रामपंयाचतींची संख्या पुढीलप्रमाणे . सातारा तालुक्यात 31 गांवे, कराड-19, खंडाळा -5, पाटण-13, वाई-9, महाबळेश्वर-32, कोरेगांव-19, माण-3, जावली-34, फलटण-11, खटाव तालुक्यातील 12 गावांचा समावेश आहे.

            वरील पोटनिवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावाचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे. तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक मंगळवार 18 एप्रिल 2023.  नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) मंगळवार दि. 25 एप्रिल ते मंगळवार दि. 2 मे 2023 सकाळी 11 ते दुपारी 3 वा. पर्यंत (शनिवार  दि. 29 , रविवार दि. 30 एप्रिल व सोमवार दि. 1 मे 2023 ची सार्वजनिक सुट्टी वगळून).  नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) बुधवार दि. 3 मे 2023 रोजी सकाळी  11 वा. पासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ) सोमवार दि. 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वा. पर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ सोमवार दि. 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वा. नंतर.  आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक गुरुवार दि. 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 वा. पासून सायं. 5.30 वा.पर्यंत. मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाणी व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील)  शुक्रवार दि. 19 मे 2023. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक बुधवार दि. 24 मे 2023 पर्यंत.

 

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

रेशीम शेतीने गणपत मदने यांच्या जीवनाला कलाटणी

 


पारंपरिक पद्धतीने शेती करताना ओढाताण होणारे कुटुंबीय… ते आज रेशीम शेतीच्या आधारावर मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण पूर्ण… माळशिरस तालुक्यातील गणपत मदने यांच्या जीवनाला रेशीम शेतीने खऱ्या आणि चांगल्या अर्थाने कलाटणी दिली आहे. माळशिरस तालुक्यातील साळमुखवाडी हे गणपत महादेव मदने यांचे गाव. त्यांची 7 एकर शेती आहे. त्यातील 3 एकर क्षेत्रावर रेशीम शेती ते करतात.

गणपत मदने पूर्वी पारंपरिक पद्धतीने ऊस, मका, ज्वारी ही पिके घेत. पण खर्च वजा जाता हातात काही मिळत नव्हतं. विशेष म्हणजे ऊस पिकासाठी येणारा खर्च, मिळणारे उत्पन्न आणि लागणारा कालावधी यांचा ताळमेळ बसत नसल्याने त्यांची खूप ओढाताण व्हायची. त्यांनी दूध व्यवसायही करून पाहिला. त्यांना ४ मुली व एक मुलगा. घरखर्च भागत नसल्याने घरची मंडळी शेजारी रोजंदारीने कामावर जात होती. स्पर्धेच्या युगात मुलांच्या शिक्षणाची व भविष्याची चिंता त्यांना सतावत असे.

अशा परिस्थितीत शेजारच्या सुरवसे भाऊसाहेबांनी केलेल्या रेशीमशेतीने श्री. मदने यांच्याही मनात आशेची पालवी फुटली. त्यांनी 2017 साली तुती लागवड करून रेशीम व्यवसायाचा श्रीगणेशा केला. पहिल्या वर्षी नफा कमी झाला. पण, मिळालेला अनुभव, शास्त्रोक्त मार्गदर्शन व त्रुटींची पूर्तता करत दुसऱ्या वर्षीपासून श्री. मदने यांनी प्रगतीकडे वाटचाल सुरू केली.

याबाबत गणपत मदने म्हणाले, मी 2017 ला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एक एकर क्षेत्रावर तुती लागवड करून रेशीम व्यवसायाची सुरूवात केली. पहिल्या वर्षी विशेष अनुभव नसल्याने आणि लागणारी औषधी, साहित्य सहज मिळत नसल्यामुळे फार कमी नफा झाला. पण दुसऱ्या वर्षी आजुबाजूच्या अनेक शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यास सुरवात केली होती. रेशीम कोष वाहतुकीसाठी सुरवसे भाऊसाहेब यांनी टेम्पो घेऊन कोष विक्री करण्याकरिता कर्नाटकातील रामनगर गाठले आणि खऱ्या अर्थाने आमच्या रेशीम उद्योगाला रंगत येऊ लागली.

गणपत मदने यांना रेशीम अधिकारी आणि समूह प्रमुख यांच्याकडून वेळोवेळी शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळत गेले. त्यांच्याच एका नातेवाईकाने रेशीम उद्योगास लागणारी औषधे आणि साहित्य याचे दुकान सुरू केले. त्यामुळे पंचक्रोशीतल्या सर्व शेतकऱ्यांची अडचण दूर झाली.

याबाबत गणपत मदने म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लागवड केल्याने घरच्या शेतात काम करून प्रत्येक आठवड्याला मजुरी, साहित्य खरेदीसाठी अनुदान आणि रेशीम संगोपन गृह यासाठी मला जवळपास पावणेतीन लाख रूपये मिळाले. रामनगरला कोष विक्री केल्याने दरपण चांगला मिळाला. प्रत्येक चिकातून एकरी 50 ते 60 हजार रूपये मिळत होते. अगदी कोरोनाच्या मंदीच्या काळात जगाचे व्यवहार ठप्प झाले असताना मी रेशीम शेतीमधून नफा मिळवला आहे. फेब्रुवारी 2023 अखेर गेल्या वर्षभरात मी साधारण 1500 अंडीपुंजाचे संगोपन घेतले आहे आणि त्यापासून मला आजअखेर 6 लाख रुपये नफा मिळाला.

गणपत मदने यांचे दर तीन महिन्याला दोन लॉट विक्रीसाठी जातात. हे कोष सातारा जिल्हा, आत्मा, सोलापूर आणि रामनगर (कर्नाटक) येथे विक्रीसाठी जातात. काही कंपन्या शेतावरही येऊन प्रत्यक्ष खरेदी करतात. जूनमध्ये दोन एकर क्षेत्रावर रेशीम शेती वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

गणपत मदने यांनी रेशीम शेतीच्या आधारावर मोठ्या मुलीचे लग्न, दोन मुलींचे डी. फार्म आणि एका मुलीचे एम. एस्सी (मॅथ्स) चे शिक्षण दिले. ती आज बँकेत नोकरी करत आहे. तसेच त्यांचा मुलगा बीसीएस अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. आता त्यांच्या घरचे मंडळी रोजंदारीवर जात नाहीत. याउलट चार ते पाच शेतमजूर त्यांच्या शेतात राबत आहेत. या सुखाच्या दिवसाला एकमेव कारण फक्त रेशीम शेती आहे, असे गणपत मदने अभिमानाने सांगतात. रेशीम शेतीमुळे त्यांच्या घरात सुख समृद्धी आली आहे.

कृषि यांत्रिकीकरणांतर्गत सातारा जिल्ह्यात ७ हजार ९९० जणांनी घेतला लाभ

 


शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे व कृषि क्षेत्रात ऊर्जेचा वापर वाढवणे या मुख्य उद्देशाने शासनाकडून कृषि यांत्रिकीकरण उप उभियान कार्यक्रम राबवण्यात येतो. सातारा जिल्ह्यात यंदाच्या वर्षी या योजनेंतर्गत 39 हजार 468 जणांची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 7 हजार 990 जणांनी या योजनाचा लाभ घेतला आहे. एकूण 42 कोटी रुपयांपेक्षा जास्ती अनुदान प्राप्त झाले आहे.

कृषि यांत्रिकीकरण अभियनांतर्गत विविध घटकांना अर्थसहाय्य करण्यात येते. त्यामध्ये कृषि यंत्र सामुग्री व उपकरणे खरेदी, भाडे तत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषि अवजारे बँक स्थापने, उच्च तंत्रज्ञान व उत्पादनक्षम आधारित साहित्याचे हब निर्मिती या घटकांचा समावेश आहे.

कृषि यंत्र सामुग्री व उपकरणे खरेदीसाठी अर्थसहाय्य – राज्यातील शेतकऱ्यांना कृषि यंत्रसामुग्री/अवजारे खरेदीस प्रोत्साहीत करणे व त्याद्वारे कृषि यंत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे हा या घटकाचा प्रमुख उद्देश आहे. विभागनिहाय पीक रचनेनुसार आवश्यक असलेली व पूर्व तपासणी केलेली दर्जेदार कृषि अवजारे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करुन देणे, शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार व मागणीप्रमाणे कृषि यंत्र सामुग्री / अवजारे उत्पादने अनुदानावर उपलब्ध करून देणे, कृषि उत्पादन प्रक्रियेत अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशांचाही यात समावेश आहे.

कृषि यांत्रिकीकरणांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित यंत्र व अवजारे, ट्रॅक्टर व पावर टिलर चलित यंत्र व औजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित अवजारे, प्रक्रिया युनिट्स, भाडे तत्वावर कृषि यंत्र व अवजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी या घटकांसाठी अनुदान दिले जाते.

या योजनेच्या लाभासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. एकत्रित संगणकीय सोडतीच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. या योजनेंतर्गत विविध घटकांसाठी ज्या योजनेतून अनुदान उपलब्ध होईल त्या योजनेतून संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार लाभ दिला जातो. शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण या घटकासाठी योजनानिहाय स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसून त्यांनी अर्ज केलेल्या बाबी ज्या ज्या योजनेतून उपलब्ध असतील त्या सर्व योजनांसाठी अर्जाचा विचार केला जाईल.

या योजनेंतर्गत पुढीलप्रमाणे अनुदान दिले जाते. ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक व महिला लाभार्थींना किंमतीच्या 50 टक्के किंवा 1 लाख 25 हजार रुपये या पैकी जे कमी असेल ते. इतर लाभार्थ्यांना 40 टक्के किंवा 1 लाख या पैकी जे कमी असेल ते, याप्रमाणे लाभ दिला जातो. इतर अवजारांसाठी कृषि यांत्रिकीकरण उपअभियानाच्या केंद्र शासनाने ठरवलेल्या जास्तीत जास्त मर्यादा किंवा संबंधित अवजारांच्या किंमतीची ठरलेली टक्केवारी यापैकी कमी असेल ते, यानुसार अनुदान दिले जाते.

शेतकऱ्यांनी यंत्र, अवजारे खरेदीचे देयक सादर केल्यानंतर क्षेत्रीय अधिकारी मोका तपासणी करतील. छाननीअंती अनुदानाबाबत क्षेत्रीय स्तरावरून शिफारस करण्यात येईल. त्यानंतर राज्यस्तरावरून शेतकऱ्यांच्या अधार सलग्न बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.

भाडेतत्वावरील कृषि यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषि अवजारे बँक स्थापनेकरिता अर्थसहाय्य – कोरडवाहू भागात कृषि अवजारे, उपकरणे खरेदी करण्यास शेतकऱ्यांना मर्यादा येतात. यासाठी शेतकऱ्यांना कृषि अवजारांच्या सेवा कमी दराने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कृषि अवजारे सेवा सुविधा केंद्र ( कृषि अवजारे बँक) स्थापन करणे हा मुख्य उद्देश आहे. तसेच यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, पीक रचनेनुसार पिकाच्या पेरणीपासून काढणीपश्चात प्रक्रियेपर्यंत शेतकऱ्यांना माफक दराने यांत्रिकीकरणाची सेवा – सुविधा भाडे तत्वावर उपलब्ध करुन देणे, लहान व सिमांतीक शेतकऱ्यांना कृषि यांत्रिकीकरण सुविधेचा लाभ देणे, या उद्देशांचाही समावेश आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. सोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, लाभार्थी अ.जा./अ.ज. प्रवर्गातील असल्यास वैध जात प्रमाणपत्राची प्रत, खरेदी करावयाच्या यंत्र / अवजारे संचाचे दरपत्रक व परिक्षण अहवाल, संस्थेच्या बँक पासबूकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, संस्थेशी संबंधित व्यक्तीच्या बँक सलग्न खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधिकृत केले असल्यास, प्राधिकृत केल्याचे पत्र व संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड / फोटो असलेले ओळखपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत.

स्थापन करण्यात येणाऱ्या अवजारे बँकेसाठी अवजारांची निवड ही स्थानिक पीक पद्धतीनुसार संबंधित पिकाचे पूर्वमाशगत ते काढणीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावरील आवश्यक कामांसाठी उपयोगात येतील अशा पद्धतीची असावी. स्थानिक परिस्थितीनुसार निवडक अवजारांचा संच करुन त्याप्रमाणे खरेदी करणे आवश्यक आहे. याकरिता भांडवली गुंतवणुकीच्या 40 टक्के किंवा अनुदानाची जास्तीतजास्त मर्यादा यापैकी जे कमी असेल त्या मर्यादेत अनुदान दिले जाते. म्हणजे बँक स्थापनेचा खर्च 10 लाखांपर्यंत असल्यास 4 लाखांपर्यंत अनुदान व 25 लाखांपर्यंत असल्यास 10 लाखांपर्यंत अनुदान दिले जाते.

अनुदान वाटपाची प्रक्रिया कृषि यंत्रसामुग्री खरेदी प्रमाणेच आहे. या अवजारे बँकेचे पर्यवेक्षण जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हे करतात.

शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ मिळवून देणारी ही योजना आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने शेती करणे  तसेच उत्पादनामध्ये वाढ होण्यासही यामुळे मदत होत आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही या योजनेचा चांगला फायदा होत आहे.

 

-हेमंतकुमार चव्हाण,

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, सातारा.

00000

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...