सातारा : खाजगी प्रवासी बसेसची विशेष रात्रतपासणी मोहिम 4 लाख 60 हजार दंड वसूल
सातारा दि. 18 : सातारा उप प्रादेशिक पारिवहन कार्यालयामार्फत विशेष रात्र बस तपासणी मोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये विविध गुन्ह्याखाली मोटार वाहन कायद्यांतर्गत खाजगी बसेसवर कारवाई करण्यात येऊन विना परवाना व थकित कर असणारी वाहने, बसेस् मधून मालवाहतूक करणारी वाहने व जादा भाडे आकारणी करणारी वाहने यावर विशेषत्वाने मोटार वाहन कायद्यांर्गत दोषी आढळून आलेल्या 181 खाजगी बसेसवर 4 लाख 60 हजार 608 इतका दंड आकारण्यात आला.
अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने या कार्यालयामार्फत दिनांक 01 ते 17 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षेच्या दृष्टिने राष्ट्रीय महामार्ग व इतर महामार्गावर तपासणी मोहिम राबिवण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमेमध्ये 1913 दोषी वाहनांवर कारवाई करुन 20 लाख 30 हजार 242 इतकी प्रत्यक्ष दंड व कर वसुली करण्यात आली.
अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये तालुकानिहाय नेमलेल्या विशेष पथक व दोन नियमित पथकामार्फत ज्या ठिकाणी अपघाताची तीव्रता जास्त आहे अशा ठिकाणी विशेषत: हेल्मेट, सिटबेल्ट, अतिवेग, रॅश ड्रायव्हिंग, इ. गुन्ह्यांसाठी वाहन तपासणी करुन दोषी वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे.
खंडाळा येथे नेमलेल्या स्थायी पथकामार्फत खाजगी व इतर बसेस तसेच प्रवाशी वाहने राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशिरपणे थांबा घेऊन प्रवाशी चढ उतार करतात त्यामुळे इतर रस्ता वापर करणारे घटक यांना धोका उत्पन्न होतो त्यावर विशेषत्वाने कारवाई करण्यात आली.
आनेवाडी टोल नाका स्थायी पथकामार्फत रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट, सिटबेल्ट, अतिवेग, मोबाईल, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्या समवेत राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनांवर तसेच राष्ट्रीय महामार्गावर चुकीच्या मार्गिकेमधून चालणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत फिरत्या पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे.
याशिवाय दोन फिरते पथकामार्फत जिल्ह्यात होणाऱ्या अपघातस्थळी तातडीने भेट देण्यासाठी व अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी पुन्हा अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत संबंधित विभागांना अवगत करण्यात आले आहे. अंमलबजावणी दरम्यान वाहनचालक यांच्याकडून तशाच प्रकारची चुक टाळण्यासाठी आवश्यक ते समुपदेशन सुद्धा पथकातील अधिकारी यांचेकडून करण्यात येत आहे.
अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी दुचाकी, चारचाकी व पादचाऱ्यांना वाहतुकीच्या नियमांचे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिने पालन करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा