मुंबई : राज्यसभेची निवडणूक होणार की नाही हि उत्सुकता असताना भाजप च्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार रजनी पाटील यांची राज्यसभेच्या खासदार पदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर रजनी पाटील यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या मुंबई येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी रजनी पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन काँग्रेस कडून भाजप नेत्यांना केले होते. यानुसार राज्यसभेची हि निवडणूक बिनविरोध होऊन महाविकास आघाडीकडून काँग्रेस च्या रजनी पाटील यांची निवड झाली आहे. याआधी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मी मुख्यमंत्री असताना रजनी पाटील यांना त्यांच्या जागी राज्यसभेची संधी दिली होती त्यावेळी सुद्धा रजनी ताईंची निवड बिनविरोध झाली होती. तसेच भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे निधन झाल्यावर सुद्धा काँग्रेस ने उमेदवार दिला नव्हता व ती सुद्धा निवडणूक बिनविरोध झाली होती.
-------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा