तळमावले/वार्ताहर
अतिवृष्टीमुळे अत्यंत भयावह परिस्थिती आपल्या महाराष्ट्रातील पाटण आणि चिपळूण मध्ये निर्माण झाली आहे. या लोकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन होणे गरजेचे आहे. तसेच शासनाने निवारा केंद्र उभी करावीत. आपल्या धरणग्रस्त बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संभाजी ब्रिगेड ताकदीने प्रयत्न करेल असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अँड.मनोज आखरे यांनी केले. ते जितकरवाडी, धनवडेवाडी, शिंदेवाडी, भातडेवाडी व इतर स्थलांतरीत केलेल्या गावांना मदत वाटप प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे, इंजिनीयर विजय पाटील, माजी जिल्हाध्यक्ष सांगली संभाजी ब्रिगेड सुयोग औंधकर, संभाजी ब्रिगेड मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे, संघटक मुंबई श्रीकांत गिरी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
अँड.आखरे पुढे बोलताना म्हणाले, ‘‘हे संकट आस्मानी असले तरी याला काही मानवनिर्मित कारणे देखील कारणीभूत आहेत. त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. धरणग्रस्त बांधवांना गेली 25 वर्षे न्याय मिळालेला नाही त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. आम्ही मदत देण्यासाठी नव्हे तर कर्तव्य म्हणून आपल्याकडे आलो आहे. आपल्या समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. यातून न्याय मिळाला नाही तर संभाजी ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र लढा उभा करणार आहे.’’
याप्रसंगी जितकरवाडी, धनवडेवाडी, शिंदेवाडी, भातडेवाडी गावातील स्थलांतरीत लोकांना जीवनावश्यक वस्तुचे कीट व इतर साहीत्य देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहीदभाई कुरेशी, संतोष धामणकर, काकासाहेब कांबळे, बाबा सावंत, मिलिंद कदम, सुनील कोठावळे, मंगेश सोनवणे, दत्ता कोळेकर, मनोज पाके यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा