*आंबेघर, मिरगाव आणि ढोकावळे या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली ग्वाही*
▪️ *तात्पुरत्या निवाऱ्याची सोय तात्काळ करणार*
▪️ *मयतांच्या वारसांना सानुग्रह अनुदानाच्या धनादेशाचे वाटप*
सातारा दि.26 : पाटण तालुक्यातील विविध गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनामध्ये मोठया प्रमाणात जिवीत हानी झाली आहे. या बाधितांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून बाधितांचे चांगल्या पध्दतीने पुर्नवसन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
कोयनानगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत अतिवृष्टीमध्ये मयत झालेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानाचे धनादेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते वारसांना वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. याप्रसंगी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, सत्यजित पाटणकर आदी उपस्थित होते.
पाटण तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेल्या भूस्खलनातील जिवीत हानीबरोबर मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. मिरगाव येथे बचाव कार्यासाठी रस्ते नव्हते कोयनेच्या बॅक वॉटरमधून एनडीआरएफ च्या टीमने व स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केले. आपत्तीग्रस्तांच्या भावना मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडल्या जातील. भविष्यात भूस्खलनाची थोडीतरी कल्पना आली तरी त्याची तात्काळ माहिती प्रशासनाला द्यावी, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शंभूराज देसाई म्हणाले, पाटण तालुक्यातील ज्या ज्या गावांमध्ये आजची परिस्थिती निर्माण झाली त्या सर्व गावांना भेटी दिल्या व तेथील नागरिकांच्या भावना ऐकून घेतल्या. या सर्व भावना शासनाच्या दरबारी मांडणार आहे. राज्य शासन आपत्तीग्रस्तांच्या पाठिशी असून त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचे व तात्पुरत्या निवाऱ्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगतिले.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, विविध यंत्रणांच्या माध्यमातून वाड्यावस्त्यांवर पोहचून घरांचा, पशुधनांचा, शेतीचा शंभर टक्के पंचानामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चार लाख रुपये राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आणि एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निघीतून असे पाच लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान या वेळी देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा