*सातारा : ग्रामपंचायत शिपायाने गावाच्या विहिरीत ओतलं टीसीएल पावडरचं संपूर्ण पोतं ;गावकरी जुलाब उलट्यानी हैराण*सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सरताळे येथे ग्रामपंचायत शिपायाने गावाच्या विहिरीत टीसीएल पावडरचं संपूर्ण पोतं रिकामं केलं. यामुळे ५० पेक्षा अधिक ग्रामस्थांना दूषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो सदृश्य उलट्या जुलाब आजाराची बाधा झाली. या बाधितांवर वाई, पाचवड, सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची देखील माहिती समोर आली आहे. सरपंचासह सरताळे ग्रामपंचायतीतील सदस्यास देखील दूषित पाणी पिल्याने बाधा झाली आहे. तर, या ग्रामपंचायत शिपायाने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचं बोललं जात असून, त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून करवाई करण्यात आली आहे.
सरताळे (जावली) येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत एक किलो टीसीएल पावडर ऐवजी संपूर्ण पोतंच विहिरीमध्ये रिकामी केली.आज सकाळी नियमितपणे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेतून घराघरात हे पिण्याचे पाणी पोहचले. मात्र हे पाणी पिल्याने गावातील ५० पेक्षा जास्त ग्रामस्थांना गॅस्ट्रो सदृश्य उलट्या जुलाब आजाराची बाधा झाली.
या संदर्भात तपासणी केली असता हा सर्व प्रकार दूषित पाणी पिल्याने झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तसेच, हा सर्व प्रकार ग्रामसेवकाच्या बेजबाबदारवृत्तीमुळे घडला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटू लागल्या आहेत.
याबाबत जावळीचे गटविकास अधिकारी सतीश बध्ये यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी आणि बुधवारी पहाटे असे दोन वेळा टीसीएल पावडर गावाच्या विहिरीत शिपायाकडून टाकण्यात आले. त्यामुळे बुधवारी सकाळच्या पाणीपुरवठा करताना हे पाणी वापरात आल्याने काही नागरिकांना उलट्या जुलाबाची लागण झाली आहे. यापैकी बहुतांश जणांची प्रकृती चांगली असून केवळ एका ग्रामस्थाची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे.. विहिरीतील सर्व पाणी उपसा करून बाहेर काढण्यात आले आहे. गावामध्ये प्रत्येक घरी आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. आणखी कुणाला त्रास उद्भवू नये याची दक्षता घेत आहोत. गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल. तसेच, ग्रामपंचायतीच्या शिपायावर कारवाई करत आहोत असेही त्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा