पाटण नगरपंचायत : वर्चस्व पाटणकर गटाचेच
पाटण / प्रतिनिधी : पाटण नगरपंचायत विविध विषय सभापती पदांच्या निवडी सोमवारी बिनविरोध पार पडल्या. या निवडीत चारही सभापतींपदी राष्ट्रवादी काँग्रेस तथा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर गटाच्याच पदाधिकार्यांची वर्णी लागली.
सोमवारी येथील नगरपंचायत कार्यालयात पिठासिन तथा उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांच्या उपस्थितीत निवडी झाल्या.प्रत्येक सभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने सर्वच निवडी बिनविरोध पार पडल्या. यामध्ये पाणीपुरवठा सभापतीपदी उपनगराध्यक्ष विजय उर्फ बापू टोळे, महिला व बालकल्याण सभापती सौ. रश्मी राजेंद्र राऊत, नियोजन विकास व शिक्षण सभापती सौ. योगिता रामचंद्र कुंभार, बांधकाम सभापती किरण पवार व स्थायी समिती सभापती पदावर व नगराध्यक्ष अजय कवडे यांची निवड झाली. या निवडीनंतर श्रीरंग तांबे व अभिषेक परदेशी यांनी नवनिर्वाचीत निवडी जाहीर करत मान्यवरांचे अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
नवनिर्वाचीत सभापतींचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे, तालुका दुध संघाचे चेअरमन शंकरराव जाधव, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजेश पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष सचिन कुंभार आदी मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, हितचिंतक व नागरिकांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा