मत्रेवाडीच्या घाटात दरड कोसळली
तळमावले/वार्ताहर।
एक दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा ढेबेवाडी खोऱ्यात रिपरिप सुरु केली आहे. निवी, कसणी, घोटील, मत्रेवाडी व या विभागामध्ये पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सततच्या पावसामुळे पिकांचे देखील नुकसान होत आहे. मोकळी झालेली जमीन, दगड गोटे कोसळत आहेत. मत्रेवाडीच्या
घाटात देखील असाच प्रकार घडला आहे. सततच्या पावसामुळे माती, दगड गोटे रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवित वा वित्त हानी झालेली नाही. पवारवाडीपासून वरचे घोटील या गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर जाधववाडी, मत्रेवाडी, सलतेवाडी, निवी, मस्करवाडी, कसणी, वरचे घोटील, माईंगडेवाडी इ. गावे येतात. अनेकदा पवारवाडीच्या पुलावर पाणी आल्यामुळे वरील सर्व गावांचा संपर्क तुटतो.
मत्रेवाडीच्या घाटात पडलेल्या या दरडीमुळे वाहतुक विस्कळीत होत आहेच. शिवाय अन्य गोष्टी घडू नयेत यासाठी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अशी मागणी मत्रेवाडी, सलतेवाडी व अन्य वाडी वस्तीवरील लोकांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा