सोमवार, १८ मे, २०२०

पाटण ; अनेक ग्रामपंचायती कोरोनाचा निधी वापरण्यासंदर्भात उदासीन

सातारा जिल्ह्यात कराड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शासनाने पाटण व कराड तालुक्यातील ग्रामपंचायतींना कोरोनाविषयी जनजागृतीसह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगअंतर्गत आरोग्य विषयक योजनेतून पंचायत समिती मार्फत मुबलक निधी उपलब्ध करून तात्काळ खर्च करण्याची परवानगी ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. मात्र त्याची संबंधित ग्रामपंचायतीकडून कितपत अंमलबजावणी केली जात आहे ? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

याबाबतचे आदेश पाटण व कराड तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींना दिले आहेत.या निधीतून गावात सॅनिटायझर बॉटल्स, सुरक्षा मास्कचे वाटप, औषध फवारणी, रस्ते, नाले साफसफाई, पाणीपुरवठा, अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस, आरोग्य सेविका यांना प्रोत्साहनपर भत्ता यासाठी हा निधी तात्काळ खर्च करावयाचा आहे. आपल्या गावचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्य सदरच्या निधीचा वापर योग्य ठिकाणी करतात की नाही ? यावर गावातील सुज्ञ नागरिकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आजमितीस दोन्ही तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचे कोरोना निधी वापरा संदर्भातील धोरण उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा संबंधितांवर ग्रामप्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी कारवाई करावी, अशीही मागणी संबंधित गावातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.

काही गावांमध्ये सॅनिटायझर तसेच सुरक्षा मास्क वाटपामध्ये नियोजनाचा अभाव असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा महामारीच्या काळात काही मंडळींकडून राजकीय श्रेय लाटण्याचेही प्रकार घडत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. एकंदरीतच संबंधित ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याने सावळा गोंधळ उडत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने सॅनिटायझर तसेच मास्कचे वाटप करताना गावची लोकसंख्या लक्षात घेणे आवश्यक असून त्याप्रमाणे मास्क वाटप करणे गरजेचे आहे. परंतु बहुतांश ठिकाणी तसे होताना दिसत नाही. याउलट प्रत्येक कुटूंबाला दोनच मास्क देण्याचा अलिखीत फतवा काही ग्रामपंचायतींनी काढल्याने अनेक कुटुंबियांना मास्क पासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोणाची? ते काही गावचे नागरिक नाहीत का ? भविष्यात त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहणार का? असे एक ना अनेक प्रश्‍न नागरिकांना भेडसावू लागले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...