दहिवडी/म्हसवड ता.माण:
तालुक्याच्या तहसीलदार बाई माने या भरारी पथकासह रात्रगस्तीसाठी फिरत असताना वाळू तस्कराने स्वतःच्या चारचाकी वाहनाने भरारी पथकाच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडका दिल्या, तसेच तहसीलदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत माणच्या महसूल विभागाकडून लिपीक तुषार बजरंग पोळ (रा. गोंदवले खुर्द) यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. श्री. पोळ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चालक संकेत शिरकांडे (रा. राजेवाडी, ता. आटपाडी) व वाहनमालक दत्ता मदने यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तहसीलदारांसह त्यांच्यासोबत असणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, एक ब्रास वाळू चोरी व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या धक्कादायक प्रकाराने म्हसवड परिसरासह माण तालुक्यात खळबळ माजली. मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड परिसरात माण नदीतून विनापरवाना व अवैध वाळू उपसा जोरात सुरू आहे. या भागात वाळू तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शनिवारी पहाटे हिंगणी (ता. माण) परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती माणच्या तहसीलदार बाई माने यांना मिळाली. त्यानंतर त्या स्वतः भरारी पथकातील लिपिक तुषार पोळ व पिंगळी खुर्दचे पोलिस पाटील महेश शिंदे यांच्यासोबत कारवाईसाठी गेल्या. राजेवाडी- हिंगणी रोडवर हिंगणी हद्दीत पहाटे चारच्या सुमारास त्यांनी कारवाईसाठी सापळा लावला.
काही वेळातच राजेवाडीकडून वाळू घेऊन हिंगणी हद्दीत येणारे वाहन (क्रमांक अर्धवट खोडलेला) त्यांनी अडविले. त्या वेळी चालकाने त्याचे नाव संकेत शेरखंडे व मालकाचे नाव दत्ता मदने सांगितले. वाहनातील वाळू विना परवाना व अवैधरीत्या नेत असल्यामुळे ते वाहन पुढील कारवाईसाठी म्हसवड पोलिस ठाण्यामध्ये घे, असे चालकाला सांगितले. मात्र, चालक शेरखंडे याने त्याचे वाहन (एमएच 09 सीए 8777) भरारी पथकाच्या वाहनावर घालून भरारी पथकातील कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. भरारी पथकातील कर्मचारी वाहनापासून बाजूला पळाल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर लगेच शेरखंडे याने ते वाहन, तसेच पंढरपूर रस्त्याने पळवले. भरारी पथकाने त्याचा पाठलाग करून ते वाहन पिलीव घाटाच्या अलीकडे पकडले. मात्र चालक शेरखंडे हा तिथून पळून गेला.
संबंधित वाहन एक ब्रास वाळूसह जप्त करण्यात आले. त्यानंतर लिपिक तुषार पोळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. घटनेचा अधिक तपास म्हसवड पोलिस ठाण्याचे प्रभारी गणेश वाघमोडे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा