काळगाव ता.पाटण,सातारा |
बिबट्याची मानवी वस्तीत वाढलेली वरदळ रोखण्यासाठी सातारा येथील दोन व्यक्तींनी जंगलाला आग लावण्याचा प्रयत्न केला आहे. दिसतोय म्हणून त्याला हुसकावण्यासाठी वनक्षेत्रात वणवा लावणाऱ्या दोघांना वनकर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. काळगाव (ता. पाटण) विभागातील कोळगेवाडीजवळच्या वनहद्दीत गुरुवारी (ता. २७) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल विलास काळे यांनी पत्रकारांना सांगितले.काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळगेवाडीतील वनकक्ष क्रमांक ६२५ मध्ये गुरुवारी दुपारी बाळाराम हरी कोळेकर (वय ६५) आणि सीताराम बंडू बोळावे (वय ६८) यांना वणवा लावताना वनकर्मचाऱ्यांनी पाहिले व त्यांना घटनास्थळीच ताब्यात घेतले.
या वेळी लागलेला वणवा कर्मचाऱ्यांनी विझवला. याच वनक्षेत्रात १७ व १८ फेब्रुवारीलाही वणवा लागलेला होता. मात्र, वनकर्मचाऱ्यांनी त्या वेळीही शर्थीचे प्रयत्न करून तो विजवला होता.
आज घटनास्थळी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे विचारणा केली असता या परिसरात बिबट्या दिसतोय म्हणून राहिलेले क्षेत्र जाळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गवतात टाकून दिलेली काडीपेटीही आणून दिली. भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६,१(ब) (क) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून चौकशीस व न्यायालयात हजर राहण्याची हमी बंध पत्रावर घेऊन त्यांची तात्पुरती सुटका करण्यात आली आहे. वनक्षेत्रपाल विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. एस. राऊत, डी. डी. बोडके, जयवंत बेंद्रे, अमृत पन्हाळे, वनरक्षक विशाल डुबल, सुभाष पाटील, सुरेश सुतार, वनकर्मचारी मुबारक मुल्ला, वसंत मोरे आदींनी हा वणवा विजवण्यासाठी सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा