शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

राजुरी येथे आढळले बिबट्याचे तीन बछडे

आळेफाटा : गटकळमळा परिसरात एका शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोडणी सुरु होती. त्यादरम्यान मजुरांना बिबट्याचे तीन लहान बछडे आढळले. राजुरी (ता. जुन्नर) येथे आज (ता.२९) सकाळी साडेअकराच्या सुमारास या बछड्यांचे दर्शन झाले.
राजुरी येथील गटकळमळा परिसरात शिवाजी श्रीपत गटकळ यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोडणी सुरु होती. यावेळी ऊसतोडणी मजुरांना साधारण एका महिन्याचे बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. याबाबत त्यांनी संबंधित शेतकऱ्यास माहिती दिली. तसेच संबंधित शेतकरी शिवाजी गटकळ यांनी याविषयी तातडीने वनविभागाला कळविले.

त्यानंतर याठिकाणी वनविभागाचे वनरक्षक जे. बी. सानप यांनी वन कर्मचाऱ्यांसह भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ऊसतोडणीही थांबविण्यात आली. बिबट्याचे बछडे अतिशय लहान असल्याने त्यांना आईच्या भेटीसाठी पुन्हा ऊसाच्या शेतात सुरक्षित ठेवण्यात आल्याचे सानप यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांची पाळीव जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वन विभागाने परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...