राज्यात एकूण ३०५ छोटय़ा मोठय़ा बाजार समित्या आहेत. त्यात एपीएमसी तगडी बाजार समिती आहे. सुमारे तीन हजार कोटीची उलाढाल असलेल्या या बाजार समितीच्या संचालक मंडळाची गेली दहा वर्षे निवडणूक झालेली नाही. त्यामुळे शासनाने त्यावर प्रशासक नेमला होता. मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना आदेश दिल्याने 'एपीएमसी'च्या १८ संचालक पदांसाठी शनिवारी मतदान होत आहे. एकूण २४ संचालक पदापैकी सहा संचालक हे राज्य शासनाकडून नाम निर्देशित केले जाणार आहेत. १८ संचालक हे मतदान प्रक्रियेद्वारे निवडून येणार आहेत. यात सहा महसूल विभागातून १२ शेतकरी प्रतिनिधी आणि तुर्भे येथील पाच घाऊक बाजारांतून प्रत्येकी एक संचालक निवडला जाणार आहे. या पाच बाजारात शेतमालाची चढउतार करणारे हमाल माथाडी तोलारी यांच्यामधून एक प्रतिनिधी संचालक म्हणून निवड केला जाणार आहे.
पाच बाजारापैकी फळ बाजारातील माजी संचालक संजय पानसरे यांची बिनविरोध निवड झालेली आहे, तर माथाडी संचालक म्हणून माजी मंत्री शशिकांत यांचीही बिनविरोध निवड यापूर्वीच जाहीर झालेली आहे. शिंदे पानसरे हे दोन्ही संचालक 'मविआ'तील घटक पक्षाचे सदस्य आहेत. त्यामुळे तुर्भे येथील चार घाऊक बाजारातून शनिवारी चार संचालकांची निवड केली जाणार आहे. या बाजारातील फळ बाजारातून संजय पानसरे यांना सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन एकमताने निवडून दिले आहे, तर शिंदे हे संचालक मंडळात हवे असल्याने त्यांनाही एकमताने सर्व माथाडी संघटनांनी निवड केली आहे. त्यामुळे आता धान्य बाजारात निलेश वीरा विरुद्ध पोपटलाल भंडारी तर मसाला बाजारात कीर्ती राणा यांना अशोक जैन हे टक्कर देणार आहेत. कांदा-बटाटा बाजारातही यावेळी चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
माजी संचालक अशोक वाळुंज यांना गेली अनेक वर्षे या बाजारात तळ ठोकून असलेल्या राजेंद्र शेळके यांचा सामना करणार आहेत. भाजी बाजारात बिनविरोध निवडीला विरोध करणारे र्मचट बँकेचे अध्यक्ष डी. मोरे यांनी माजी संचालक शंकर पिंगळे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. यात धान्य व मसाला बाजार हे भाजप समर्थक व्यापाऱ्यांची बाजारपेठ आहे. त्यामुळे निवडून येणारे संचालक हे भाजप वा सरकारला आपले म्हणणारे असणार आहेत, मात्र भाजी, कांदा, आणि फळ या तीन बाजारपेठांवर मविआचे विशेषत: राष्ट्रवादीचे वर्चस्व राहणार आहे. सहा महसूल विभागांतून प्रत्येकी दोन असे १२ संचालक एपीएमसीत येणार आहे. यातही काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात बलाढय़ घाऊक बाजार समितीवर यावेळी मविआचे वर्चस्व राहणार हे स्पष्ट दिसून येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा